दिवसा रेकी करुन रात्री रिक्षा चोरी करणारा गुन्हेगार गजाआड
चार गुन्ह्यांची उकल करुन २.३५ लाखांच्या चार रिक्षा हस्तगत
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१३ ऑगस्ट २०२६
मुंबई, – दिवसा रेकी करुन रात्रीच्या वेळेस शहरात विविध ठिकाणी पार्क केलेल्या रिक्षा चोरी करणार्या एका रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराला निर्मलनगर पोलिसांनी अटक केली. कार्तिक शिवशंकर उपाध्याय असे या २० वर्षीय आरोपीचे नाव असून त्याच्या अटकेने चार रिक्षा चोरीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. या चारही गुन्ह्यांतील २ लाख ३५ हजाराच्या चार चोरीच्या रिक्षा पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. अटकेनंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टाने ोलीस कोठडी सुनावली आहे. कार्तिकविरुद्ध चौदाहून अधिक गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले.
गेल्या काही दिवसांत वांद्रे ते सांताक्रुज परिसरात रिक्षा चोरीच्या अनेक तक्रारी स्थानिक पोलिसांना प्राप्त झाल्या होता. या गुन्ह्यांचा तपास सुरु असताना ५ ऑगस्टला खाार येथील गोळीबार रोड, आंबेवाडी पोलीस चौकीजवळ पार्क केलेली अन्य एका रिक्षाची चोरी झाली होती. हा प्रकार दुसर्या दिवशी उघडकीस येताच रिक्षाचालकाने निर्मलनगर पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध रिक्षा चोरीचा गुन्हा दाखल केला होता.
रिक्षा चोरीच्या वाढत्या तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत निर्मलनगर पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने आरोपीची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी एका सीसीटिव्ही फुटेजमध्ये एक तरुण पार्क केलेली रिक्षा चोरी करुन पळून जात असताना दिसून आला. तो कार्तिक उपाध्याय हा सराईत गुन्हेगार असल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती.
ही मोहीम मोहीम सुरु असताना कार्तिक हा सांताक्रुज परिसरात राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त मनोजकुमार शर्मा, अतिरिक्त पोलीस आयुक्त अभिनव देशमुख, पोलीस उपायुक्त निमित्त गोयल, सहाय्यक पोलीस आयुक्त संजय गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय कुलकर्णी, पोलीस निरीक्षक सूर्यकांत पारटकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भीमराव धापटे, सहाय्यक फौजदार फाटक, पोलीस हवालदार पवार, सांत, शेख, माने, पोलीस शिपाई राठोड यांनी कार्तिक उपाध्याय याला सांताक्रुज येथून ताब्यात घेतले.
तपासात तो सांताक्रुज येथील वाकोला, गावदेवी रामेश्वर शाळेजवळील ओमकार चाळीत राहतो. तो रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध निर्मलनगर, वाकोला, खेरवाडी पोलीस ठाण्यात एकूण चौदाहून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे. गेल्या काही दिवसांत त्याने निर्मलनगर, खेरवाडी आणि वाकोला हद्दीतून चार रिक्षा चोरी केल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर त्याच्याकडून पोलिसांनी चारही रिक्षा हस्तगत केल्या आहेत. त्याच्या अटकेने रिक्षा चोरीच्या चार गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.