तीस कोटीच्या फसवणुकीच्या गुन्ह्यांत तीन संचालकासह चौघांना अटक

चारही आरोपी एआय/डिजीटल ऑरजीनचे संचालक-एजंट

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१४ ऑगस्ट २०२६
मुंबई, – सुमारे तीन कोटीच्या फसवणुकीच्या कटातील तीन कार्यकारी संचालकासह एजंट अशा चौघांना गुन्हे शाखेच्या आर्थिक गुप्तवार्ता विभागाच्या अधिकार्‍यांनी अटक केली. श्रीकृष्ण पांडुरंग चव्हाण, अंकुश शांताराम पार्टे, सुभाष यशवंत पंदेरे आणि डॉ. सुदेश मोहिते अशी या चौघांची नावे आहेत. यातील श्रीकृष्ण, अंकुश आणि सुभाष हे तिघेही एआय ऑरजीन/डिजीटल ऑरजीन कंपनीचे कार्यकारी संचालक तर सुदेश हा एजंट आहे. अटकेनंतर या चारही आरोपींना लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या कंपनीने मुंबईसह महाराष्ट्रातील विविध शहर आणि इतर राज्यात कोट्यवधी रुपयांची गुंतवणुक योजना सुरु करुन फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

एआय ऑरजीन/डिजीटल ऑरजीन नावाची एक खाजगी कंपनी असून या कंपनीचे मुंबईसह इतर शहरात अनेक शाखा आहेत. याा कंपनीत श्रीकृष्ण चव्हाण हे अध्यक्ष-कार्यकारी संचालक, सुभाष पंडेरे व अंकुश पार्टे कार्यकारी संचालक म्हणून काम पाहत होते. कंपनीने त्यांच्या गुंतवणुकदारांसाठी विविध आकर्षक योजना सुरु केल्या होत्या. त्यात कंपनीत गुंतवणुक केलेल्या रक्कमेचे रोलिंग आणि नवीन गुंतवणुकदार जोडणे म्हणजे जनरेशन (वर्किंग प्लान) अशा दोन योजनांचा समावेश होत. या योजनेत गुंतवणुकदारांनी स्वत कंपनीत गुंतवणुक करुन आयडी तयार करणे तसेच नवीन गुंतवणुकदार बनवून त्यांचे आयडी तयार करण्यास सांगण्यात आले होते. या गुंतवणुकीवर अनेकांना भरघोस परताव्याचे आमिष दाखविण्यात आले होते.

इतकेच नव्हे तर जुन्या गुंतवणुकदारांना लेवलनुसार अधिकचा बोनस देण्यात येत होता. ही गुंतवणुक योजना म्हणजे पॉझी स्किम आणि बेकायदेशीर ठेव योजना म्हणून ओळखल्या जातात. त्यात अनेक गुंतवणुकदारांनी चांगल्या परताव्याच्या आमिषाने कोट्यवधी रुपयांची गुंतवणुक केली होती. सुरुवातीला चांगला परतावा देऊन त्यांना आणखीन गुंतवणुक करण्यास तसेच नवीन सभासदांना गुंतवणुक करण्यास प्रवृत्त केले जात होते. अशा प्रकारे कंपनीच्या संचालकासह इतर आरोपींनी अनेकांना कोट्यवधी रुपये गुंतवणुक करण्यास भाग पाडले होते. जानेवारी २०२५ ते जुलै २०२६ या कालावधीत कंपनीत अनेक गुंतवणुकदारांनी सुमारे तीस कोटीची गुंतवणुक केली होती, मात्र सुरुवातीच्या परताव्यानंतर त्यांना नंतर कुठलाही परतावा तसेच मूळ रक्कम परत न करता संचालकांनी कंपनी बंद करुन पलायन केले होते.

हा प्रकार उघडकीस येताच मुंबई पोलिसांच्या वतीने रमेश लक्ष्मण आव्हाड या पोलीस हवालदाराने पंतनगर पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर श्रीकृष्ण चव्हाण, सुभाष पंदेरे, अंकुश पार्टे व इतर संचालक, अधिकारी-कर्मचारी, एजंट यांच्याविरुद्ध अपहारासह फसवणुक, बेकायदेशीर ठेव योजना प्रतिबंध कायदा कलमांतर्गत पंतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यांची व्याप्ती मोठी असल्याने त्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेच्या गुप्तवार्ता विभागाकडे सोपविण्यात आला होता. गुन्ह्यांचा तपास हाती येताच पोलिसांनी कंपनीच्या कार्यकारी संचालकासह इतर आरोपींच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेतली होती.

ही शोधमोहीम सुरु असताना आर्थिक गुप्तवार्ता पथकाचे प्रभारी पोलीस निरीक्षक उमेश गौंड, कॅलिस्टस डिमेलो, पोलीस निरीक्षक संतोष तोरे, संजय भोसले, सुनिल लांघी, प्रविण दराडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम परब, मिलिंद बोरसे, संदीप पिसे, तुषार सावंत, पोलीस उपनिरीक्षक विक्रम काळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक किरण चव्हाण, पोलीस शिपाई ललित महाजन, अमीत पाटील, आदित्य घाडीगावकर, नवनाथ पानसरे, महिला पोलीस शिपाई प्रिया दरे व अन्य पोलीस पथकाने श्रीकृष्ण चव्हाण, अंकुश पार्टे, सुभाष पंदेरे आणि एजंट डॉ. सुदेश मोहिते या चौघांना वेगवेगळ्या ठिकाणाहून अटक केली. अटकेनंतर या चौघांनाही लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.

आरोपींच्या अटकेनंतर पोलिसांनी वसई, गोरेगाव येथील आरे कॉलनी, मालाडच्या कुरार व्हिलेज येथील कार्यालयात छापा टाकला होता. या कारवाईत पोलिसांनी बारा लाख आठ हजाराची कॅश, विविध नऊ बँक खात्याचे पासबुक, एक बीएमडब्ल्यू कार, एक वेरना कार, सात लॅपटॉप, डेस्कटॉप आदी मुद्देमाल जप्त केला आहे. आतापर्यंतच्या चौकशीत या कंपनीने रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया तसेच सिक्युरिटीज ऍण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया अशा सक्षम प्राधिकारणाकडून कोणताही परवाना, नोंदणी प्राप्त नसताना बेकायदेशीरपणे गुंतवणुक योजना सुरु केल्या होत्या.

अनेक गुंतवणुकदारांना चांगला परताव्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून रोखीने आणि ऑनलाईन असे सुमारे तीस कोटी रुपये घेतल्याचे उघडकीस आले आहे. मुंबईसह ठाणे, पालघर, पिंपरी-चिंचवड, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर येथे कंपनीने नवीन कार्यालय सुरु करुन अनेकांना गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करुन त्यांची फसवणुक केली होती. महाराष्ट्रासह गोवा, कर्नाटक राज्यातही कंपनीने त्यांच्या एजंटाच्या माध्यमातून अनेकांकडून योजनेसाठी पैसे घेतल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page