मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१७ सप्टेंबर २०२६
मुंबई, – घरातील साफसफाई करताना मोलकरीणीने सुमारे दहा लाखांच्या कॅशवर हातसफाई केल्याची घटना वांद्रे परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी वकिलाच्या तक्रार अर्जावरुन वांद्रे पोलिसांनी संशयित मोलकरीण तनुजा हिच्याविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु आहे.
यातील तक्रारदार व्यवसायाने वकिल असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत वांद्रे परिसरात राहतात. त्यांचा रुम लहान असल्याने त्यांचे आई-वडिल जवळच असलेल्या एका इमारतीमध्ये राहत असून त्यांच्याकडे गेल्या एक वर्षांपासून तनुजा ही तरुणी घरकाम करते. ती त्यांच्या इमारतीमध्येही घरकामासाठी येत असल्याने त्याने तिला त्यांच्या घरी कामासाठी ठेवले होते. ९ सप्टेंबरला त्यांनी त्यांच्या मुलीच्या प्रवेशासाठी दहा लाख रुपये आणले होते. ही रक्कम त्यांनी त्यांच्या आई-वडिलांच्या घरी ठेवली होती. दुसर्या दिवशी त्यांची बहिण ही रक्कम घेण्यासाठी गेली होती, मात्र तिला तिथे ती कॅश सापडली नाही.
तक्रारदार वर्धाला कामानिमित्त गेले असल्याने त्यांच्या बहिणीने फोनवरुन ही माहिती दिली होती. वर्धाहून मुंबईत आल्यानंतर त्यांनी त्यांच्या आई-वडिलांकडे पुन्हा कॅशचा शोध घेतला, मात्र त्यांना कुठेही कॅश सापडली नाही. दुपारी बारा ते सायंकाळी चार वाजेपर्यंत तनुजा ही त्यांच्याकडे काम करते. त्यांच्या घरी तनुजा वगळता इतर कोणीही येत नव्हते. त्यामुळे ही कॅश तिनेच चोरी केल्याचा संशय व्यक्त करुन त्यांनी वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. त्यांच्या जबानीनंतर पोलिसांनी तनुजाविरुद्ध दहा लाखांची कॅशची चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून तनुजाची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे.