फसवणुकीसाठी सिमकार्डसह बॅक खाती उघडणार्या तिघांना अटक
दहा बँक खात्यात २४ कोटीची फसवणुक तसेच सायबर पोर्टलवर ३२ तक्रारी
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
११ सप्टेंबर २०२६
मुंबई, – ऑनलाईन फसवणुकीसाठी सिमकार्ड ऍक्टिव्ह करुन विविध बँक खाती उघडणार्या एका टोळीचा गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी पर्दाफाश केला आहे. याच गुन्ह्यांत पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. इस्लामुद्दीन सलीमउद्दीन शेख, यासीर नसरुद्दीन शेख आणि शेख अब्दुल रज्जाक शेख रौफ अशी या तिघांची नावे असून ते तिघेही पनवेलचे रहिवाशी आहे. अटकेनंतर या तिघांनाही किल्ला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या कारवाईत पोलिसांनी विविध बँकेचे ८८ पासबुक, १४३ चेकबुक, शंभर एटीएम कार्ड, बँकेचे इतर दस्तावेज, विविध कंपन्यांचे २४ मोबाईल, १६७ सिमकार्ड, दोन लॅपटॉप आणि इतर साहित्य जप्त केले आहेत. आरोपींनी उघडलेल्या दहा बँक खात्यात आतापर्यंत २४ कोटीचे ऑनलाईन व्यवहार झाले असून सायबर पोर्टल आतापर्यंत ३२ तक्रारी प्राप्त झाल्याचे उघडकीस आले आहे. या आरोपींनी ऑनलाईन फसवणुकीसाठी आतापर्यंत २८९८ सिमकार्डचा वापर केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
गेल्या काही वर्षांत ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यांत लक्षणीय वाढ झाली आहे. या गुन्ह्यांचा तपास करताना पोलिसांना सायबर ठग त्यांच्या सहकार्यांच्या मदतीने विविध बँकेत खाती उघडत होते. याच बँक खात्यात फसवणुकीची रक्कम जमा केली जात होती. ही रक्कम नंतर मुख्य सायबर ठगांना दिली जात होती. याकामासाठी संबंधित खातेदारांना ठराविक रक्कमेचे कमिशन दिले जात होते. त्यामुळे मुंबई पोलिसांनी अशा खातेदाराविरुद्ध विशेष मोहीम हाती घेतली होती. फसवणुकीसाठी सायबर ठगांना बँक खाती पुरविणार्या आरोपींचा शोध सुरु असताना अशाच एका टोळीची माहिती युनिट पाचच्या अधिकार्यांना प्राप्त झाली होती.
या माहितीनंतर पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त अनिल कुंभारे, अतिरिक्त पोलीस आयुक्त कृष्णकांत उपाध्याय, पोलीस उपायुक्त राजतिलक रौशन, सहाय्यक पोलीस आयुक्त सदानंद राणे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट पाचच्या प्रभारी पोलीस निरीक्षक रोहिणी पोतदार, पोलीस निरीक्षक रविंद्र तेलतुंबडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक धनराज चौधरी, सचिन बाराते, पोलीस उपनिरीक्षक इंगोले, नितीन पालांडे, अजय पोवार,महेश अंजनवाड, अंकुश न्यायनिर्गुणे, सहाय्यक फौजदार घाडगे, निरभवणे, पोलीस हवालदार तानाजी पाटील, मुलानी, काळे, लोहकरे, बनसोडे, पोलीस शिपाई भाऊसो पवार आदी पथकाने संबंधित आरोपींची माहिती काढून त्यांच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेतली होती.
ही शोधमेाहीम सुरु असतानाच या पथकाने दोन वेगवेगळ्या कारवाईत इस्लामुद्दीन शेख, यासीर शेख आणि शेख अब्दुल या तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत ते तिघेही ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यांतील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याचे उघडकीस आले होते. तिन्ही आरोपी त्यांच्या इतर सहकार्यांच्या मदतीने विविध मोबाईल कंपन्यांचे सिमकार्ड घेत होते. ते सिमकार्ड ऍक्टिव्ह करुन त्याआधारे विविध बँकेत खाती उघडत होते. मोबाईलचे लिंक बँक खात्याशी जोडत होते. त्यानंतर बँकेतून चेकबुक, पासबुक, एटीएम कार्ड आणि बॅकेशी संबंधित दस्तावेज मिळवत होते.या बँक खात्याचे नियंत्रण स्वतजवळ ठेवत होते. त्याचा वापर ही टोळी ऑनलाईन फसवणुकीसाठी करत होती.
यातील इस्लामुद्दीन शेख हा पनवेलच्या तळोजा येथील लाभेश्वर इमारतीच्या सी विंग, दहाव्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक १००२, यासीर शेख हा पनवेलच्या तळोजा फेज दोन, प्लॉट क्रमांक एक, सेक्टर २८, रायगड सोसायटी आणि शेख अब्दुल हा पनवेलच्या रायगडच्या तळोजा परिसरात राहतो. या तिघांच्या घराची झडती घेतल्यानंतर पोलिसांना विविध बँकेचे महत्त्वाचे दस्तावेज, मोबाईलसह सिमकार्ड सापडले. संबंधित सर्व मुद्देमाल नंतर पोलिसांनी ताब्यात घेतले होते. प्राथमिक तपासात या आरोपींनी उघडलेल्या दहा बँक खात्यात ऑनलाईन फसवणुकीचे सुमारे २४ कोटी रुपये जमा झाल्याचे दिसून आले आहे.
याबाबत सायबर पोर्टलवर आतापर्यंत ३२ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. तांत्रिक तपासात आरोपींनी गेल्या काही वर्षांत २८९८ सिमकार्डचा सायबर फसवणुकीसाठी वापर केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. अटकेनंतर तिन्ही आरोपींना शुक्रवारी किल्ला कोर्टात हहजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना शनिवार १९ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
ऑनलाईन फसवणुकीसाठी सिमकार्ड ऍक्टिव्ह करुन विविध बँकेत खाती उघडणारी ही रेकॉर्डवरील सराईत टोळी आहे. त्यांच्या चौकशीतून इतर काही आरोपींचे नावे समोर आले आहे. त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. तिन्ही आरोपींची पोलिसांकडून चौकशी सुरु असून या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे बाहेर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.