डिजीटल अरेस्टच्या बहाण्याने वयोवृद्धाला १.१२ कोटींना गंडा

बँकेच्या मॅनेजरसह चौघांना अटक तर बारा लाख फ्रिज करण्यात यश

0

अरुण सावरटकर
२१ ऑगस्ट २०२६
मुंबई, – डिजीटल अरेस्टच्या बहाण्याने एका वयोवृद्धाला एक कोटी बारा लाखांना गंडा घालणार्‍या टोळीचा उत्तर प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याच गुन्ह्यांत चार आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यात एका नामांकित बँकेचा मॅनेजरचा समावेश आहे. राजेशकुमार मोहनलाल जैन, तारीक मोहम्मद अन्वर मोमीन, शिखर मुकेश त्यागी आणि गौरव महेश गोयल अशी या चौघांची नावे आहेत. अटकेनंतर या चौघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टाने सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. यातील शिखर त्यागी हा इंडसइंड बँकेत रिजीनल ऑपरेशन मॅनेजर म्हणून कामाला आहे. सायबर फसवणुकीच्या गुन्ह्यांत बँकेच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याला अटक होण्याची ही पहिलीच घटना आहे. दुसरीकडे फसवणुकीची बारा लाखांची रक्कम फ्रिज करण्यात पोलिसांना यश आले आहे. या गुन्ह्यांत इतर काही आरोपींचे नावे समोर आली असून त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

६८ वर्षाचे वयोवृद्ध तक्रारदार शरद जयंतीलाल चितालिया हे दहिसर परिसरात त्यांच्या कुटुंबियासोबत राहतात. काही दिवसांपूर्वी त्यांना अज्ञात व्यक्तींनी कॉल करुन ते पोलीस असल्याचे सांगितले होते. त्यांच्या नावाने उघडण्यात आलेल्या बँक खात्यात मनी लॉड्रिंगची रक्कम ट्रान्स्फर झाली असून त्यात त्यांचा सहभागाचे पुरावे मिळाल्याचा दावा केला होता. त्यांना मनी लॉड्रिंगच्या गुन्ह्यांत डिजीटल अरेस्टची धमकी देऊन त्यांच्या बँक खात्याची डिटेल्स प्राप्त केली होती. त्यांच्या चौकशीदरम्यान त्यांना वेगवेगळ्या बँक खात्यात पैसे ट्रान्स्फर करण्यास प्रवृत्त करण्यात आले होते. अटकेच्या भीतीने त्यांनी संबंधित पोलिसांनी दिलेल्या बँक खात्यात १ कोटी १२ लाख २६ हजार रुपये ट्रान्स्फर केले होते. ही रक्कम ट्रान्स्फर केल्यानंतर त्यांची चौकशी बंद झाली होती.

चौकशीनंतर ही रक्कम त्यांच्या बँक खात्यात पुन्हा ट्रान्स्फर केली जाईल असे सांगण्यात आले होते, मात्र त्यांनी ती रक्कम त्यांच्या बँक खात्यात ट्रान्स्फर केली नाही. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच शरद चितालिया यांनी उत्तर प्रादेशिक विभागाच्या सायबर सेलमध्ये तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध भारतीय न्याय सहिता आणि आयटीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल लोखंडे यांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन पाटील, पोलीस उपनिरीक्षक रोहन अहिरे, पोलीस हवालदार विद्याधर पावसकर, रवी पाटील, पोलीस शिपाई अक्षय साळवे आदी पथकाने तपास सुरु केला होता.

तपासात फसवणुकीची सुमारे २२ लाखांची रक्कम अभय देव गोल्ड प्रायव्हेट लिमिटेड या बोगस कंपनीच्या बँक खात्यात जमा झाल्याचे उघडकीस आले होते. या खातेदाराची माहिती काढताना या पथकाने राजेशकुमार जैन याला ताब्यात घेतले. चौकशीत तो दादर येथे राहत असून त्याने सायबर ठगांना फसवणुकीसाठी बँक खाते पुरविले होते. तयचा तारीक मोमीन हा मित्र असून त्याच्या सांगण्यावरुन त्याने त्याच्या बँक खात्याची माहिती शिखर त्यागी याला दिली होती. शिखर हा सायन येथे राहत असून इंडसइंड बँकेत रिजीनल ऑपरेशन मॅनेजर म्हणून कामाला आहे. त्याने ती माहिती गौरव पाठवून फसवणुकीसाठी सायबर ठगांना मदत केल्याचे उघडकीस आले होते.

तपासात आलेल्या या माहितीनंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन पाटील, पोलीस उपनिरीक्षक रोहन अहिरे, पोलीस हवालदार विद्याधर पावसकर, रवी पाटील, पोलीस शिपाई अक्षय साळवे यांनी वेगवेगळ्या परिसरातून तारीक मोमीन, शिखर त्यागी आणि गौरव गोयल या तिघांना ताब्यात घेतले होते. चौकशीत या गुन्ह्यांचा त्यांचा सहभाग उघडकीस आला होता. त्यानंतर या चारही आरोपींना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून पोलिसांनी त्यांचे चार मोबाईल जप्त केले असून या मोबाईलच्या चॅटवरुन अनेक धक्कादायक खुलासे करण्यात पोलिसांना यश आले आहे.

या कटात बँक मॅनेजर शिखर त्यागी आणि गौरव गोयल यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांनी खातेधारकाकडून मिळालेल्या बँक खात्याची डिटेल्स, एपीके फाईलद्वारे २२ लाखांची विल्हेवाट लावली होती. सायबर फसवणुकीच्या गुन्ह्यांत एपीके फाईलसह आरोपींना मदत करणार्‍या कुठल्या बँक मॅनेजरचा सहभाग उघडकीस येण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे बोलले जाते. अटकेनंतर चारही आरोपींना शुक्रवारी दुपारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते, यावेळी कोर्टाने त्यांना सोमवार २४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु असून या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे बाहेर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page