पैसे दिले नाही म्हणून अल्पवयीन मुलासह दोघांवर माथेफिरुचा चाकू हल्ला

संतप्त रहिवाशांकडून माथेफिरुला बेदम चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१८ सप्टेंबर २०२६
मुंबई, – पैसे दिले नाही म्हणून आधी एका पंधरा वर्षांच्या मुलावर आणि नंतर ३० वर्षांच्या तरुणावर एका माथेफिरुने चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना मालाडच्या मालवणी परिसरात उघडकीस आली आहे. या हल्ल्यात बंटी नक्कू खान या पंधरा वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला तर चेतन पटेल हा तरुण गंभीररीत्या जखमी झाला आहे. त्याच्यावर कांदिवलीतील शताब्दी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले. चाकू हल्ल्यानंतर पळून जाणार्‍या माथेफिरुला संतप्त नागरिकांनी पकडून बेदम चोप दिला आणि नंतर त्याला मालवणी पोलिसांच्या स्वाधीन केले. रिझवान युसूफ कुरेशी असे या आरोपीचे नाव असून त्याला शनिवारी दुपारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर केले जाणार आहे.

ही घटना शुक्रवारी दुपारी बारा ते साडेबाराच्या सुमारास मालाडच्या मालवणीतील एनसीसी हाथी गार्डनजवळील गेट क्रमांक सहा, प्लॉट क्रमांक २२ मध्ये घडली. याच ठिकाणी असलेल्या रुम क्रमांक ५५ मध्ये बटी खान हा त्याच्या कुटुंबियांसोबत राहतो. दुपारी बारा वाजता तो त्याच्याच घरी होता तर घरातील पोटमाळ्यावर त्याचे काका आणि मावशी होती. याच दरम्यान तिथे रिझवान आला, त्याने बंटीकडून पाणीसह पैशांची मागणी केली होती. त्याने त्याला पाणी देतो, पण पैसे नसल्याचे सांगितले. त्यानंतर तो पाणी आणण्यासाठी आतमध्ये गेला. यावेळी रिझवान त्याच्या मागे घरात घुसला आणि त्याने बंटीच्या गळ्यावर तिक्ष्ण हत्याराने वार केले होते. त्यानंतर तो तेथून पळून गेला होता. रस्त्यावरुन जाताना त्याने चेतन पटेल या व्यक्तीवर अशाच प्रकारे तिक्ष्ण हत्याराने वार केले होते. हा प्रकार स्थानिक रहिवाशांच्या लक्षात येताच त्यांनी रिझवानला पकडून बेदम मारहाण केली.

ही माहिती नंतर मालवणी पोलिसांना दिली. या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. रक्तबंबाळ झालेल्या बंटी खान आणि चेतन पटेल यांना तातडीने कांदिवलीतील शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे बंटीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर चेतनवर उपचार सुरु आहे. याप्रकरणी तौफिकअली खदीमअली शेख यांच्या तक्रारीवरुन रिझवानविरुद्ध पोलिसांनी हत्येसह हत्येचा प्रयत्न आणि धमकीचा गुन्हा दाखल केला आहे. स्थानिक रहिवाशांनी ताब्यात घेतलेल्या रिझवानला नंतर मालवणी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. त्यापूर्वी त्याला या रहिवाशांनी बेदम चोप दिला होता.

प्राथमिक तपासात रिझवान हा मानसिक रुग्ण असून तो मूळचा हैद्राबादचा रहिवाशी आहे. काही दिवसांपूर्वीच तो हैद्राबादहून मुंबईत आला होता. गेल्या काही दिवसांपासून तो मालवणी परिसरात वास्तव्यास होता. त्याला पैशांची गरज होती. त्यामुळे त्याने पैशांवरुन बंटीची हत्या करुन चेतन पटेलवर हल्ला केल्याचे बोलले जाते. अटकेनंतर त्याला शनिवारी दुपारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर केले जाणार आहे. शुक्रवारी दुपारी घडलेल्या या घटनेने मालवणी परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

ही कारवाई अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकुमार मीना, पोलीस उपायुक्त संदीप घुगे, सहाय्यक पोलीस आयुक्त महेशकुमार ठाकूर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राणी पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमोदकुमार जगदेव, पोलीस उपनिरीक्षक पियुष टारे, रामेश्‍वर ठाणगे, पोलीस हवालदार अविनाश चिकणे, स्वप्निल काटे, मुकेश धर्माधिकारी, समित सोरटे, उत्कर्ष लोमटे आदी पथकाने केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page