रॉबरीच्या गुन्ह्यांतील वॉण्टेड आरोपीस २१ वर्षांनी फेरअटक

मुंबईतून पळून गेल्यानंतर तामिळनाडूच्या गावी गेल्याचे उघड

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
९ सप्टेंबर २०२६
मुंबई, – रॉबरीच्या गुन्ह्यांतील एका वॉण्टेड आरोपीस २१ वर्षांनी खार पोलिसांनी फेरअटक केली. मुत्तूकृष्णन रामकृष्णन अरुणतुद्दी असे या आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. जामिनावर बाहेर आल्यानंतर मुत्तूकृष्णन हा मुंबईतून पळून गेला होता, गेल्या काही वर्षांपासून तो तामिळनाडू येथील त्याच्या गावी वास्तव्यास होता, आता पोलीस पकडणार नाही असे त्याला वाटत होते, मात्र त्याला २१ वर्षांनी फेरअटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.

मुत्तूकृष्णन हा माहीम परिसरात राहत होता. २००५ साली त्याच्याविरुद्ध खार पोलीस ठाण्यात एक रॉबरीचा गुन्हा दाखल झाला होात. याच गुन्ह्यांत त्याला पोलिसांनी अटक केली होती. न्यायालयीन कोठडीत असताना त्याने जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जावर सुनावणी होऊन त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टाने जामिन मंजूर केला होता. मात्र जामिनावर बाहेर येताच तो मुंबईतून पळून गेला होता. तो खटल्याच्या सुनावणीसाठी सतत गैरहजर राहत होता. त्यामुळे त्याच्याविरुद्ध ४ ऑगस्ट २०२३ रोजी कोर्टाने जाहीरनामा जारी केला होता. तसेच त्याच्या अटकेचे आदेश खार पोलिसांना दिले होते.

या आदेशानंतर पोलिसांनी त्याचा शोध सुरु केला होता. त्याच्या माहीम येथील राहत्या घरी पोलिसांनी पाहणी केली होती, मात्र तो मुंबईतून पळून गेल्याचे पोलिसांना समजले होते. तरीही पोलिसांनी त्याचा शोध सुरु ठेवला होता. ही शोधमोहीम सुरु असताना मुत्तूकृष्णन हा त्याच्या जामिळनाडू येथील गावी वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष काटे, पोलीस निरीक्षक सचिन वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिनेश पाटील, पोलीस हवालदार गुरव, पोफळे, पोलीस शिपाई ठोंबरे आदीचे एक पथक तामिळनाडू येथै पाठविण्यात आले होते.

या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने गेल्या २१ वर्षांपासून वॉण्टेड असलेल्या मुत्तूकृष्णनला ताब्यात घेतले होते. चौकशीत तोच रॉबरीच्या गुन्ह्यांतील वॉण्टेड आरोपी असल्याचे उघडकीस आले होते.अटकेनंतर त्याला पुढील कारवाईसाठी मुंबईत आणण्यात आले होते. त्याला नंतर वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. २१ वर्षांनी आरोपीला फेरअटक करणार्‍या पोलीस पथकाचे वरिष्ठांकडून कौतुक करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page