२.२८ कोटीचे सोन्याचे बारसह विदेशी चलन घेऊन पलायन

बंगलोरला पळून गेलेल्या दोन्ही आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
११ सप्टेंबर २०२६
मुंबई, – नवीन व्यवसायासाठी दुबईहून आणलेल्या २ कोटी २८ लाख रुपयांच्या दिड किलोच्या दोन सोन्याच्या विटा आणि विदेशी चलन आदी मुद्देमाल घेऊन दोन आरोपींनी पलायन केल्याची घटना छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर घडली. नियास मोहम्मद काटुमादथील आणि मोहम्मद हारिस थुंबथोडी अशी या दोघांची नावे असून ते दोघेही बंगलोरला पळून गेल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्यामुळे त्यांच्या अटकेसाठी स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेचे अधिकार्‍यांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

६७ वर्षांचे वयोवृद्ध तक्रारदाार अब्दुल रज्जाक उभरभाई सौदागर हे मूळचे गुजरातच्या सुरतचे रहिवाशी असून ते कापड व्यापारी आहेत. त्यांची प्रिंस एक्स नावाची एक कपड्याची कंपनी असून गेल्या चार महिन्यांपासून त्यांचा व्यवसाय बंद आहे. त्यामुळे ते नवीन व्यवसायाच्या शोधात होते. व्यवसायानिमित्त ते अनेकदा दुबईत जात होते. तिथेच त्यांची केरळचा रहिवाशी असलेला मोहम्मद असिफशी ओळख झाली होती. गेल्या दोन वर्षांपासून ते दोघेही एकमेकांच्या परिचित होते. त्याचा दुबईत सोने विक्रीचा व्यवसाय होता. त्यामुळे त्यांनी त्याला संपर्क साधून एका चांगल्या व्यवसायाची माहिती देण्याची विनंती केली होती. त्याने त्यांना त्यांच्यासोबत सोने विक्रीचा व्यवसाय करण्याचा सल्ला दिला होता. दुबईतून सोने खरेदी करुन कस्टम ड्युटी भरुन त्याची भारतात विक्री करायचा असे सांगितले.

या व्यवसायात प्रचंड फायदा असल्याचे मोहम्मद आसिफने सांगितले होते. त्याला कस्टम क्लिअरन्सची माहिती होती. त्यामुळे दुबईतून सोने आणणे सहज सोपे होते. दुबईतून आणलेल्या सोन्याची विक्री करुन मिळणारा प्रॉफिट ५०/५० वाटून घेऊ असे सांगितले. त्याचा प्रपोजल चांगला वाटल्याने त्यांनी त्याच्यासोबत सोने खरेदी-विक्रीचा व्यवसाय सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. या व्यवसायासाठी त्यांनी त्यांचा परिचित व्यावसायिक मोहम्मद अली मोहम्मद आबिद वाडीवाला यांच्याकडे काही पैसे उसने घेतले होते. ठरल्याप्रमाणे १२ ऑगस्टला ते दुबईला गेले होते. तिथे त्यांनी मोहम्मद अलीच्या क्रेडिटवर एका खाजगी कंपनीकडून १ कोटी ९५ लाख रुपयांचे एक किलो आणि अर्धा किलो सोन्याचे बार खरेदी केले होते. त्यांच्याच क्रेडिटवर त्यांना ३३ लाख ३५ हजार रुपयांचे १ लाख २८ हजार एईडी दिराम मिळाले होते.

१५ ऑगस्टला ते दुबईहून मुंबईला येण्यासाठी निघाले होते. यावेळी मोहम्मद आसिफने त्यांच्यासोबत त्यांा परिचित नियास मोहम्मद हादेखील त्याच विमानाने प्रवास करत आहे असे सांगितले. काही वेळानंतर त्यांची दुबई विमानतळावर नियास मोहम्मदशी भेट झाली होती. या भेटीनंतर त्यांनी मोहम्मद आसिफला कॉल केला होता. यावेळी त्याने त्यांना नियास मोहम्मद हा त्याचा परिचित विश्‍वासू व्यक्ती आहे. त्यांना काहीही अडचण असल्यास तो त्यांना मदत करेल असे सांगितले. त्यामुळे त्यांना त्याच्यावर विश्‍वास बसला होता. प्रवासादरम्यान तो त्याच्याच शेजारी बसला होता. त्यांची काळजी घेत होता. रात्री पावणेनऊ वाजता ते दोघेही मुंबई विमानतळावर आले होते. यावेळी नियाज मोहम्मदने त्यांची बॅग घेतली होती.

याच बॅगेत त्यांनी १ कोटी ९५ लाख रुपयांचे एक आणि अर्धा किलोचे दोन सोन्याचे बार, ३३ लाख ३५ हजार रुपयांचे १ लाख २८ हजार एईडी दिराम असा २ कोटी २८ लाख ३५ हजार २९० असा मुद्देमाल ठेवला होता. इमिग्रेशनची प्रक्रिया सुरु असताना त्यांना नियास मोहम्मद हा घाईघाईने विमानतळावर बाहेर जात असल्याचे दिसून आले. ते आजारी असल्याने त्यांना जोरात चालता येत नव्हते. तो त्यांची सोन्याचे बार आणि विदेशी चलन असलेली बॅग घेऊन पळून जात असल्याचे दिसताच त्यांनी त्याला आवाज देण्याचा प्रयत्न केला. मात्र तो बॅग घेऊन पळून जाण्यात यशस्वी झालाप होता. चौकशीनंतर नियाज मोहम्मद हा मुंबईहून बंगलोरला निघून गेल्याचे समजले. त्यांच्याकडे तिकिट नसल्याने त्यांना तिथे जाण्यास सुरक्षारक्षकांनी अटकाव केला होता.

यावेळी मोहम्मद आसिफ हा त्यांना घेण्यसाठी मुंबईत विमानतळावर आला होता. त्यांनी त्याला घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर त्यांनी नियाज मोहम्मद मोहम्मदला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने त्यांचे कॉल घेतले नाही. या प्रकारानंतर अब्दुल रज्जाक सौदागर यांना प्रचंड मानसिक धक्का बसला होता, त्यांची प्रकृती बिघडली होती. यावेळी मोहम्मद आसिफने त्यांना धीर देत सोने आणि विदेशी चलन मिळतील असे सांगून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. चौकशीत नियाज मोहम्मद याने मोहम्मद हारिस याच्या मदतीने ही चोरी केल्याचे उघडकीस आले. ते दोघेही मित्र असून त्यांच्या परिचित आहेत.

प्रवासादरम्यान नियाज मोहम्मदसोबत मोहम्मद हारिस हादेखील विमानातून प्रवास करत होता. या दोघांनीच संगनमत करुन सोन्याचे बार आणि विदेशी चलनाचा अपहार करुन त्यांची फसणुक केली होती. पंधरा ते वीस दिवस उलटूनही त्यांना सोन्याचे बार आणि विदेशी चलन सापडले नाही. त्यामुळे त्यांनी सहार पोलिसांना घडलेला प्रकार सांगून या दोन्ही आरोपींविरुद्ध सहार पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर नियाज मोहम्मद आणि मोहम्मद हारिस यांच्याविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page