हेव्ही डिपॉझिटसाठी दिलेल्या २३ लाखांचा अपहार करुन फसवणुक
फ्लॅट मालक असलेल्या आरोपी पती-पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१ सप्टेंबर २०२६
मुंबई, – हेव्ही डिपॉझिटसाठी घेतलेल्या सुमारे २३ लाखांचा अपहार करुन एका महिलेची फसवणुक झाल्याचा प्रकार कांदिवलीतील चारकोप परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी फ्लॅट मालक असलेल्या आरोपी पती-पत्नीविरुद्ध चारकोप पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. कुशान बाबरिया आणि धन्वी कुशान बाबरिया अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांनी अशाच प्रकारे इतर काही लोकांची फसवणुक केल्याचे बोलले जाते. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. या दोघांनाही लवकरच चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स पाठविले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
६४ वर्षांची मंजू मदन शर्मा ही मालाडच्या मालवणी परिसरात राहते. त्यांचा कांदिवलीतील चारकोप परिसरात एक फ्लॅट होता. या फ्लॅटची तिने विक्री केली होती. त्यातून तिच्याकडे काही शिल्लक रक्कम होती. याच रक्कमेतून ती हेव्ही डिपॉझिटवर भाड्याने एक फ्लॅट शोधत होती. याच दरम्यान तिच्या परिचित महिलेने तिला कुशान आणि धन्वी बाबरिया यांच्या कांदिवलीतील चारकोप फ्लॅटविषयी माहिती दिली होती. त्यांना त्यांचा फ्लॅट हेव्ही डिपॉझिटवर द्यायचा आहे असे सांगून त्यांना संपर्क साधण्यास सांगितले होते. त्यामुळे ती तिच्या मैत्रिणीसोबत बाबरिया यांच्या कांदिवलीतील चारकोप, हंसराजना एम्पायर, चारकोप जीवन संघर्ष सीएचएसच्या फ्लॅट क्रमांक ए/१५०४ मध्ये गेली होती. तिथेच तिला समीर नाईक नावाच्या एका एजंटने फ्लॅट दाखवला.
फ्लॅट आवडल्याने तिने तो फ्लॅट हेव्ही डिपॉझिटवर घेण्याचा निर्णय घेतला होता. याबाबत तिने कुशान बाबरियाशी सविस्तर चर्चा केली होती. या चर्चेत त्यांच्यात तीस लाखांच्या हेव्ही डिपॉझिटवर फ्लॅट देण्याचे ठरले होते. त्यामुळे तिने त्यांना टप्याटप्याने २५ लाख रुपये दिले होते. याच दरम्यान त्यांच्यात भाडेकरार झाला होता. यावेळी कुशानने तो फ्लॅट त्याच्याच मालकीचे असल्याचे काही कागदपत्रे दाखवून तिचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता. फ्लॅटचे काम करुन त्यांना ताबा देण्याचे त्यांनी मान्य केले होते. यावेळी त्यांच्यात उर्वरित पाच लाखांची रक्कम फ्लॅटचा ताबा दिल्यानंतर देण्याचे ठरले होते.
मात्र दिलेल्या मुदतीत कुशानने फ्लॅटचा ताबा दिला नाही. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी या फ्लॅटसह इतर फ्लॅटची चौकशी सुरु केली होती. यावेळी त्यांना कुशानने दुसर्या फ्लॅटसाठी हेव्ही डिपॉझिट घेऊन त्यांची फसवणुक केल्याची माहिती समजली. त्याने अशाच प्रकारे त्यांनाही गंडा घातला होता. त्यामुळे मंजू शर्माने त्यांच्यासोबतचा भाडेकरार रद्द करुन हेव्ही डिपॉझिट म्हणून दिलेल्या रक्कमेची मागणी सुरु केली होती. यावेळी त्यांनी तिला तीन धनादेश दिले होते, मात्र ते तिन्ही धनादेश बँकेत न वटता परत आले होते. या प्रकारानंतर मंजू शर्माने कुशान बाबरिया आणि त्याची पत्नी धन्वी बाबरिया यांच्याविरुद्ध चारकोप पोलिसात तक्रार केली होती.
ही माहिती समजताच त्याने लवकरात लवकर पैशांची व्यवस्था करण्याचे आश्वासन देत त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करु नका अशी विनंती केली होती. याच दरम्यान त्याने त्यांना एक लाख चाळीस हजार रुपये दिले, मात्र उर्वरित २३ लाख ६० हजार रुपये न देता त्यांची फसवणुक केली होती. त्यामुळे या दोन्ही आरोपी पती-पत्नीविरुद्ध पोलिसांनी हेव्ही डिपॉझिटसाठी घेतलेल्या पैशांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून या दोघांची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे. या चौकशीनंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई होणार आहे.