तीन वेगवेगळ्या अपघातात अज्ञात व्यक्तीसह तिघांचा मृत्यू

तीन स्वतंत्र अपघाताची नोंद करुन दोघांवर अटकेची कारवाई

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१३ सप्टेंबर २०२६
मुंबई, – तीन वेगवेगळ्या अपघातात अज्ञात व्यक्तीसह तिघांचा मृत्यू झाल्याची घटना दहिसर, खार आणि घाटकोपर परिसरात घडली. याप्रकरणी पंतनगर, खार आणि दहिसर पोलिसांनी तीन स्वतंत्र अपघाताची नोंद करुन दोन चालकांवर अटकेची कारवाई केली तर एक चालक अपघातानंतर पळून गेला. मृतांमध्ये मंजित ब्रम्हदेव यादव आणि ललित कांतीलाल जैन यांचा समावेश असून तिसर्‍या व्यक्तीची ओळख पटली नाही. त्याची ओळख पटावी यासाठी पोलिसांनी विशेष प्रयत्न सुरु केले आहे.

पहिला अपघात शनिवारी १२ सप्टेंबरला सकाळी सव्वासात ते साडेसात वाजता घाटकोपर येथील पूर्व दुतग्रती महामार्ग, घाटकोपर ब्रिज उतरणीच्या दक्षिण वाहिनीवर झाला. कांतीलाल भिमराजजी जैन हे ६४ वर्षांचे वयोवृद्ध भांडुपच्या एलबीएस मार्ग, न्यू केशव सृष्टी इमारतीमध्ये राहतात. ३८ वर्षांचा मृत ललित हा त्यांचा मोठा मुलगा असून त्याचा भांडुप येथे ललित कॅफे नावाचे एक शॉप आहे. कॅफेमध्ये लागणारे साहित्य तो चेंबूर येथून खरेदी करत होता. १२ सप्टेंबरला तो चेंबूर येथून काही वस्तू खरेदी करुन कॅफेमध्ये जाणार होता. त्यामुळे तो सकाळी सहा वाजता त्याच्या बाईकवरुन घरातून निघून गेला होता.

त्याची बाईक पूर्व दुतग्रती महामार्गावरुन जात असताना एका ट्रॅव्हेल्स बसने मागून धडक दिली होती. या अपघातात तो गंभीररीत्या जखमी झालपा होता. त्यामुळे त्याला तातडीने राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले होते. याप्रकरणी पंतनगर पोलिसांनी ट्रॅव्हेल्स बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. चालक ललितला कुठलीही वैद्यकीय मदत किंवा अपघाताची माहिती पोलिसांना न देता पळून गेला होता. त्यामुळे त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

दुसरा शुक्रवारी सायंकाळी वाजता खार येथील रेल्वे कॉलनीजवळील एस. व्ही रोडवर झाला. भरवेगात जाणार्‍या एका ट्रकने रस्त्यावरुन जाणार्‍या एका अज्ञात व्यक्तीला धडक दिली होती. यावेळी मागच्या टायरखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याचा मृतदेह नंतर शवविच्देदनासाठी पाठविण्यात आला होता. मृत व्यक्तीचे वय अंदाजे ३५ ते ४० असून त्याची ओळख पटली नाही. त्याची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे. अपघाताची माहिती मिळताच खार पोलिसांनी घटनस्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी सोमराया विठ्ठल नंदगौड या ट्रकचालकाविरुद्ध पोलिसांनी हलगर्जीपणाने ट्रक चालवून एका पादचार्‍याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत त्याला पोलिसांनी अटक केली होती. तो सोलापूरच्या मंगळवेढा, शिवणगीचा रहिवाशी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

गुरुवारी रात्री दहा वाजता तिसरा अपघात दहिसर येथील एस. व्ही रोड, विराणी कंपाऊंड, पेट्रोल पंपाजवळ झाला. याच ठिकाणी असलेल्या झाडाखाली २३ वर्षांचा मंजित यादव हा झोपला होता. यावेळी आरोपी चालकाने ट्रक मागे-पुढे करताना रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन त्याला धडक दिली होती. या अपघातात जखमी झालेल्या मंजितला तातडीने कांदिवलीतील शताब्दी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. अपघातानंतर ट्रकचालक दहिसर पोलीस ठाण्यात हजर झाला होता. चौकशीअंती त्याचे नाव ध्रुवचंद्र श्रीरामनाथ चौधरी असल्याचे उघडकीस आले. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्याला नंतर पोलिसांनी अटक करुन नोटीस देऊन सोडून दिले. धु्रवचंद्र हा दहिसर येथील आनंदनगर, संभाजीनगर परिसरात राहत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page