पत्नीची हत्या करुन पतीची चाकूने गळा कापून आत्महत्या
कौटुंबिक वादातून घडलेल्या प्रकाराने आग्रीपाड्यात शोककळा
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
४ सप्टेंबर २०२६
मुंबई, – पत्नीची हत्या करुन पतीने चाकूने गळा कापून आत्महत्या केल्याची घटना आग्रीपाडा परिसरात उघडकीस आली आहे. मोहम्मद एहसान शेख आणि जन्नत एहसान शेख अशी या पती-पत्नीची नावे असून कौटुंबिक वादातून हा प्रकार घडल्याचे प्राथमिक तपासात उघडकीस आहे. याप्रकरणी आग्रीपाडा पोलिसांनी आरोपी पती एहसान शेख याच्याविरुद्ध हत्येसह आत्महत्येचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान सकाळी उघडकीस आलेल्या या घटनेने परिसरात प्रचंड शोककळा पसरली होती.
एहसान हा त्याची पत्नी जन्नतसोबत आग्रीपाडा येथील कालापाणी चौकाजवळ राहत होता. ते दोघेही सध्या मजुरीचे काम करत होते. काही महिन्यांपूर्वीच त्यांचा विवाह झाला होता. मात्र त्यांच्यात कौटुंबिक वाद सुरु होता. गेल्या काही दिवसांपासून हा वाद विकोपास गेला होता. शुक्रवारी पहाटे पाच वाजता याच कारणावरुन एहसानने जन्नतच्या गळ्यावर घरातील चाकूने वार केले होते. त्यात ती मयत झाल्याचे लक्षात येताच त्याने त्याच चाकूने स्वतच्या गळ्यावर वार करुन आत्महत्या केली होती.
हा प्रकार नंतर स्थानिक रहिवाशांच्या लक्षात येताच त्यांनी आग्रीपाडा पोलिसांना ही माहिती दिली होती. या माहितीनंतर आग्रीपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. रक्तबंबाळ झालेल्या दोघांनाही पोलिसांनी तातडीने नायर हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी आग्रीपाडा पोलिसांनी हत्येसह आत्महत्येचा गुन्हा दाखल केला आहे. प्राथमिक तपासात एहसान आणि जन्नत यांच्यात कौटुंबिक वाद होता. याच वादातून त्याने जन्नतची हत्या करुन स्वत आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे.