क्रेडिटवर घेतलेल्या सोन्याचा दागिन्यांचा अपहार करुन फसवणुक
१.२१ कोटीच्या फसवणुकीप्रकरणी ज्वेलर्स व्यापार्याला अटक
राजू परुळेकर
२१ ऑगस्ट २०२६
मुंबई, – क्रेडिटवर घेतलेल्या १ कोटी २१ लाख रुपयांच्या विविध सोन्याच्या दागिन्यांचा अपहार करुन एका ज्वेलर्स व्यापार्याची फसवणुक केल्याप्रकरणी साजनराम रामलालजी बिश्नोई या ज्वेलर्स व्यापार्याला मालवणी पोलिसांनी अटक केली. साजनरामचा राजस्थानमध्ये रुक्मिणी ज्वेलर्स नावाचे एक ज्वेलर्स असून तेथील ग्राहकासाठी त्याने ते दागिने विक्रीसाठी घेतल्याचे तपासात उघडकीस आले आहे. या गुन्ह्यांचा त्याचा भाऊ पूनमराम रामलालजी बिश्नोई याचा सहभाग उघडकीस आला असून त्याला या गुन्ह्यांत पाहिजे आरोपी दाखविण्यात आले आहे. तो पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. दरम्यान अटकेनंतर साजनरामला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्याकडून अपहार केलेले दागिने लवकरच हस्तगत केले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
रितेश कांतीलाल जैन हे ज्वेलर्स व्यापारी असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत कुर्ला येथे राहतात. त्यांचा आर. के ज्वेलर्स नावाचे एक ज्वेलरी शॉप आहे. त्यांच्या शॉपमधून अनेक ज्वेलर्स व्यापारी क्रेडिटवर सोन्याचे दागिने घेत असल्याने त्यांची त्यांच्यासोबत चांगले संबंध आहेत. पंधरा वर्षापूर्वी याच व्यवसायातून त्यांची पूनमाराम बिश्नोईशी ओळख झाली होती. त्यांचा मालाडच्या मालवणी परिसरात न्यू नवरतन ज्वेलर्स नावाचे एक शॉप आहे. त्याने त्यांच्याकडून अनेकदा सोन्याचे दागिने घेतले होते, या दागिन्यांचे पेमेंट वेळेवर करुन त्याने त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता.
ऑक्टोंबर २०२५ रोजी त्यांनी त्यांचा भाऊ साजनरामशी त्यांची ओळख करुन दिली होती. साजनराम हा राजस्थान येथे राहत असून त्याचा बारमेड, मेन मार्केटमध्ये रुक्मिणी ज्वेलर्स शॉप असल्याचे सांगितले. मेन मार्केट असल्याने त्याच्या दागिन्यांला प्रचंड मागणी आहे. त्यांच्या दागिन्यांना चांगला फायदा मिळवून देतो असे सांगितले. त्यामुळे त्यांनी त्याला त्याच्या व्यवसायात मदत करावी अशी विनंती केली होती. पूनमराम हे त्यांच्या परिचित असल्याने तसेच त्यांच्यासोबत त्यांचा अनेकदा सोन्याच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार झाला होता. त्यामुळे त्यांनी त्याला मदत करण्याचे आश्वासन दिले होते. ठरल्याप्रमाणे ऑक्टोंबर २०२५ रोजी त्यांनी बिश्नपोई बंधूंना १ कोटी २१ लाख ६३ हजार ९०० रुपयांचे १२४८ ग्रॅम वजनाचे विविध सोन्याचे दागिने क्रेडिटवर विक्रीसाठी दिले होते.
हा संपूर्ण व्यवहार त्यांच्या मालवणीतील न्यू नवरतन ज्वेलर्स शॉपमध्ये झाला होता. यावेळी त्यांच्यात दर आठवड्याला काही ठराविक रक्कम देण्याचे ठरले होते. मात्र ठरल्याप्रमाणे त्यांनी त्यांना दागिन्यांचे पेमेंट दिले नाही. विचारणा केल्यानंतर साजनराम आणि पूनमराम यांच्याकडून त्यांना काहीच प्रतिसाद मिळत नव्हता. काही दिवसांनी त्यांनी त्यांना कॉल करुन अचानक आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे लवकरात लवकर पेमेंट करतो असे सांगितले. मात्र त्यांनी दिलेल्या मुदतीत पेमेंट केले नाही. त्यांनी दिलेले धनादेश बँकेत न वटता परत आले होते. त्यामुळे त्यांनी त्यांच्याकडे क्रेडिटवर घेतलेल्या दागिन्यांची मागणी सुरु केली होती.
मात्र त्यांनी दागिनेही परत केले नाही. ते दोघेही त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होते. नंतर त्यांनी त्यांचे मोबाईल बंद केले होते. त्यामुळे ते स्वत त्यांच्या मालवणीच्या ज्वेलर्स शॉपमध्ये गेले होते. तिथे गेल्यानंतर त्यांना फेब्रुवारी २०२६ पासून पूनमराम यांचे शॉप बंद असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी त्यांना वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. तपासादरम्यान रितेश जैन यांना पूनमराम आणि साजनराम बिश्नोई यांनी त्यांच्यासह इतर व्यापार्यासह ग्राहकांकडून सोने तसेच सोन्यासाठी कॅश स्वरुपात पैसे घेतले होते. मात्र कोणालाही दागिने परत केले नाही किंवा ग्राहकांना नवीन दागिने बनवून दिले नाही.
फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच रितेश जैन यांनी मालवणी पोलिसांना घडलेला प्रकार सांगून दोन्ही आरोपी बंधूविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पूनमराज आणि साजनराम बिश्नोई यांच्याविरुद्ध पोलिसांनी १ कोटी २१ लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांचा अपहार करुन तक्रारदार ज्वेलर्स व्यापार्याची फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच या दोघांचा पोलिसांनी शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना दोन दिवसांपूर्वी साजनराम बिश्नोई याला पोलिसांनी अटक केली.
चौकशीत त्याने त्याचा भाऊ पूनमराज याच्या मदतीने फसवणुकीच्या उद्देशाने रितेश जैन यांच्याकडून सोन्याचे दागिने क्रेडिटवर घेतल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु असून त्याच्याकडून अपहार केलेले सोन्याचे दागिने लवकरच जप्त केले जाणार आहे. या गुन्ह्यांत पूनमराज बिश्नोई याला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.