मित्रांच्या मदतीने नोकराचा १.३० कोटीच्या दागिन्यांचा डल्ला

आरोपी कर्मचार्‍यासह चौघांविरुद्ध चोरीसह अपहाराचा गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
७ ऑक्टोंबर २०२६
मुंबई, – मालाड येथील एका ज्वेलरी शॉपमध्ये काम करणार्‍या कर्मचार्‍यानेच त्याच्या तीन सहकार्‍यांच्या मदतीने शॉपमधील एक कोटी तीस लाखांच्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर डल्ला मारुन पलायन केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी खुमानसिंग राजपूत या कर्मचार्‍यासह त्याच्या तीन सहकार्‍याविरुद्ध मालाड पोलिसांनी चोरीसह अपहाराचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपींच्या अटकेसाठी मालाड पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

विकास छोगालाल जैन हे ज्वेलर्स व्यापारी असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत मालाड परिसरात राहतात. त्यांचा मालाडच्या साईनाथ रोड, नटराज मार्केट, वसंत प्लाझासमोरच रक्षा ज्वेलर्स नावाचे एक ज्वेलरी शॉप आहे. २०१२ साली त्यांनी ते शॉप भाड्याने घेतला होता. तेव्हापासून ते सोन्या-चांदीच्या दागिन्यांची खरेदी विक्री करतात. त्यांच्याकडे भेरुलाल प्रेमचंदजी राठोड, मदनसिंग वसंतसिंग आणि खुमानसिंग राजपूत हे तिघेही कामाला आहेत. त्यापैकी भेरुलाल हा त्यांचा नातेवाईक असून तो दिवसा शॉपमध्ये काम करतो आणि रात्री त्यांच्या घरी झोपत होता. अनेकदा तोच चावी घेऊन सकाळी शॉप उघडून रात्री शॉप बंद करुन घरी येत होता.

२ ऑक्टोंबरला विकास जैन हे त्यांच्या कुटुंबियांसोबत राजस्थान येथील शिकर, गुरु आचार्य महाश्रमण यांच्या दर्शनासाठी गेले होते. यावेळी त्यांनी ज्वेलर्स शॉपची जबाबदारी भेरुलाल राठोड याच्याकडे सोपविली होती. शनिवारी ३ ऑक्टोंबरला सकाळी भेरुलाल हा नेहमीप्रमाणे शॉपमध्ये गेला होता. मात्र त्याच्याकडील पाचपैकी एका चावीने शॉपचे लॉक उघडले नाही. चौकशीनंतर त्यांना रात्री खुमानसिंगने शॉप बंद केला होता. मात्र त्याने शॉपची चावी त्याला दिली नव्हती. त्यामुळे त्याने खुमानसिंगला कॉल केला, मात्र त्याचा मोबाईल बंद येत होता. हा प्रकार त्याने विकास जैन यांना सांगितला. त्यामुळे ते रात्री उशिरा विमानाने मुंबईत परत आले होते.

रात्री साडेअकरा वाजता ते शॉपमध्ये आले होते. भेरुलालकडील चाव्या घेतल्यानंतर त्या चाव्या शॉपच्या नसल्याचे दिसून आले होते. खुमानसिंगने त्याला दुसर्‍या चाव्या दिल्या होत्या. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी शॉपचे लॉक तोडून आत प्रवेश केला होता. आत गेल्यानंतर त्यांना शॉपमधील सर्व सामान अस्ताव्यस्त पडल्याचे दिसून आले. शॉपमधील विविध सोन्याचे, चांदीचे दागिने असा १ कोटी ३० लाख ३७ हजार २३० रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला होता. त्यामुळे त्यांनी शॉपच्या सीसीटिव्ही फुटेजची पाहणी केली होती.

या फुटेजमध्ये खुमानसिंग हा त्याच्या तीन मित्रांसोबत शॉपमध्ये घुसल्याचे तसेच त्यानेच मित्रांच्या मदतीने एक कोटी तीस लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारुन तेथून पलायन केले होते. शॉपमधून बाहेर जाताना ते चौघेही पिशव्या घेऊन जात असल्याचे दिसून आले. हा प्रकार लक्षात येताच विकास जैन यांनी मालाड पोलिसांना ही माहिती दिली होती. या माहितीनंतर मालाड पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी त्यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी खुमानसिंग राजपूतसह इतर तिघांविरुद्ध चोरीसह सोन्या-चांदीच्या दागिन्यांचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page