म्हाडाच्या पाच फ्लॅटसाठी ६० लाखांचा अपहारासह फसवणुक
मुख्य आरोपीला मदत करणार्या सहआरोपीस अटक व कोठडी
अरुण सावरटकर
१३ सप्टेंबर २०२६
मुंबई, – म्हाडाच्या पाच फ्लॅटसाठी सुमारे ६० लाखांचा अपहार करुन एका वयोवृद्ध महिलेची फसवणुक केल्याच्या कटातील मुख्य आरोपीला मदत करणार्या सहआरोपीस मालाड पोलिसांनी अटक केली. विजय भिकूराम पवार असे या आरोपीचे नाव असून फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे. या गुन्ह्यांत जतिन बाबू सोलंकी हा मुख्य आरोपी असून त्यानेच त्याच्यासह विजयच्या बँक खात्यात फसवणुकीची रक्कम तक्रारदार महिलेला ट्रान्स्फर करण्यास प्रवृत्त केले होते. या गुन्ह्यांतील काही रक्कम जातिनने विजय पवारला दिल्याचा आरोप आहे. त्याच्या चौकशीतून काही गोष्टींचा खुलासा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
६९ वर्षांची तक्रारदार महिला सईदा रफिक नाडियाडवाला ही मालाडच्या नाडियाडवाला कॉलनी, युनिटी हाईट्स अपार्टमेंटमध्ये राहते. गेल्या तेरा वर्षापासून ते जतिन सोलंकी याला ओळखत असून तो नालासोपारा येथे राहत होता. एकमेकांच्या घरी येणेजाणे असल्याने त्यांच्यात कौटुंबिक संबंध निर्माण झाले होते. तिच्या मालकीचे कुर्ला पाईपलाईन परिसरात तीन झोपड्या होत्या. त्या झोपड्या पावसात वाहून गेल्या होत्या. या झोपड्याचे कोणतेही कागदपत्रे तिच्याकडे नव्हती. ही माहिती जतिन सोलंकीला माहित होती.
२०२० पासून तो अचानक तिच्या येणे बंद झाला होता. त्यानंतर तो एप्रिल २०२५ रोजी तिच्या घरी त्याचा मित्र विजय पवारसोबत आला होता. यावेळी जतिनने तो मंत्रालयात महसूल विभागात काम करत असून तिथे म्हाडामार्फत लोकांना घरे मिळतात. त्याची सर्व जबाबदारी त्याच्यावर असल्याचे सांगितले होते. त्यांचे कुर्ला पाईपलाईन येथै तीन झोपड्या होत्या. तिथेच त्यांना म्हाडाचे तीन फ्लॅट मिळवून देतो. अंधैरी, मालाड व गोरेगाव येथील एव्हरशाईननगरात म्हाडाच्या काही इमारती असून त्यापैकी एका ठिकाणी त्यांना फ्लॅट देण्यासाठी प्रयत्न करतो. फ्लॅटसाठी तिला प्रत्येकी बारा लाख रुपये द्यावे लागतील असे सांगून तिचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता.
ही माहिती सईदा नाडियाडवाला हिने तिच्या पतीसह मुलगा आणि सूनेला सांगितली. त्यांनीही प्रत्येक फ्लॅटमागे बारा लाख रुपये भरण्याची तयारी दर्शविली होती. याच दरम्यान त्याने त्यांना गोरेगाव येथील डि मार्टजवळील सिग्मा टॉवरमधील १५०१, १५०२, १५०३ क्रमांकाचे तीन फ्लॅट, अंधेरीतील डी. एन नगरमधील ओमसाई एसआर इमारत, मालाड येथील एव्हरशाईननगर, शिवाय शक्ती इमारतीमधील काही दाखविले होते. यावेळी जतिनसोबत विजय पवार हादेखील उपस्थित होता. या फ्लॅटची पाहणी केल्यानंतर त्यांनी त्यांना तिथेच आणखीन दोन फ्लॅट विक्रीसाठी उपलब्ध आहेत. ते दोन्ही फ्लॅट स्वस्तात देतो असे सांगितले. तीन महिन्यांत फ्लॅटचे ऍलोटमेंट आणि चावी मिळेल असे सांगून त्यांनी त्यांना म्हाडा अधिकार्यांना देण्यासाठी त्यांच्याकडे पैशांची मागणी केली होती.
त्यासाठी त्यांनी त्यांना काही बँक खात्याची डिटेल्स पाठविली होती. तीन झोपड्याच्या मोबदल्यात तीन फ्लॅट तर दोन फ्लॅट स्वस्तात मिळत असल्याने त्यांनी पाच फ्लॅटसाठी त्याच्याशी व्यवहार करण्यास सुरुवात केली होती. ठरल्याप्रमाणे त्यांनी त्याने दिलेल्या बँक खात्यात ६० लाख ४७ हजार रुपयांचे पेमेंट केले होते. तसाठी त्यांनी त्यांच्या गोरेगाव येथील एका फ्लॅटची विक्री केली होती. १२ नोव्हेंबर २०२५ रोजी जतिनने त्यांना फ्लॅटच्या ऍलोटमेंट लेटर घेण्यासाठी बीकेसी येथील एमएमआरडीए कार्यालयात बोलाविले होते. त्यामुळे सईदा ही तिच्या पती, मुलगा आणि सूनेसोबत तिथे गेली होती, मात्र तिथे जतिन आला नाही. त्याने मंत्रालयात असल्याचे सांगून एक मोठी फाईल मिसिंग आहे. त्यामुळे त्याला तिथे येता येणार नाही.
आपण एक आठवड्यानतर भेटू असे सांगून फोन बंद केला होता. त्यानंतर वेगवेगळे कारण सांगून त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होता. काही दिवसांनी त्याने त्याचा मोबाईल बंद केला होता. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच सईदाने मालाड पोलिसांत त्याच्याविरुद्ध तक्रार केली होती. ही माहिती प्राप्त होताच त्याने तिला पैसे देण्याचे आश्वासन दिले. मात्र त्याने तिला पैसे परत केले नाही. त्यामुळे तिच्या तक्रार अर्जावरुन जतिनविरुद्ध पोलिसांनी म्हाडाच्या पाच फ्लॅटसाठी घेतलेल्या ६० लाख ४७ हजाराचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांचा पोलिसांकडून तपास सुरु केला होता.
तपासात या गुन्ह्यात जतिनला विजय पवार याने मदत केल्याचे उघडकीस आले. फसवणुकीची काही रक्कम त्याच्या बँक खात्यात ट्रान्स्फर झाली होती. त्यामुळे त्याला या गुन्ह्यांत पाहिजे आरोपी दाखविण्यात आले होते. त्याचा शोध सुरु असातना त्याला दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्याचा या गुन्ह्यांत सहभाग उघडकीस आला होता. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.