खंडणीसाठी आयटीसह क्राईम ब्रॅचचे अधिकारी सांगून कंपनीत बोगस रेड

तीन महिलांसह सहाजणांना अटक करुन खंडणी उकाळणार्‍या टोळीचा पर्दाफाश

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
५ सप्टेंबर २०२६
मुंबई, – आयटीसह क्राईम ब्रॅचचे अधिकारी असल्याची बतावणी करुन कारवाई धमकी देऊन अंधेरीतील एका खाजगी कंपनीतील व्यावसायिकाकडे एक कोटीची मागणी करण्यात आली. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच खंडणी उकाळणार्‍या एका टोळीचा अंधेरी पोलिसांनी पर्दाफाश केला. याच गुन्ह्यांत तीन महिलांसह सहाजणांना पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर या सर्वांना वांद्रे येथील लोकल कोर्टाने गुरुवार १० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अटक आरोपींमध्ये संतोष उदय खोपटकर, विनय रमेश मोरे, प्रेम किसन बसनानी, प्रज्ञा हरिश माईन, रेश्मा शामराव वारंग आणि सबीना हाफिज शेख यांचा समावेश आहे. या गुन्ह्यांत इतर तीन आरोपींना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

४९ वर्षांचे तक्रारदार व्यावसायिक असून ते त्यांच्या पत्नी आणि मुलांसोबत साकिनाका परिसरात राहतात. त्यांचा डोळ्यांची तपासणी आणि ऑपरेशन करण्याच्या मशीन विक्रीचा व्यवसाय आहे. अंधेरीतील चकाला परिसरात त्यांचे एक खाजगी कार्यालय आहे. १७ जुलैला ते त्यांच्या कार्यालयात होते, त्यांच्यासोबत त्यांचे इतर सतरा कर्मचारी होते. सायंकाळी पाच वाजता ते घरी आले होते, यावेळी त्यांना त्यांच्या कर्मचार्‍याने कॉल करुन कार्यालयात आयकर विभागासह गुन्हे शाखेचे पथक आले असून त्यांनी कार्यालयात झडती घेण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी सर्व कर्मचार्‍यांचे मोबाईल ताब्यात घेतले असून सीसीटिव्ही फुटेज बंद केले आहे. यावेळी एका व्यक्तीने त्यांना कार्यालयात बोलावून घेतले. ते आले नाहीतर त्यांच्या घरी येऊन त्यांच्यावर कारवाईची धमकी दिली होती. त्यामुळे ते त्यांच्या पत्नीसोबत कार्यालयात आले होते. यावेळी त्यांच्या कार्यालयात नऊजण उपस्थित होते.

त्यांनी ते आयकर विभागासह गुन्हे शाखेचे अधिकारी असल्याचे सांगून त्यांना त्यांचे ओळखपत्र दाखविले होते. त्यात पाच पुरुष आणि तीन महिलांचा समावेश होता. त्यांनी व्यावसायिक पती-पत्नीला त्यांच्या कार्यालयात कोंडून ठेवले होते. आर्थिक व्यवहाराबाबबत काही प्रश्‍न विचारुन त्यांनी त्यांच्यावर कारवाईची धमकी दिली होती. ही कारवाई होऊ नये म्हणून त्यांनी त्यांच्याकडे एक कोटीची मागणी केली होती. यावेळी त्यांनी त्यांच्याकडे एक कोटी नसल्याचे सांगून त्यांना कायदेशीर नोटीस देण्यास सांगतले. त्यानंतर त्यापैकी एका व्यक्तीने प्रकरण मोठ्या साहेबांकडे गेल्यास त्यांच्यावर मोठी दंडात्मक कारवाई होईल अशी धमकी देत पुन्हा एक कोटीची मागणी केली होती. पैशांची लवकरात लवकर व्यवस्था करा, आम्ही पुन्हा ऑफिसवर येऊ असे सांगून रात्री आठ वाजता ते सर्वजण निघून गेले. या घटनेने तक्रारदारासह त्यांची पत्नी तसेच कार्यालयातील सर्व कर्मचारी प्रचंड घाबरले होते.

ते सर्वजण खरोखरच आयकर आणि गुन्हे शाखेचे अधिकारी समजून त्यांनी पोलिसांत तक्रार केली होती. याच दरम्यान त्यांच्या सीएने याबाबत आयकर विभागासह गुन्हे शाखेत चौकशी केली होती. यावेळी त्यांना त्यांच्या कार्यालयात कोणीही आयकर अधिकारी तसेच गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांना पाठविण्यात आले नव्हते असे समजले. हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी दोन दिवसांपूर्वी अंधेरी पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तीन महिलांसह नऊजणांविरुद्ध तोतयागिरी करुन कार्यालयात बोगस कारवाई करुन खंडणीसाठी धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. या तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत अंधेरी पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पोलिसांनी तपास सुरु केला होता. कार्यालयासह परिसरातील सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या फुटेजवरुन पळून गेलेल्या आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

ही शोधमोहीम सुरु असताना पोलीस आयुक्त देवेन भारती, अतिरिक्त पोलीस आयुक्त अभिनव देशमुख, पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे, सहाय्यक पोलीस आयुक्त योगेश शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश मचिंछर, पोलीस निरीक्षक अतुल निकम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रामदास कदम, पोलीस उपनिरीक्षक रोहन सुर्वे, रामेश्‍वर कर्पे, पोलीस अंमलदार हनुमंत पुजारी, पोलीस हवालदार राहुल घडवले, संदीप शिंदे, पोलीस शिपाई विवेक म्हात्रे, विजयानंद लोंढे, विजय पाटील, मनिष कांबरी, सुशांत पाटील, हरिदास शिंदे, विनायक गवळी, रामदास घुले, दत्ता टरके, पंडित तिगोटे, पडसे, पिसाळ यांनी वेगवेगळ्या परिसरातून संतोष खोटपकर, विनय मोरे, प्रेम बसनानी, प्रज्ञा माईन, रेश्मा वारंग आणि सबीना शेख या सहाजणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.

चौकशीत याच टोळीने बोगस रेड टाकून व्यावसायिकाकडून एक कोटीच्या खंडणीची मागणी केल्याचे तपासात उघडकीस आले. याच गुन्ह्यांत नंतर सहाजणांना पोलिसांनी अटक केली होती. अटकेनंतर त्यांना वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना गुरुवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत इतर तिघांचा सहभाग उघडकीस आला असून त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. या टोळीने अशाच प्रकारे बोगस रेड टाकून व्यावसायिकाकडून खंडणी वसुली केली आहे का, त्यांची गुन्हेगारी पार्श्‍वभूमी आहे का याचा तपास सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page