विद्यार्थ्याकडून २४ लाखांची खंडणी वसुली करणारा गजाआड
प्रितम ऍड पेट्रो वेबसिरीजमधील खलनायकाची भूमिका पाहून खंडणीची मागणी
अरुण सावरटकर
१३ सप्टेंबर २०२६
मुंबई, – परिक्षेत गैरप्रकार झाल्याचा आरोप करुन एका नामांकित महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला त्याला महाविद्यालयातून काढून टाकणार. तुझे नाव ब्लॅकलिस्ट करणार, तुला भविष्यात कुठल्याही कॉलेजमध्ये प्रवेश मिळणार नाही. त्यामुळे त्याचे शैक्षणिक वर्ष कायमचे उद्धस्त होईल अशी भीती दाखवून ब्लॅकमेल करुन २४ लाख ६४ हजार ३२० रुपयांची खंडणी वसुली केल्याप्रकरणी वॉण्टेड असलेल्या एका आरोपीस बांगुरनगर पोलिसांनी अटक केली. आलोक मदनमोहन केशरी असे या २४ वर्षीय आरोपीचे नाव असून तो मूळचा उत्तरप्रदेशचा रहिवाशी आहे. त्याला हरियाणा येथून अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. प्रितम ऍण्ड पेट्रो या वेबसिरीजमधील खलनायकाच्या पात्राने प्रभावित होऊन त्याने तक्रारदार विद्यार्थ्याला ब्लॅकमेल करुन खंडणी वसुली केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. याच गुन्हयांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.
२१ वर्षांचा तक्रारदार तरुण मालाडच्या चिंचोली व्हिलेज परिसरात राहत असून सध्या तो एमआयएमएस सेंटर फॉर डिस्टन्स ऍण्ड ऑनलाईन लर्निंग (एनएमआयएमएस) या संस्थेत शिकतो. जानेवारी २०२६ च्या बॅचसाठी त्याने ऑनलाईन एमबीए-फायनान्स या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला होता. या अभ्यासक्रमाचय प्रवेशाबाबत चौकशी करताना त्याला आलोक केशरीने कॉल केला होता. त्याने तो एनएमआयएमएस संस्थेचा अधिकृत कर्मचारी असून स्टुडंट कौन्सिलर या पदावर काम करत असल्याचे सांगितले. त्याला त्याच्या प्रवेशासह अभ्यासक्रमाबाबत सर्व माहिती होती. त्यामुळे त्याच्याावर त्याचा विश्वास बसला होता. त्यामुळे त्याने त्याला त्याचे शैक्षणिक गुणपत्रिका, फोटोसह इतर कागदपत्रे दिली होती. त्यासाठी तो त्याला पृथ्वी कॅफेमध्ये भेटला होता. प्रवेशाची सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्याला त्याचे लॉगिन पोर्टल, संस्थेकडून घरपोच पुस्तक पाठविण्यात आली होती.
परिक्षा जवळ आल्यानतर आलोकने त्याला पुन्हा कॉल करुन परिक्षेत काहीही अडचण आल्यास तो त्याला मदत करण्याचे आश्वासन दिले होते. जून २०२६ रोजी ऑनलाईन परिक्षा सुरु असताना परिक्षा प्रणालीवर गैरप्रकार होत असल्याचे संकेत दिसत आहे असा एक मॅसेज आला होता. त्याने परिक्षेत कुठलाही गैरप्रकार केला नव्हता, त्यामुळे त्याने ही बाब आलोकच्या निदर्शनास आणून दिली होती. २१ जूनला पुन्हा असा ऍलर्ट असलेला मॅसेज व्हायरल झाला आणि परिक्षेचे ऍप्लिकेशन बंद करण्यात आले. काही वेळानंतर आलोकने त्याला फोन करुन त्याने परिक्षेत गैरप्रकार केला आहे का याबाबत विचारणा केली होती. यावेळी त्याने परिक्षेत कुठलाही गैरप्रकार केला नाही असे सांगूनही त्याने त्याच्या मनात भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यावर परिक्षेत गैरप्रकार केल्याचा ठपका आल्याने तुला कॉलेजमधून काढून टाकणार. तुझे नाव ब्लॅकलिस्ट करणार, तुला भविष्यात कुठल्याही कॉलेजमध्ये प्रवेश मिळणार नाही. त्यामुळे त्याचे शैक्षणिक वर्ष कायमचे उद्धस्त होईल असे सांगून त्याला घाबरविण्याचा प्रयत्न केला.
काही वेळानंतर त्याने तो कॉलेजचा अधिकृत प्रतिनिधी असल्याचे सांगून त्याला त्याचे वजन आणि ओळख दाखवून क्लिनचीट देण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी त्याने त्याच्याकडे पैशांची मागणी केली. शैक्षणिक करिअर उद्धवस्त होणार या भीतीपोटी तसेच आलोकने मदत करण्याचे आश्वासन दिल्याने त्याने त्याला पैसे देण्याची तयारी दर्शविली होती. त्याचे वडिल बांधकाम व्यावसायिक असल्याने ते व्यवसायातील काही रक्कम त्याच्या बँक खात्यात ट्रान्स्फर करत होते. हीच रक्कम त्याने आलोकला दिली होती. ११ जून ते २६ ऑगस्ट २०२६ या कालावधीत त्याने त्याच्या दोन्ही बँक खात्यातून आलोकला १३ लाख ६३ हजार ५२० आणि ११ लाख ८०० रुपये असे २४ लाख ६४ हजार ३२० रुपये ट्रान्स्फर केले होते. ही रक्कम मिळाल्यानंतर त्याला अंतर्गत पातळीवर प्रकरण मिटवून त्याला क्लिनचिट देतो असे सांगितले होते. तसेच काम न झाल्यास त्याला त्याची संपूर्ण रक्कम परत करण्याचे आश्वासन दिले होते. त्याचा विश्वास बसावा म्हणून त्याने त्याला १ लाख १५ हजार रुपये पाठविले होते.
याच दरम्यान त्याचा पहिल्या सेमिटरचा निकाल लागला होता, त्यात तो उत्तीर्ण झाला होता. यावेळी आलोकने त्याला निकाल लागला असला तरी तो अद्याप ब्लॅकलिस्ट आहेस, प्रकरण अजून संपले नाही. त्यासाठी त्याला आणखीन पैसे द्यावे लागेल असे सांगून त्याला ब्लॅकमेल करुन पैशांची मागणी सुरु केली होती. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने त्याने चौकशी सुरु केली होती. यावेळी त्याला आलोकने केवळ पैशांसाठी त्याला शैक्षणिक करिअर उद्धवस्त करण्याची धमकी देऊन त्याच्याकडून पैशांची मागणी केली. इतकेच नव्हे तर त्याच्याकडून २४ लाख ६४ हजार ३२० रुपये घेतले. ही रक्कम घेतल्यानंतर तो त्याला ब्लॅकमेल करुन पैशांची मागणी करत होता. आलोककडून फसवणुक होत असल्याचे लक्षात येताच त्याने बांगुरनगर पोलिसांना घडलेला प्रकार सांगून आलोकविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची वरिष्ठांना गंभीर दखल घेत बांगुरनगर पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते.
या आदेशानंतर आलोकच्या मोबाईलचे सीडीआर काढण्यात आले होते. त्यात तो हरियाणा येथे वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती. या माहितीनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयवंत पवार, पोलीस निरीक्षक विराज जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मंगेश किरपेकर, पोलीस हवालदार गोसावी, आचार्य, पांजरी, पोलीस शिपाई मगर, शिंदे आदी पथक हरियाणा येथे पाठविण्यात आले होते. या पथकाने गुरुग्रामच्या फेज तीन, यू ब्लॉक येथून आलोकला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत त्याने या गुन्ह्यांची कबुली दिली. काही दिवसांपूर्वी त्याने प्रितम ऍण्ड मेंट्रो ही लोकप्रिय वेबसिरीज पाहिली होती. त्यात मुख्य खलनायकाच्या पात्राने व त्याच्या डिजीटल गुन्हेगारी पद्धतीने आरोपी अत्यंत प्रभावित झाला होता. त्याचे अनुकरण करुन त्याने समोरील व्यक्तीच्या मानसिक भीतीचा फायदा घेऊन तोतयागिरी करुन हा गुन्हा केला होता.
पैसे मिळाल्यानंतर त्याने डिजीटल ट्रक नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. या कबुलीनंतर त्याला पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले होते. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. आलोक हा मूळचा उत्तरप्रदेशच्या मिर्झापूर, महुवारियाचा रहिवाशी आहे. सध्या तो हरियाणा गुरुग्राम, ग्राम कन्हाई, सेक्टर ४५, मकान क्रमांक साठमध्ये राहत होता. त्याचा मोबाईल पोलिसांनी जप्त केला आहे.