इंजिनिगरिंग प्रवेशाच्या नावाने गंडा घालणार्या टोळीचा पर्दाफाश
पुण्यातील कॉल सेंटरमध्ये छापा टाकून दहाजणांना १.३५ कोटीच्या मुद्देमालासह अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१७ ऑगस्ट २०२६
मुंबई, – देशभरातील विविध नामांकित इंजिनिअरींग शिक्षण संस्थेत प्रवेशाच्या नावाने गंडा घालणार्या एका आंतरराज्य टोळीचा पवई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याच गुन्ह्यांत दहाजणांना पोलिसांनी अटक केली असून ते सर्वजण पुण्यातील दोन कॉल सेंटरच्या माध्यमातून ही फसवणुक करत होते. अटक आरोपी उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड आणि हरियाणाचे रहिवाशी असून त्यांच्या अटकेने अशाच प्रकारच्या मुंबईसह नागपूर, उत्तरप्रदेश, गुजरात, कर्नाटक येथील पोलीस ठाण्यातील सहा गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. या कारवाईत पोलिसांनी १.३५ कोटीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. अटकेनंतर दहाही आरोपींना लोकल कोर्टाने गुरुवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
ग्रेसी पिटर स्वामी ही तक्रारदार महिला पवईतील आयआयटी, शिव ओम अपार्टमेंटमध्ये राहते. तिच्या मुलाला हैद्राबादच्या एका आयआयटी शिक्षण संस्थेत प्रवेश हवा होता. त्यासाठी तिचे प्रयत्न सुरु होते. याच दरम्यान तिला सोशल मिडीयावर एक जाहिरात दिसली होती. त्यात देशभरात विविध नामांकित शिक्षण संस्थेत प्रवेश देण्याबाबत आश्वासन देण्यात आले होते. त्यामुळे तिने जाहिरातीमध्ये दिलेल्या मोबाईल क्रमाकांवर संपर्क साधला होता. यावेळी तिच्या गौतम आणि सुमीत नावाच्या दोन आरोपींनी संभाषण केले होते. तिच्या मुलाला हैद्राबादच्या एका नामांकित आयआयटी शिक्षण संस्थेत प्रवेश देतो असे सांगून त्यांनी तिच्याकडून साडेसोळा लाख रुपये घेतले होते. या पेमेंटनंतर त्यांनी तिच्याशी संपर्क साधणे बंद केले होते.
फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच तिने पवई पोलिसांना घडलेला प्रकार सांगून आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी संबंधितांविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. गेल्या काही वर्षांत अशाच प्रकारे इतर काही गुन्ह्यांची नोंद झाली होती, अज्ञात ठगांनी अनेकांना लाखो रुपयांना गंडा घातल्याने त्याची पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त मनोजकुमार शर्मा, अतिरिक्त पोलीस आयुक्त अभिनव देशमुख, पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी गंभीर दखल घेत पवई पोलिसांना तपासाचे अदोश दिले होते.
या आदेशानंतर सहाय्यक पोलीस आयुक्त दादासाहेब घुटूकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक् सुशांत बंडगर, जयदीप गोसावी, पोलीस उपनिरीक्षक प्रशांत केंद्रे, सागर जाधव, पोलीस हवालदार सुरनार, पिसाळ, पोलीस शिपाई घाडगे, राठोड, शिरसाठ, महिला पोलीस शिपाई येवले यांनी तपास सुरु केला होता. तांत्रिक तपासावरुन आरोपींनी महिलेकडून घेतलेल्या पैशांतून पाच मोबाईल खरेदी केलयचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे या मोबाईलचे लोकेशनचा तांत्रिक आणि मानवी कौशल्याच्या आधारे पवई पोलिसांच्या एका विशेष पथकाने पुण्यातील लोहगाव, विमाननगर परिसरात असलेल्या निऑन होम्स इमारत तसेच खराडीच्या सिटी विस्टा इमारतीमध्ये सुरु असलेल्या दोन कॉल सेंटरमध्ये छापा टाकला होता. या कारवाईत पोलिसांनी दहा आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.
त्यांच्याकडून पोलिसांनी वेगवेगळ्या कंपनीचे चार मोबईल, दोन हार्डडिस्क, एक लॅपटॉप, जिओ कंपनीचा जिओ बुक, वेगवेगळ्या बँकेचे सात डेबीट कार्ड, बॅक अकाऊंटमधी २४ लाख रुपये, जिओचे पाच सिमकार्ड तसेच आरोपींच्या अंगझडतीत तेरा मोबाईल असा १ कोटी ३५ लाख २७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यांच्या मोबाईलमध्ये पोलिसांना विविध नामांकित शिक्षण संस्थेची लिस्ट सापडली आहे. या गुन्ह्यांत संबंधित शिक्षण संस्थेच्या पदाधिकारी, प्राचार्य अथवा कर्मचार्यांचा सहभाग आहे का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे. प्राथमिक तपासात विविध नामांकित शिक्षण संस्थेत प्रवेशाच्या नावाने फसवणुक करणारी ही एक आंतरराज्य टोळी आहे. ही टोळी इंजिनिअरिंग प्रवेशासाठी सोशल मिडीयावर जाहिरात करुन पालक आणि विद्यार्थ्यांचा विश्वास संपादन करत होते.
बोगस सिमकार्डच्या माध्यमातून त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना हव्या त्या शिक्षण संस्थेत प्रवेश देण्याचे आमिष दाखवत होते, त्यासाठी त्यांच्याकडून आगाऊ रक्कम घेत हाते. त्यासाठी त्यांना विविध बँकेत खात्याचे क्रमांक पाठविले जात होते. पेमेंट मिळताच ते संपर्क साधणे बंद करत होते. कॉल सेंटरचे चालक विविध बोगस सिमकार्ड त्यांनी नेमलेल्या सिमकार्ड डिलरकडून विकत घेत होते. य सिमकार्डवरुन बोगस नावाने इंटाग्राम, फेसबुक अकाऊंट उघडून त्याद्वारे जाहिरात करत होते. अनेकांनी त्यांनी मॅनेजमेंट, एनआरए कोट्यातून इंजिनिअरिंगमध्ये प्रवेशाच्या नावाने गंडा घातला होता.
या सिमकार्डचा आरोपींकडून केवळ फसवणुकीसाठी वापर केला जात होता. अटक आरोपींमध्ये पाचजणांचे शिक्षण बीटेकपर्यंत झाले तर इतर पाचजणांनी इंजिनिअरचे शिक्षण पूर्ण केले आहे. प्रत्येकी चार आरोपी बिहार, उत्तरप्रदेश तर उर्वरित दोन आरोपी हरियाणा आणि झारखंडचे रहिवाशी आहे. त्यांनी पुण्यातील एमआयटी कॉलेज, नोएडाच्या एनआयू कॉलेज, इंटरनॅशनल युनिव्हरसिटी, गलगोटीया युनिव्हरसिटी ग्रेटर नोएडा, बंगलोरच्या सीआय टेकमधून पदवीपर्यंत शिक्षण घेतले होते. सर्व आरोपी २०१९ पासून कॉल सेंटरच्या माध्यमातून ही फसवणुक करत असलयाचे उघडकीस आले.
प्रवेशाच्या कालावधीत ते जाहिरात करुन ही फसवणुक करत होते. त्यानंतर ते त्यांच्या गावी पळून जात होते. या टोळीने आतापर्यंत मुंबईसह इतर राज्यात फसवणुकीचे गुन्हे केले आहे. त्यात मुंबईसह नागपूर, गुजरात, कर्नाटक येथे प्रत्येकी एक, उत्तरप्रदेशात दोन असे सहा गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहे. या सहाही गुन्ह्यांत त्यांनी तक्रारदारांना कोट्यवधी रुपयांना गंडा घातला आहे.
अटकेनंतर या सर्वांना रविवारी दुपारी वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना गुरुवार २० ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांची पोलिसांकडून पोलिसांनी कसून चौकशी सुरु आहे. या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे बाहेर येण्याची शक्यता आहे. या गुन्ह्यांत इतर काही आरोपींचा सहभाग उघडकीस आला आहे. त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.