मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
३ सप्टेंबर २०२६
मुंबई, (प्रतिनिधी) – चोरीच्या उद्देशाने प्रवेश केलेल्या चोरट्यांनी घरात काहीच सापडले नाही म्हणून गॅसचे दोन बाटले घेऊन पलायन केल्याची घटना कांदिवली परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल होताच तीन आरोपींना समतानगर पोलिसांनी अटक केली. सुमीत संजीत सिंग, चंदन सुनिल तिलक आणि शिवम बलदेव तिवारी ऊर्फ गोर्या अशी या तिघांची नावे आहेत. अटकेनंतर तिघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
४९ वर्षांची तक्रारदार रेश्मा रामचंद्र भुवड ही महिला कांदिवलीतील पोईसर, काजूपाडा, गावदेवी रोडच्या गोविंद मिश्री चाळीत राहते. ती घरकाम तर तिचे पती रामचंद्र भुवड हे एका खाजगी कंपनीत सुपरवायझर म्हणून काम करतात. २५ ऑगस्टला सकाळी नऊ वाजता ती तिच्या पती आणि लहान मुलासोबत ठाकूर कॉम्प्लेक्स येथे कामानिमित्त गेली होती. यावेळी घरी तिचा मोठा मुलगा होता. काही वेळानंतर तोदेखील कामासाठी निघून गेला. यावेळी त्याच्याकडून दरवाज्याला लॉक लावण्याचे राहून गेले होते. दुपारी तीन वाजता ही महिला घरी आली असता तिला घरी चोरी झाल्याचे दिसून आले.
घरात काहीच सापडले नाही म्हणून चोरट्याने घरात प्रवेश करुन दहा हजार रुपयांचे एचपी कंपनीचे दोन गॅस बाटले चोरी करुन पलायन केले होते. हा प्रकार लक्षात येताच तिने समतानगर पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंदवून आरोपींचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी सुमीत सिंग, चंदन तिलक आणि शिवम तिवारी या तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यांनीच ही चोरी केल्याचे उघडकीस आले. चोरीच्या उद्देशाने ते तिच्या घरी गेले होते, मात्र घरात काहीच न सापडल्याने ते गॅसचे दोन बाटले घेऊन पळून गेले होते.
याप्रकरणी गुन्हा दाखल होताच सात दिवसांत तिन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून चोरीचे दोन्ही बाटले पोलिसांनी जप्त केले आहे. चोरीनंतर त्यांनी ते बाटले एका चहा विक्रेत्याकडे ठेवले होते. दोन दिवसांत घेऊन जातो असे सांगून ते निघून गेले होते. अटकेनंतर या तिघांनाही बुधवारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. या तिघांची चौकशी सुरु असून त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.