देवदर्शनाच्या निमित्ताने महिलेची डोंगरावरुन उडी घेऊन आत्महत्या

आजारपणामुळे आलेल्या मानसिक नैराश्यातून आत्महत्या केल्याचे उघड

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
६ सप्टेंबर २०२६
मुंबई, – देवदर्शनासाठी गुजरातहून मुंबईत आलेल्या एका ४५ वर्षांच्या महिलेने अंधेरीतील गावदेवी मंदिर डोंगरावरुन उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी घडली. मोनानी रिटा बेन असे या महिलेचे नाव असून ती मूळची गुजरातची रहिवाशी आहे. तिच्याकडे पोलिसांना सुसायट नोट सापडली असून त्यात तिने आजारपणामुळे आलेल्या मानसिक नैराश्यातून ती जीवन संपवत आहे, तिच्या आत्महत्येला कोणीही जबाबदार नसल्याचे नमूद केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गवस यांनी सांगितले. विशेष म्हणजे मोनानीने यापूर्वीही साबरमती नदीकाठी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे तपासात उघडकीस आला आहे. याप्रकरणी तिच्या कुटुंबियांची जबानी नोंदविण्यात आली असून या जबानीत त्यांनी कोणावर संशय व्यक्त केला नाही. त्यामुळे डी. एन नगर पोलिसांनी एडीआरची नोंद करुन तपास सुरु केला आहे.

मोनानी ही तिच्या कुटुंबियांसोबत गुजरातच्या कच्छ, गांधीग्रामच्या चावला चौक, एसडीएक्स साऊथमध्ये राहत होती. तिला तोंडाचा कॅन्सर होता. त्यातून तिला प्रचंड वेदना होत होत्या. त्यामुळे तिच्यावर कॅन्सर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. मात्र या उपचारातून तिला काहीच फरक जाणावत नव्हता. त्यामुळे तिला प्रचंड मानसिक नैराश्य आले होते. त्यातून तिने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता. काही महिन्यांपूर्वी तिने साबरमती नदीकाठी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मात्र नदीत उडी घेतलेल्या मोनानीला काही लोकांनी वाचविले होते. अलीकडेच मोनानी ही तिच्या कुटुंबियासोबत मुंबईत देवदर्शनासाठी आली होती.

शनिवारी ते सर्वजण प्रभादेवी येथील सिद्धीविनायक मंदिरात गेले होते. तिथे दर्शन घेतल्यानंतर ते अंधेरीतील गावदेवी डोंगरावर असलेल्या गावदेवी मंदिरात आले होते. तिथे दर्शन घेतल्यानंतर तिचे कुटुंबिय मंदिरात बसले होते. यावेळी मोनानी ही मंदिराबाहेर आली. तिने डोंगराच्या खाली काय आहे हे पाहण्याचा बहाणा करुन डोंगरावरुन उडी घेतली होती. हा प्रकार तिच्या कुटुंबियांना समजताच त्यांना धक्काच बसला होता. या माहितीनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गवस यांच्यासह डी. एन नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.

जखमी अवस्थेत मोनानीला तातडीने कूपर हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले होते. तिच्याकडे पोलिसांना सुसायट नोट सापडले आहे. त्यात तिने तोंडाच्या कॅन्सरने तिला प्रचंड वेदना होत आहेत, त्यामुळे ती आत्महत्या करत असून तिच्या आत्महत्येला कोणीही जबाबदार नाही असे नमूद केले आहे. या सुसायट नोटनंतर तिच्या कुटुंबियांची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. त्यांनीही तिच्या आत्महत्येबाबत कोणावर संशय व्यक्त केला नाही किंवा तक्रार केली नव्हती. त्यामुळे पोलिसांनी एडीआरची नोंद केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page