हत्येच्या गुन्ह्यांत ४० वर्षांपासून वॉण्टेड असलेल्या आरोपीस अटक
जामिनावर बाहेर येताच मुंबईतून पळून गेला व पुण्यात सापडला
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२३ ऑगस्ट २०२६
मुंबई, – हत्येच्या गुन्ह्यांत ४० वर्षांपासून वॉण्टेड असलेल्या एका आरोपीस साकिनाका पोलिसांनी अटक केली. सुरेश चंदर अडागळे असे या आरोपीचे नाव असून जामिनावर बाहेर येताच तो मुंबईतून पळून गेला होता, अखेर त्याला पुण्यातून फेरअटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. अटकेनंतर त्याला विशेष सेशन कोर्टात हजर करण्यात आले होते.
१९८५ साली साकिनाका पोलीस ठाण्यात एक हत्येचा गुन्हा दाखल झाला होता. याच गुन्ह्यांत सुरेश अडागळे याला पोलिसांनी अटक केली होती. न्यायालयीन कोठडीत असताना त्याने जामिनासाठी अर्ज केला होता. यावेळी कोर्टाने त्याला जामिन मंजूर केला होता, मात्र जामिनावर बाहेर येताच तो पळून गेला होता. तो खटल्याच्या सुनावणीसाठी सतत गैरहजर राहत होता. त्यामुळे त्याच्याविरुद्ध अजामिनपात्र वॉरंट, जाहीरनामा वॉरंट तसेच स्टॅडिंग अजामिनपात्र वॉरंट जारी करण्यात आले होते. तरीही तो कोर्टात हजर राहत होता. या घटनेची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत त्याच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेण्याचे आदेश साकिनाका पोलिसांना दिले होते.
या आदेशानंतर अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. अभिनव देशमुख, पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे, सहाय्यक पोलीस आयुक्त दादासाहेब घुटूकडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक् अविनाश मांदळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रविण शिरसाट, पोलीस हवालदार नंदकिशोर सांडव, अविनाश होळकर, विशाल पिसाळ, पोलीस शिपाई भूषण देवरे, जालिंदर बागलाने आदी पथकाने आरोपीचा शोध सुरु केला होता.
ही शोधमेाहीम सुरु असताना सुरेश हा पुण्यातील शिरुर येथे स्वतचे अस्तित्व बदलून राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर या पथकाने शिरुरच्या रांजणगावात वास्तव्यास असलेल्या सुरेश अडागळे याला शिताफीने ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान तो हत्येच्या गुन्ह्यांतील वॉण्टेड आरोपी असल्याचे उघडकीस आले. जामिनावर बाहेर येताच तो मुंबईतून पळून गेला होता. त्यानंतर तो पुण्यात गेला होता. गेल्या काही वर्षांपासून तो तिथे वास्तव्यास होता. अखेर ४० वर्षांनी त्याला फेरअटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.