फ्लॅसह फॉर्महाऊस व वाहनासाठी घेतलेल्या पैशांचा अपहार
२.२० कोटीच्या फसवणुकीप्रकरणी महिलेविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२३ ऑगस्ट २०२६
मुंबई, – जुहू येथील थ्री बीएचके फ्लॅटसह लोणावळा येथे फॉर्महाऊस आणि वाहनासाठी घेतलेल्या २ कोटी २० लाखांचा अपहार करुन एका लेखिकाची तिच्याच परिचित महिलेने फसवणुक केल्याचा प्रकार मालाड परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी गिता रविप्रकाश यादव या महिलेविरुद्ध कुरार पोलिसांनी बोगस दस्तावेज बनवून अपहारासह फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. गिता यादव ही फसवणुकीच्या गुन्ह्यांतील रेकॉर्डवरल गुन्हेगार असून तिच्याविरुद्ध समतानगर व दहिसर पोलीस ठाण्यात फसवणुकीच्या दोन गुन्ह्यांची नोंद आहे. तिने अशाच प्रकारे अनेकांना गंडा घातल्याचे बोलले जाते.
मल्लिका आशिष घरटे या मालाड येथे राहत असून फिल्म इंडस्ट्रिजमध्ये लेखिका म्हणून परिचित आहेत. २०२३ साली घरटे कुटुंबियांना जुहू-सांताक्रुज येथे प्रॉपटीमध्ये गुंतवणुक करायची होती. याच दरम्यान त्यांची ओळख गिता यादवशी झाली होती. गिता ही भाईंदर येथे राहत होती. तिने ती मालाडच्या एका फायानान्स कंपनीत कामाला असल्याचे सांगितले होते. तिने त्यांना विविध बँकेने जप्त केलेल्या प्रॉपटी स्वस्तात खरेदी करण्याचा सल्ला दिला होता. तिच्या संपर्कात अशा काही प्रॉपटीज असल्याचे सांगून त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता. याच दरम्यान एप्रिल २०२३ रोजी तिने तिच्या पती आशिष घरटे यांना जुहू येथील वंदाना सहकारी सोसायटीमध्ये असलेला एक थ्री बीएचके फ्लॅटची माहिती दिली होती. त्याची किंमत दोन कोटी रुपये होती,
हा फ्लॅट बॅकेने जप्त केला असून मोबदल्याची रक्कम भरल्यानंतर निश्चित कालावधीत तो फ्लॅट त्यांच्या नावावर हस्तांतरीत करु असे सांगितले. त्यासाठी बँकेसह आणि कोर्टाने बोगस दस्तावेज दाखविले होते. तिच्यावर विश्वास ठेवून त्यांनी तिच्या फायानान्स कंपनीत दोन कोटी आठ लाख रुपये ट्रान्स्फर केले होते. मात्र दिलेल्या मुदतीत तिने फ्लॅट तिच्या पतीच्या नावावर केला किंवा फ्लॅटचा ताबा दिला नाही. चौकशीदरम्यान गिता यादव हिचा संबंधित फायानान्स कंपनीशी काहीही संबंध नसल्याचे उघडकीस आले. तिने जुहूच्या फ्लॅटचे बोगस दस्तावेज बनविले होते. याच दरम्यान गिताने त्यांना लोणावळा येथील लिलाव वाहन आणि फार्महाऊसमध्ये गुंतवणुकीचा सल्ला दिला होता. त्यामुळे तिच्या पतीने तिला वाहनासह फार्महाऊससाठी बारा लाख सव्वीस हजार रुपयांचे पेमेंट केले होते.
मात्र तिने त्यांना वाहनासह फॉर्म हाऊसचा ताबा दिला नव्हता. हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी गिता यादवकडे विचारणा करुन त्यांच्या २ कोटी २० लाख २६ हजाराची मागणी सुरु केली होती. पैसे परत करण्याचे आश्वासन देऊन तिने त्यांना पैसे परत केले नाही. जुलै २०२४ रोजी मल्लिकाचे पती आशिष घरटे यांचा यकृताच्या आजाराने निधन झाले होते. त्यामुळे मल्लिका या प्रचंड मानसिक आणि आर्थिक परिस्थितीतून जात होत्या. पतीच्या निधनानंतर तिने तिला पैसे परत करण्याचे आश्वासन दिले, मात्र तिने तिचे आश्वासन पूर्ण केले नाही. गेल्या वर्षी तिने तिच्या वकिलांशी संपर्क साधून गिता यादवची माहिती काढण्याचा प्रयत्न केला.
चौकशीत गिता यादवविरुद्ध १७ जानेवारी २०२२ रोजी मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केल्याचे दिसून आले. तिने मल्लिका घरटेसह इतर लोकांना फसव्या प्रॉपटीचे आमिष दाखवून त्यांना गुंतवणुकीसाठी प्रवृत्त केले होते. त्यांना प्रॉपटीचा ताबा किंवा प्रॉपटीसाठी घेतलेले पैसे परत न करता फसवणुक केली होती. त्यामुळे तिच्याविरुद्ध दहिसर आणि समतानगर पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद असल्याचे समजले.
फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच मल्लिका घरटे हिने कुरार पोलिसांना घडलेला प्रकार सांगून गिता यादवविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर तिच्याविरुद्ध पोलिसांनी प्रॉपटीचे बोगस दस्तावेज बनवून जुहू येथील फ्लॅटसह लोणावळा येथील वाहनासह फार्म हाऊससाठी घेतलेल्या २ कोटी २० लाख २६ हजाराचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून तिची लवकरच पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे. या चौकशीनंतर तिच्यावर अटकेची कारवाई होणार आहे.