बोगस एपीके फाईल विक्रीप्रकरणी रेकॉर्डवरील गुन्हेगारास अटक

एपीके फाईलची विक्री करुन ६३ कोटींना गंडा घातल्याचे उघड

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२९ जुलै २०२६
मुंबई, – बोगस एपीके फाईल विक्री करणार्‍या एका आंतरराज्य टोळीशी संबंधित रेकॉर्डवरील गुन्हेगाराला डी. बी मार्ग पोलिसांनी अटक केली आहे. एस. के मंडोल असे या गुन्हेगाराचे नाव असून त्याने आतापर्यंत ९१ हून अधिक बोगस एपीके फाईलची विक्री केली असून या फाईलच्या माध्यमातून २९९३ गुन्ह्यांत ६३ कोटी ६९ लाख ६८ हजार १७४ रुपयांची फसवणुक झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यापैकी ५१२ गुन्हे महाराष्ट्रातील विविध शहरातील असल्याचे पोलीस उपायुक्त रागसुधा आर यांनी सांगितले. या कारवाईत पोलिसांनी दहा मोबाईल, एक लॅपटॉप, सात सिमकार्ड, चार क्रेडिट-डेबीट कार्ड, ९६७ एपीके फाईल आणि ३७ हजार २०० व्यक्तींचे बँकिंगसंदर्भातील गोपनीय माहितीचा डेटाबेस आदी मुद्देमाल जप्त केला आहे. चालू वर्षांतील मुंबई पोलिसांनी आतापर्यंत ही सर्वांत मोठी कारवाई असल्याचे बोलले जाते.

यातील तक्रारदार ग्रॅटरोड परिसरात राहत असून काही दिवसांपूर्वी त्यांना महानगर गॅस लिमिटेड नावाने एक बोगस मॅसेज प्राप्त झाला हेता. त्यात त्यांचे गॅस कनेक्शन बंद होणार असल्याचे सांगून बिल अपडेट करण्यास सांगण्यात आले होते. त्यासाठी अज्ञात व्यक्तीने त्यांना महानगर गॅस लिमिटेडची एक बोगस एपीके फाईल पाठविली होती. ही फाईल ओपन करुन त्यांना त्यांची वैयक्तिक माहिती भरण्यास प्रवृत्त करण्यात आले होते. त्यांनी ती फाईल ओपन केल्यानंतर त्यांच्या बँक खात्यातून काही ऑनलाईन व्यवहार झाले होते. या व्यवहारातून त्यांच्या खात्यातून ७० हजार ५०० रुपये डेबीट झाले होते. हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी डी. बी मार्ग पोलिसांना घडलेला प्रकार सांगून अज्ञात सायबर ठगाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून संबंधित सायबर ठगांचा शोध सुरु केला होता.

गेल्या काही वर्षांत महानगर गॅस लिमिटेडच्या नावाने बोगस एपीके फाईल पाठवून अनेकांना कोट्यवधी रुपयांना गंडा घालण्यात आला होता. त्यामुळे त्याची पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त मनोजकुमार शर्मा, अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त रागसुधा आर यांनी गंभीर दखल घेत सायबर सेल पोलिसांसह डी. बी मार्ग पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर सहाय्यक पोलीस आयुक्त ज्ञानेश्‍वर वाघ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन दळवी, पोलीस निरीक्षक युवराज पाटील यांच्या मागदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक धनवेश पाटील, अभिजीत देशमुख, पोलीस उपनिरीक्षक किरण देवरे, पोलीस हवालदार आनंद गावडे, पोलीस शिपाई दादासाहेब घोडके, आतिष वाघमारे, जगदेव आदी पथकाने तपास सुरु केला होता.

तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांचे विशेष पथक झारखंड आणि कोलकाता येथे पाठविण्यात आली होती. यावेळी या पथकाने कोलकाता येथून एस. के मंडोल या संशयिताला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत या गुन्ह्यांत त्याचा सहभाग उघडकीस आला होता. त्यानेच तक्रारदारांना बोगस एपीके फाईल पाठवून ही फसवणुक केली होती. त्यानंतर त्याला अटक करुन पुढील कारवाईसाठी मुंबईत आणण्यात आले होते. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला गिरगाव येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते, यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्याकडून पोलिसांनी मोबाईलसह लॅपटॉप, सिमकार्ड, डेबीट-क्रेडिट कार्ड, बोगस एपीके फाईल तसेच वेगवेगळ्या व्यक्तींच्या बँकेशी संबंधित दस्तावेज असा मुद्देमाल जप्त केला आहे.

मंडोल हा मूळचा झारखंडचा रहिवाशी आहे. त्याने आतापर्यंत अनेक महानगर गॅस लिमिटेडसह इतर बोगस एपीके फाईल बनविले होते. त्यापैकी ९१ एपीके फाईलची त्याने सायबर ठगांना विक्री केली आहे. प्रत्येक फाईलमागे त्याला पंचवीस ते तीस हजार रुपयांचे कमिशन मिळत होते. गेल्या सहा महिन्यांपासून तो एपीके फाईल बनवून विक्रीचे काम करत होता. त्याने विक्री केलेल्या ९१ एपीके फाईलद्वारे भारतात एकूण २९९३ तर महाराष्ट्रातील विविध ५१२ गुन्ह्यांमध्ये वापर झाला आहे.

या फाईलच्या माध्यमातून सायबर ठगांनी आतापर्यंत अनेकांना गंडा घालून त्यांच्या बँक खात्यावर ६३ लाख ६९ हजार ६८ हजार १७४ रुपयांचा डल्ला घातल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्यामुळे या संपूर्ण गुन्ह्यांची माहिती काढण्याचे सुरु झाले असून त्याला संबंधित पोलिसांकडे चौकशीसाठी सोपविले जाणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page