चोरीच्या दागिन्यांची विक्रीप्रकरणी आरोपीच्या बहिणीला अटक
नऊपैकी अडीच लाखांचे चोरीचे सोन्याचे दागिने हस्तगत
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१७ सप्टेंबर २०२६
मुंबई, – चोरीच्या दागिन्यांची विविध ज्वेलर्स व्यापार्यांना विक्री करुन आरोपी भावासह त्याच्या मित्राला मदत केल्याचा आरोप असलेल्या बहिणीला साकिनाका पोलिसांनी अटक केली. अंजुकुमारी महेंद्रराम जयस्वाल असे या आरोपीचे नाव असून त्यांच्याकडून नऊपैकी अडीच लाखांचे चोरीचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहे. या गुन्ह्यांत यापूर्वी अंजुकुमारीचा भाऊ राजीकुमार महेंद्रराम जयस्वाल आणि तबरेज ऊर्फ रेहान मुक्तार सय्यद या दोघांना पोलिसांनी अटक केली होती. या दोघांनी चोरीचे दागिने विक्रीसाठी अंजुकुमारीला दिल्याचे तपासात उघडकीस आले. त्यामुळे तिच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे.
फरीदा मुख्तार सय्यद ही महिला साकिनाका येथे राहत असून घरकाम करते. कामातून बचत करुन तिने स्वतसाठी काही सोन्याचे दागिने बनविले होते. ते दागिने ती लग्नकार्यासह इतर कौटुंबिक कार्यक्रमात घालत होती. त्यानंतर दागिने कपाटात ठेवत होती. १८ ऑगस्टला ती नेहमीप्रमाणे तिच्या कामासाठी निघून गेली होती. काही वेळानंतर तिची मुलगीही कामाला तर मुलगा कामानिमित्त बाहेर गेला होता. यावेळी तिच्या घरी कोणीही नव्हते. हीच संधी साधून अज्ञात व्यक्तीने तिच्या घरात प्रवेश केला होता. कपाटातील सुमारे नऊ लाखांचे ७४ ग्रॅम वजनाचे विविध सोन्याचे दागिने चोरी करुन पलायन केले होते. कामावरुन घरी आल्यानंतर तिला तिच्या घराचे कुलूप तुटलेले दिसून आले. तिने आत जाऊन पाहणी केल्यानंतर घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त पडले होते.
अज्ञात व्यक्तीने तिच्या कपाटातील सर्व दागिने चोरी केले होते. त्यामुळे तिला प्रचंड धक्का बसला होता. घडलेला प्रकार साकिनाका पोलिसांना सांगून तिने अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल करुन आरोपीचा शोध सुरु केला होता. ही शोधमेाहीम सुरु असताना पोलिसांनी परिसरातील सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन तबरेज सय्यद आणि राजीकुमार जयस्वाल या दोघांना ताब्यात घेतले होते,
चौकशीत त्यांनीच ही घरफोडी केल्याची कबुली दिली. चोरीचे दागिने त्यांनी काही ज्वेलर्स व्यापार्यांना विक्री केली होती. अटकेच्या भीतीने त्यांनी उर्वरित सोन्याचे दागिने राजीकुमारची बहिण अंजुकुमारीला विकण्यासाठी दिले होते. त्यातील बहुतांश दागिन्यांची तिने चार ते पाच ज्वेलर्स व्यापार्यांना विक्री केली होती. तपासात आलेल्या माहितीनंतर तिचा पोलिसांकडून शोध सुरु केला होता. अखेर तिला गेल्या आठवड्यात पोलिसांनी ताब्यात घेतले होते. चौकशीत तिने चोरीचे दागिने काही ज्वेलर्स व्यापार्यांना विक्री केल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर तिला पोलिसांनी अटक केली.
अंजुकुमारी ही साकिनाका येथील महाराष्ट्र डेअरी, नेताजीनगर, वृंदावन सोसायटीमध्ये राहत असून ती हाऊसकिपिंगचे काम करते. तिने विक्री केलेले सुमारे अडीच लाखांचे सोन्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत. चोरीचे दागिने खरेदी करणार्या संबंधित ज्वेलर्स व्यापार्यांना चौकशीसाठी समन्स बजाविण्यात आले असून त्यांची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे. त्यांच्याकडून विकत घेतलेले दागिने लवकरच हस्तगत केले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.