भांडणात मध्यस्थी केली म्हणून सोळा वर्षांच्या मुलाला चाकूने भोसकले
आरोपी मुलाविरुद्ध हत्येसह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
११ सप्टेंबर २०२६
मुंबई, – भांडणात मध्यस्थी केली म्हणून एका सोळा वर्षांच्या मुलावर त्याच्याच मित्राने चाकूने भोकसल्याची घटना गोवंडीतील शिवाजीनगर परिसरात उडकीस आली आहे. या हल्ल्यात हमीद कासिमउद्दीन अन्सारी हा मुलगा गंभीररीत्या जखमी झाल्याने त्याच्यावर सायन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे. याप्रकरणी अनस या आरोपी मित्राविरुद्ध शिवाजीनगर पोलिसांनी हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.
ही घटना बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजता गोवंडीतील शिवाजीनगर, बीएमसी स्कूल तीन समोरील रोड क्रमांक तेराजवळ घडली. कासिमउद्दीन लियाज अन्सारी हे गोवंडीतील बैंगनवाडी परिसरात ाहत असून शिलाई काम करतात. त्यांचा सोळा वर्षांचा मुलगा हमीद हा गोवंडीतील एका शाळेत दहावीत शिकतो. सकाळी सात ते साडेबारा वाजता तो शाळेत तर दुपारी तीन ते पाच वाजता खाजगी क्लासला जातो. बुधवारी ९ सप्टेंबरला तो नेहमीप्रमाणे शाळेत गेला होता. सकाळी साडेदहा वाजता जेवणाची सुट्टीच्या हमीदच्या मित्राने अनस नावाच्या एका विद्यार्थ्याला डोक्यावर टपली मारली होती. याच कारणावरुन त्यांच्यात वाद झाला होात. या वादात हमीदने मध्यस्थी करुन त्यांच्यातील वाद मिटविण्याचा प्रयत्न केला होता.
हा प्रकार शिक्षकांना समजताच त्यांनी वाद घालणार्या दोन्ही मुलांना समज दिली होती. त्याचा अनसच्या मनात प्रचंड राग होता. बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजता हमीद आणि त्याचा मित्र जावेद हे दोघेही खाजगी क्लासवरुन घरी जात होते. यावेळी तिथे अनस आला आणि त्याने सकाळी झालेल्या भांडणात त्याने मध्यस्थी का केली याचा जाब विचारला होता. याच कारणावरुन त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली होती. काही कळण्यापूर्वीच अनसने त्याच्याकडील चाकूने हमीदवर वार केले होते. त्यात त्याच्या पोटाला आणि छातीला गंभीर दुखापत झाली होती. या हल्ल्यानंतर तो तेथून पळून गेला.
हा प्रकार स्थानिक लोकांच्या लक्षात येताच त्यांनी रक्तबंबाळ झालेल हमीदला तातडीने जवळच्या एका खाजगी क्लिनिकमध्ये दाखल केले. तिथे त्याच्यावर प्राथमिक औषधोपचार करण्यात आले होते. या उपचारानंतर त्याला पुढील उपचारासाठी सायन हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले. हा प्रकार नंतर त्याने त्याच्या वडिलांना सांगितला होता. त्यामुळे ते तिथे गेले आणि त्याला सायन हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथेच त्याच्यावर उपचार सुरु असून त्याची प्रकृती स्थिर आहे.
या घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी कासिमउद्दीन अन्सारी यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी अनसविरुद्ध हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.