मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१७ ऑगस्ट २०२६
मुंबई, – पायधुनीतील एका व्यावसायिकाच्या एक कोटी वीस लाख रुपयांच्या कॅशच्या अपहारप्रकरणी युवराजसिंग वसंतसिंग देवडा या २४ वर्षांच्या आरोपीस पायधफनी पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी १ कोटी १६ लाख ५० हजार रुपयांची कॅश हस्तगत केली आहे. या गुन्ह्यांतील मुख्य आरोपी पिरसिंग वसंतसिंग देवरा हा पळून गेला असून त्याला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले आहे. त्याच्या अटकेसाठी पोलिसानी विशेष मोहीम हाती घेतली आहे. युवराजसिंग आणि पिरसिंग हे दोघेही सख्खे भाऊ असून राजस्थानचे रहिवाशी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
यातील तक्रारदार व्यावसायिक असून त्यांच्याकडे पिरसिंग देवडा हा कामाला होता. ८ ऑगस्टला त्यांनी त्याला त्यांच्या दुसर्या कार्यालयातून एक कोटी वीस लाखांची कॅश आणण्यास सांगितले होते. त्यामुळे तो त्यांच्या दुसर्या कार्यालयात गेला होता. या कार्यालयातून त्याने एक कोटी वीस लाखांची कॅश असलेली दोन बॅग घेतल्या. मात्र कार्यालयात जाण्यापूर्वीच त्याने पैशांच्या बॅगा बदलून त्याजागी कागदी पुट्टे भरुन तक्रारदार व्यावसायिकाला दिले होते. त्यानंतर तो कार्यालयातून पळून गेला होता. हा प्रकार तक्रारदार व्यावसायिकाच्या लक्षात येताच त्यांनी पायधुनी पोलिसांत पिरसिंग देवडा याच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्यविरुद्ध पोलिसांनी एक कोटी वीस लाखांचा अपहार केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल होताच पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त मनोजकुमार शर्मा, अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त रागसुधा आर, सहाय्यक पोलीस आयुक्त रेणुका बुवा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजय कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन लहामागे, किरण मांढरे, पोलीस उपनिरीक्षक कल्पेश चव्हाण, दिपक ठोंबरे, आकश तेलकापल्लीवार, पोलीस हवालदार दिपक निकम, प्रमोद पवार, सुनिल ठाकूर, पोलीस शिपाई लिंबाजी इथापे, गणेश जगदेव आदी पथकाने तपास सुरु केला होता. परिसरातील सीसीटिव्ही सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला होता.
ही शोधमेाहीम सुरु असताना आरोपी पिरसिंग हा अहमदाबाद येथे गेल्याचे उघडकीस आले. त्यामुळे पोलीस पथक त्याच्या मागावर अहमदाबाद येथे होते. या पथकाने पिरसिंगचा सख्खा लहान भाऊ युवराजसिंग देवडा याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत या गुन्ह्यांत त्याचाही सहभाग उघडकीस आला होता. पिरसिंगने अपहाराची रक्कम त्याच्याकडे ठेवण्यासाठी दिली होती. त्यानंतर त्याच्याकडून पोलिसांनी एक कोटी सोळा लाख पन्नास हजाराची कॅश जप्त केली.
अटकेनंतर युवराजसिंगला पोलिसांनी पुढील कारवाईसाठी मुंबई आणले होते. या गुन्ह्यांत पिरसिंगला वॉण्टेड आरोपी दाखविण्यात आले असून त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. देवडा बंधू हे मूळचे राजस्थानच्या सिरोही, मामावलीचे रहिवाशी असल्याचे पोलिसांनी सांगितले.