हत्येसह हत्येचा प्रयत्न, दरोड्याच्या गुन्ह्यांतील वॉण्टेड आरोपीस अटक
गेल्या २९ वर्षांपासून पोलिसांना सतत गुंगारा देत होता
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२४ ऑगस्ट २०२६
मुंबई, – हत्येसह हत्येचा प्रयत्न आणि दरोड्याच्या तीन गुन्ह्यांत वॉण्टेड असलेल्या एका रेकॉर्डवरील सराईत आरोपीस भांडुप पोलिसांनी अटक केली. रविंद्र ऊर्फ पापलेट एकनाथ विचारे असे या ६१ वर्षांच्या वयोवृद्ध आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला विशेष सेशन कोर्टाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. स्थायी अजामिनपात्र वॉरंट बजाविण्यात आलेला रविंद्र हा गेल्या २९ वर्षांपासून वॉण्टेड होता, अखेर त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.
रविंद्र विचारे हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध भांडुप पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहे. त्यातील हत्या, हत्येचा प्रयत्न आणि दरोड्याच्या तीन गुन्ह्यांत त्याला वॉण्टेड आरोपी दाखविण्यात आले होते. तो पोलिसांना सापडत नव्हता, त्यामुळे त्याच्याविरुद्ध विशेष सेशन कोर्टाने स्थायी अजामिनपात्र वॉरंट जारी केले होते. रविंद्र हा १९९७ सालापासून फरार होता, त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती, मात्र तो प्रत्येक वेळेस पोलिसांना गुंगारा देऊन पळून जात होता. त्याच्याविरुद्ध काहीच माहिती पोलिसांना मिळत नव्हती. त्याची वरिष्ठांनीही गंभीर दखल घेत त्याच्या अटकेचे आदेश स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेला दिले होते. या आदेशानंतर वरिष्ठांनी भांडुप पोलिसांना रविंद्र विचारे याची माहिती काढून त्याच्यावर कारवाईचे आदेश दिले होते.
या आदेशानंतर पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त मनोज शर्मा, अतिरिक्त पोलीस आयुक्त धनंजय कुलकर्णी, पोलीस उपायुक्त अभयसिंह देशमुख, सहाय्यक पोलीस आयुक्त अजय जोशी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सपना क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक दळवी, पोलीस हवालदार राजेंद्र यादव, विनायक झाडे, पोलीस शिपाई सुमीत पोळ, महिला पोलीस शिपाई रुपाली हाडवळे आदी पथकाने त्याचा शोध सुरु केला होता.
त्याच्या नातेवाईकाकडून रविंद्र हा स्वतचे नाव आणि पत्ता बदलून राहत असल्याचे समजले होते. या तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याचा शोध सुरु केला होता. यावेळी तो सातारा येथे राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर या पथकाने सातारा येथून रविंद्र विचारे याला ताब्यात घेतले. तपासात तो हत्या, हत्येचा प्रयत्न आणि दरोड्याच्या तीन गुन्ह्यांत वॉण्टेड असलेला आरोपी असल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर त्याला पोलिसांनी पुढील कारवाईसाठी मुंबईत आणले होते.
अटकेनंतर त्याला विशेष सेशन कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तपासात रविंद्र हा गुन्हा दाखल होताच मुंबईतून पळून गेला होता. गेल्या काही वर्षांपासून तो सातारा येथील नागठाणे परिसरात स्वतचे अस्तित्व बदलून राहत होता. सतत पोलिसांना गुंगारा देणारा रविंद्र हा तब्बल २९ वर्षांनंतर पोलिसांना सापडला.