हत्येच्या गुन्ह्यांत नऊ वर्षांपासून वॉण्टेड असलेल्या आरोपीस अटक
पोलिसांना खबरी देतो म्हणून सहाजणांनी केली होती हत्या
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
५ ऑगस्ट २०२६
मुंबई, – हत्येच्या गुन्ह्यांत गेल्या नऊ वर्षांपासून वॉण्टेड असलेल्या आरोपीस एमआयडीसी पोलिसांच्या एका विशेष पथकाने गोवा येथून अटक केली. मेहताब आलम अझिमतुल्ला खान असे या आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. याच गुन्ह्यांत यापूर्वी सहा आरोपींना पोलिसांनी अटक केली असून या सर्वांनी संगनमत करुन पोलिसांना खबरी देतो या कारणावरुन वसीउल्ला मोहसीन खान या ३२ वर्षांच्या व्यक्तीची हत्या केली होती.
ही घटना ३ फेब्रुवारी २०१७ रोजी सकाळी अकरा ते दुपारी एकच्या सुमारास अंधेरीतील एमआयडीसी, सुभाषनगर, भंगाराचे साहित्य असलेल्या गाळ्यातील भंगारवाडीत घडली. अब्दुल मोहसीन शेख याचा चहा विक्रीचा धंदा असून तो पोलीस खबरी म्हणून परिचित होता. तो त्याच्या कुटुंबियांसोबत सांताक्रुज येथील गझधर बांग, पालीवल डेअरीच्या बाजूलाच असलेल्या एका रुममध्ये राहत होता. वसीउल्ला हा त्याचा मोठा भाऊ असून त्याला त्याच्या कामात मदत करत होता. अब्दुलने गुन्ह्यांतील आरोपींची माहिती पोलिसांना दिली होती. या माहितीनंतर काही आरोपींना पोलिसांनी चौकशीसाठी बोलाविले होते.
पोलिसांना ही खबर अब्दुल शेख यानेच दिल्याच्या संशयावरुन त्यांनी अब्दुलला भंगारवाडी परिसरात बोलाविले होते. तिथे अब्दुल, त्याचा भाऊ वसीउल्ला आणि गावचा नातेवाई समशुद्दीन असे तिघेही गेले होते. यावेळी या सहाजणांच्या टोळीने त्यांना घेराव घालून त्यांच्यावर लोखंडी पाईप आणि सळईने बेदम मारहाण केली होती. त्यात ते तिघेही गंभीररीत्या जखमी झाले होते. या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. जखमी झालेल्या तिघांनाही तातडीने कूपर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे वसीउल्ला शेख याला डॉक्टरांनी मृत घोषित केले होते. त्याच्या डोक्याला, खांद्याला गंभीर दुखापत झाली होती, तसेच हात आणि पायाच्या गुडघ्याला फॅक्चर झाले होते.
याप्रकरणी अब्दुलच्या जबानीवरुन पोलिसांनी सहाजणांविरुद्ध हत्या, हत्येचा प्रयत्नाह अन्य भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच वेगवेगळ्या परिसरातून पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली होती. त्यांच्याविरुद्ध नंतर कोर्टात आरोपपत्र सादर करण्यात आले होते. या आरोपपत्रात मेहताब खान याला वॉण्टेड आरोपी दाखविण्यात आले होते. गुन्हा घडल्यानंतर तो पळून गेला होता, त्यामुळे त्याचा पोलिसांकडून शोध सुरु होता. मेहताब हा स्क्रॅपचे काम करत होता, त्यासाठी तो वेगवेगळ्या राज्यात जाऊन स्वतचे अस्तिस्व बदलून राहत होता. त्यामुळे त्याचा पोलीस सोशल मिडीया, इंटाग्राम, फेसबुक आणि इंडिया मार्ट या माध्यमातून माहिती काढून शोध घेत ाहेते. त्याच्या नातेवाईकासह मित्राच्या माहितीवरुन तो कर्नाटक आणि गोवा राज्यात नियमित येत असल्याची माहिती प्राप्त झाली होती.
या माहितीनंतर पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त मनोजकुमार शर्मा, अतिरिक्त पोलीस आयुक्त अभिनव देशमुख, पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे, सहाय्यक पोलीस आयुक्त योगेश शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनश्याम नायरयांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनिल कारंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण राक्षे, पोलीस हवालदार नारायण भोसले, विशाल पिसाळ, पोलीस शिपाई तानाजी सूर्यवंशी, दिपक वाघमारे आदी पथकाने त्याचा कर्नाटक आणि गोवा राज्यात शोध सुरु केला होता.
ही शोधमोहीम सुरु असताना मेतबात खान याला गोवा येथील वास्को, राष्ट्रीय धु्रवीय ऍण्ड समुद्री अनुसंधान केंद्र परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीत तो हत्येच्या गुन्ह्यांतील गेल्या नऊ वर्षांपासून वॉण्टेड असलेला आरोपी असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर त्याला अटक करुन पुढील कारवाईसाठी मुंबईत आणण्यात आले होते.