गुंतवणुकीवर पाच टक्के परताव्याचे गाजर दाखवून ४७ लाखांची फसवणुक
वयोवृद्धेला गंडा घालणार्या वॉण्टेड आरोपीस अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
८ सप्टेंबर २०२६
मुंबई, – गुंतवणुकीवर पाच टक्के परताव्याचे गाजर दाखवून एका वयोवृद्ध महिलेची सुमारे ४७ लाखांची फसवणुक केल्याच्या गुन्ह्यांत वॉण्टेड असलेल्या एका आरोपीस तीन महिन्यानंतर कस्तुरबा मार्ग पोलिसांनी अटक केली. धीरज संतोष भारद्वाज असे या आरोपीचे नाव असून याच गुन्ह्यांत तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.
६५ वर्षांच्या तक्रारदार वयोवृद्ध शुभांगी रमेश सावंत या बोरिवलीतील विठ्ठलनगरात राहतात. तिचे पती एका नामांकित बँकेत मॅनेजर म्हणून कामाला होते, कोव्हीड काळात त्यांचे निधन झाले होते. तिची नात त्रिशा ही बोरिवलीतील एका खाजगी शाळेत शिकत असून तिची अपर्णा ही वर्गमैत्रिण आहे. तिची आई कामाक्षी गगन नरुला पालक मिटींगसह ओपन हाऊसमध्ये भेटत असल्याने त्यांची चांगली ओळख झाली होती. कामाक्षीचा धीरज भारद्वाज हा भाऊ असून त्यानेच तिचा मुलगा अभिजीत आणि सून नेहल सावंत यांना एका आकर्षक योजनेत गुंंतवणुक करण्यास सांगितले होते. या गुंतवणुकीवर त्यांना पाच टक्के परताव्याचे आमिष दाखविले होते. त्यामुळे तिच्या मुलासह सूनेने एफडी तोडून शुभांगी सावंत हिच्या नावाने गुंतवणुक करण्याचा निर्णय घेतला होता.
याबाबत त्यांच्यात जुलै २०२४ रोजी एक करार झाला होता. या करारानंतर त्यांनी धीरजला ४७ लाख रुपये गुंतवणुकीसाठी दिले होते. या गुंतवणुकीवर धीरजने त्यांना ऑगस्ट २०२४ ते एप्रिल २०२५ या कालावधीत पाच टक्क्याप्रमाणे २३ लाख ४७ हजार रुपये परतावा दिला आहे. त्यांच्यात ठरलेल्या कराराप्रमाणे २ लाख ३५ हजार रुपये अपेक्षित होते. मात्र ठरल्याप्रमाणे त्याने परताव्याची रक्कम दिली नाही. त्यामुळे त्यांनी गुंतवणुक केलेल्या मूळ रक्कमेची त्यांच्याकडे मागणी सुरु केली होती. मात्र तो तिला विविध कारण सांगून टाळण्याचा प्रयत्न करत होता. सतत पैशांची मागणी होत असल्याने त्याने तिचा फोन ब्लॉक केला होता.
धीरजकडून फसवणुक झाल्याचे लक्षात येताच तिने कस्तुरबा मार्ग पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर धीरज भारद्वाजविरुद्ध पोलिसांनी पाच टक्के परताव्याचे आमिष दाखवून ४७ लाख रुपयांच्या गुंतवणुक केलेल्या रक्कमेचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.
मात्र गुन्हा दाखल होताच धीरज हा पळून गेला होता. त्यामुळे त्याचा पोलिसांकडून शोध सुरु होता. ही शोधमोहीम सुरु असतानाच गेल्या तीन महिन्यांपासून वॉण्टेड असलेल्या धीरजला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. पोलीस कोठडीनंतर त्याला कोर्टाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.