महागड्या गिफ्टच्या नावाने महिला पोलीस शिपायाची फसवणुक

अज्ञात सायबर ठगाविरुद्ध फसवणुकीसह आयटीचा गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२० सप्टेंबर २०२६
मुंबई, – लंडनमध्ये प्रतिष्ठीत व्यावसायिक असल्याची बतावणी करुन लग्न जुळतिणार्‍या वेबसाईटवर बोगस प्रोफाईल बनवून एका महिला पोलीस शिपायाशी मैत्री करुन तिला लंडनमधून महागडे गिफ्ट पाठवितो असे सांगून तिची अज्ञात सायबर ठगाने सुमारे अकरा लाखांची फसवणुक केल्याचा प्रकार वांद्रे परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी या महिला पोलीस शिपायाच्या तक्रारीवरुन रवीकुमार नाव सांगण्या ठगासह इतर आरोपीविरुद्ध पश्‍चिम प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गिफ्टच्या नावाने एका महिला पोलीस शिपायालाच अज्ञात सायबर ठगाने अकरा लाखांना चुना लावल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.

३० वर्षांची तक्रारदार महिला मुंबई पोलीस दलात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत असून सध्या तिची नेमणूक वांद्रे पोलीस ठाण्यात आहे. फेब्रुवारी २०२६ रोजी कौटुंबिक कारणावरुन तिचयसह तिच्या पतीने विभक्त राहण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हापासून ती तिच्या मुलासोबत सांताक्रुज पोलीस वसाहतीत राहत आहे. ऑगस्ट २०२६ रोजी तिने एका लग्न जुळविणार्‍या खाजगी संकेतस्थळावर दुसर्‍या लग्नासाठी स्वतची प्रोफाईल दिली होती. त्यात तिने तिचा मोबाईल क्रमांक दिला होता. काही कारणास्तव नंतर तिने ती प्रोफाईल डिलीट केली होती.

१ सप्टेंबरला तिला रविकुमार नावाच्या एका व्यक्तीने व्हॉटअप कॉल केला होता. त्याने तो अहमदाबाद येथे राहत असून तिची प्रोफाईल तिला आवडल्याचे सांगितले. त्याने त्याचा घटस्फोट झाल्याचे सांगून स्वतचा फोटो असलेला आयडी पाठविला होता. कामानिमित्त तो सध्या लंडन येथे राहत असून त्याचे लंडनसह गुजरातमध्ये प्रत्येकी दोन असे चार फ्लॅट आहेत. तो व्यावसायिक असून त्याची आयफोनसह दुचाकी बनविणार्‍या दोन खाजगी कंपन्या असल्याचे सांगितले होते. त्यानंतर ते दोघेही एकमेकांच्या संपर्कात होते. याच दरम्यान त्याने तिला लंडन येथै जगातील सर्वोकृष्ठ वाहन निर्मात्याचे बक्षिस मिळाले असून त्याला एक आलिशान कार भेट म्हणून मिळाल्याचा फोटो पाठविला होता. या सत्कारामुळे त्याला प्रचंड आनंद झाला असून तो तिला लंडन येथून काही महागडे गिफ्ट पाठविणार असल्याचे सांगितले.

४ सप्टेंबरला तिला एका अज्ञत व्यक्तीने कॉल करुन तो एअरपोर्ट प्राधिकारणातून बोलत असून तिचे लंडन येथून काही महागडे गिफ्ट आले आहे. त्यासासठी तिला तीस हजार रुपये भरावे लागणार आहे. त्यामुळे तिने रवीकुमारला कॉल करुन त्याची शहानिशा केली होती. त्याने होकार दिल्यानंतर तीस हजार रुपये पाठविले होते. या गिफ्टमध्ये विदेशी चलन, सोन्याचे दागिने असल्याने तिला अज्ञात व्यक्तीने वेगवेगळ्या चार्जेस म्हणून पैसे भरण्यास प्रवृत्त केले होते. त्यांच्यावर विश्‍वास ठेवून तिने वेगवेगळ्या बँक खात्यात ११ लाख १९ हजार ७५० रुपये पाठविले होते. त्यानंतर संबंधित व्यक्तीने तिच्याकडे तिच्या आधारकार्डची मागणी केली होती,

हा प्रकार संशयास्पद वाटताच तिने रवीकुमारकडे चौकशी केली होती. यावेळी त्याने त्याचा मोबाईल आणि वॉलेट चोरीस गेला असून तिला पैसे भरण्यास सांगितले. तिने पैसे देण्यास नकार देताच त्याने तिला त्याच्याकडे तिचे फोटो असून ते फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली होती. रवीकुमारकडून फसवणुक झाल्याचे लक्षात येताच तिने सायबर हेल्पलाईनसह पश्‍चिम प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर रवीकुमार नाव सांगणार्‍या भामट्यासह लाभार्थी खातेदाराविरुद्ध पोलिसांनी भारतीय न्याय सहिता आणि आयटीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page