४९ लाखांच्या फसवणुकीप्रकरणी विकासकाला अटक व कोठडी
मनपाच्या अधिकारी महिलेला फ्लॅटच्या नावाने घातला गंडा
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
५ सप्टेंबर २०२६
मुंबई, – सुमारे ४९ लाखांच्या फसवणुकप्रकरणी भैरव बिल्डर ऍण्ड डेव्हललपर्सचे मालक आणि विकासक जितेंद्र अरुण भिलारे-पाटील याला बोरिवली पोलिसांनी अटक केली. फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. या गुन्ह्यांत त्याची मदतनीस अमीता सिंग ही सहआरोपी असून तिला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले आहे.
४३ वर्षांची तक्रारदार महिला ही बोरिवली परिसरात राहत असून बोरिवलीतील मनपा कार्यालयात माता अणि बालक रुग्णालयात कामाला आहे. बोरिवली परिसरात तिला थ्री बीएचके फ्लॅट घ्यायचा होता. त्यामुळे ती सोशल मिडीयावर फ्लॅटचा शोध घेत होती. ऑगस्ट २०२४ तिला सोशल मिडीयावर जितेंद्र भिलारेविषयी माहिती मिळाली होती. जितेंद्र हा त्याचा पार्टनर अशोक कदम याच्यासोबत बोरिवलीतील न्यू एमएचबी कॉलनीत स्नेहांकुर नावाच्या एका इमारतीचे पुर्नविकास करत असल्याचे समजले. पार्क रिव्हिएरा फेज दोन या नावाने या इमारतीचे बांधकाम होणारहोते. त्यामुळे तिने जितेंद्रची बोरिवलीतील त्याच्या कार्यालयात भेट घेतली होती.
या भेटीत त्याने त्यांच्या प्रोजेक्टची माहिती देताना तिला बी/१७०१ क्रमांकाचा ९०५ चौ. फुटाचा फ्लॅट विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे सांगितले होते. त्याने तिला वीस टक्के रक्कम आगाऊ भरण्यास सांगितले. त्यामुळे तिने अडीच लाखांची टोकन अमाऊंड देऊन फ्लॅट बुक केला होता. काही महिन्यानंतर तिने त्याला टप्याटप्याने ५० लाख ५१ हजार रुपये दिले होते. त्यासाठी तिने तिचे राहते घर बँकेत तारण ठेवून पैशांची व्यवस्था केली होती. या पेमेंटनंतर त्यांच्यात कायदेशीर फ्लॅट खरेदी-विक्रीचा करार झाला होता. मात्र वारंवार मागणी करुनही त्याने फ्लॅटचे कागदपत्रे दिले नाही. त्यात इमारतीचे बांधकाम संथ गतीने सुरु होते.
हा प्रकार संशयास्पद वाटताच तिने जितेंद्रची भेट घेऊन त्यांच्यासोबत फ्लॅटचा व्यवहार कॅन्सल केला होता. तसेच तिच्या पैशांची मागणी सुरु केली होती. याबाबत ती जितेंद्र, त्याची सहाय्यक मानसी पवार आणि वरिष्ठ सहाय्यक अमीता सिंग यांच्याकडे पाठपुाावा करत होती. मात्र या तिघांनी तिला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे तिने जितेंद्रसह अमीता सिंग यांच्याविरुद्ध बोरिवली पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची माहिती मिळताच त्यांनी तक्रारदार महिलेला एका हॉटेलमध्ये बोलावून तिला तीन धनादेश दिले होते. मात्र ते धनादेश बँकेत न वटता परत आले होते. याच दरम्यान त्यांनी तिला एक लाख रुपये परत केले, मात्र ४९ लाख ५१ हजार परत न करता तिची फसवणुक केली होती.
हा प्रकार तिने पोलिसांना सांगून या दोन्ही आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची विनंती केली होती. तिच्या तक्रार अर्जाची शहानिशा केल्यानंतर जितेंद्र भिलारे-पाटील आणि अमीता सिंग या दोघांविरुद्ध फ्लॅटसाठी घेतलेल्या पैशांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच दिड महिन्यानंतर जितेंद्र भिलारे-पाटील याला पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.