महानगर गॅस लिमिटेच्या नावाने तीन व्यक्तींची तेरा लाखांची फसवणुक
तक्रारदारामध्ये शासकीय अधिकार्यासह वयोवृद्ध महिलेचा समावेश
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२३ ऑगस्ट २०२६
मुंबई, – महानगर गॅस लिमिटेड कंपनीच्या नावाने तीन व्यक्तींची अज्ञात सायबर ठगांनी सुमारे तेरा लाखांची फसवणुक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तक्रारदारामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे विशेष अधिक्षक, महानगरपालिकेचे सिव्हील इंजिनिअरसह एका वयोवृद्ध महिलेचा समावेश आहे. या तिघांच्या तक्रार अर्जानंतर आझाद मैदान पोलीस ठाण्यात दोन तर बांगुरनगर पोलीस ठाण्यात एक अशा तीन स्वतंत्र फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या तिन्ही गुन्ह्यांचा स्थानिक पोलीस ठाण्यातील सायबर सेलचे अधिकारी तपास करत आहेत.
विजय किशोर बगरे हे ठाण्यातील रहिवाशी असून सध्या सार्वजनिक बांधकाम विभागात विशेष अधिक्षक म्हणून कार्यरत आहेत. मे महिन्यांत ते त्यांच्या मर्झबान रोड येथील सार्वजनिक बांधकाम विभागात असताना अज्ञात व्यक्तीने त्यांना एक मॅसेज केला होता. त्यात त्यांच्या महानगर गॅसची सर्व्हिस रात्री उशिरा बंद होणार असून तातडीने मनिष राठोड यांना संपर्क साधण्यास सांगितले होते. त्यामुळे त्यांनी संबंधित व्यक्तीला संपर्क साधून त्यांचे गॅस कनेक्शन अपडेटसह बिलांचे पेमेंट भरले आहेत. त्यांचे कुठलेही गॅस पेमेंट बाकी नसल्याचे सांगितले. यावेळी त्याने त्यांना महानगर गॅसची एक एपीके फाईल पापठवून ती अपडेट करण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे त्यांनी ती फाईल ओपन करुन त्यात त्यांची माहिती भरली होती. तसेच दहा रुपयांचे पेमेंट केले होते. ही माहिती अपलोड केल्यानंतर १६ मे ते १८ मे २०२६ या कालावधीत या व्यक्तीने त्यांचा मोबाईल हॅक करुन बँक खात्यातून ३ लाख ३३ हजार ५२१ रुपयांचा ऑनलाईन व्यवहार करुन अज्ञात सायबर ठगाने फसवणुक केली होती.
दुसरी घटना फोर्ट येथील महानगरपालिकेच्या कार्यालयात घडली. ४१ वर्षांचे तक्रारदार विलेपार्ले येथे राहत असून महानगरपालिकेत सिव्हील इंजिनिअर म्हणून कामाला आहे. ७ एप्रिलला ते फोर्ट येथील मनपाच्या कार्यालयता होते. यावेळी त्यांना महानगर गॅस लिमिटेड कंपनीचा एक मॅसेज आला होता. त्यात त्यांचा मीटर रिडींग अपडेट नसल्याने रात्री उशिरा त्यांचे गॅस कनेक्शन बंद होणार असल्याचे नमूद करण्यात आले होते. त्यामुळे त्यांनी मॅसेजमध्ये दिलेल्या मॅसेजमध्ये दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला होता. यावेळी समोरील व्यक्तीने तो पब्लिक रिलेशन ऑफिसर बोलत असल्याचे सांगून त्यांचे एक महिन्यांचे बिल भरले नाही. त्यामुळे त्यांचे कनेक्शन बंद होणार होणार आहे. ते बंद होऊ नये म्हणून त्याने त्यांना एक लिंक पाठविली होती. ही लिंक ओपन करुन त्यांनी त्यांचे गॅस कनेक्शन अपडेट केला. त्यानंतर त्यांच्य खात्यातून सव्वातीन लाख रुपये डेबीट झाले होते. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी त्यांचे बँक खाते ब्लॉक करुन पोलिसांत तक्रार केली होती. या दोन्ही तक्रारीनंतर आझाद मैदान पोलिसांनी पोलिसांनी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहे.
अशीच तिसरी घटना गोरेगाव परिसरात घडली. ६९ वर्षांची तक्रारदार महिला तिच्या पतीसोबत गोरेगाव येथे राहते. १४ ऑगस्टला तिला महानगर गॅस लिमिटेडचे अधिकारी असल्याची बतावणी करुन एका अज्ञात व्यक्तीने तिला तिचे गॅस बिल अपडेट करण्याचा सल्ला दिला होात. तिने गॅस बिल अपडेट केले नाहीतर तिचे कनेक्शन बंद करण्याची धमकी दिली होती. त्यासाठी तिने व्हिडीओ कॉल करुन तिच्या बँक खात्याची माहिती जाणून घेतली. त्यानंतर तिच्या खात्यातून ६ लाख ३२ हजार ६५२ रुपये ऑनलाईन ट्रान्स्फर करुन तिची फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच तिने बांगुरनगर पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर बांगुरनगर पोलिसांनी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.