कौटुंबिक वादातून मोठ्या भावाची बेदम मारहाण करुन हत्या
हत्येच्या गुन्ह्यांत आरोपी भावाला अटक व पोलीस कोठडी
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
११ सप्टेंबर २०२६
मुंबई, – कौटुंबिक वादातून सचिन जावले या ४६ वर्षांच्या मोठ्या भावाची त्याच्याच लहान भावाने बेदम मारहाण करुन हत्या केल्याची घटना मलबार हिल परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल होताच आरोपी भाऊ सुहास जावले याला मलबार हिल पोलिसांनी अटक केली असून हत्येच्या याच गुन्ह्यांत त्याला गिरगाव कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. भावानेच भावाची हत्या केल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली होती.
ही घटना गुरुवारी रात्री उशिरा दोन ते सकाळी पावणेअकराच्या सुमारास मलबार हिल येथील बाणगंगा रोड, बैजू चकलदास घाट परिसरात घडली. तेथीलच रुम क्रमांक सहामध्ये जावले बंधू राहत होते. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यात कौटुंबिक वाद होता. या वादातून त्यांच्यात सतत खटके उडत होते. गुरुवारी रात्री त्यांच्यात क्षुल्लक कारणावरुन वाद झाला होता. या वादानंतर रागाच्या भरात सुहासने त्याचा मोठा भाऊ सचिन याला बेदम मारहाण केली होती.
लाथ्याबुक्यांनी केलेल्या मारहाणीत त्याच्या डोक्याला, तोंडाला, छातीला आणि पोटाला गंभीर दुखापत झाली होती. त्यात तो बेशुद्ध पडला होता. त्यामुळे त्याला तातडीने जवळच्या शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले होते. या घटनेची माहिती मिळताच मलबार हिल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
याप्रकरणी जावले यांचा भाचा राजेश रामलखन परदेशी याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच आरोपी भाऊ सुहास जावले याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते, यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.