विद्यार्थ्यांच्या आत्महत्येनंतर आयआयटीमध्ये विद्यार्थ्यांचे आंदोलन
कारवाईच्या धसक्याने विद्यार्थ्याने गळफास घेऊन जीवन संपविले
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१८ सप्टेंबर २०२६
मुंबई, – एनर्जी सायन्स आणि इंजिनिअरिंगच्या दुसर्या वर्षांत शिकणार्या एका विद्यार्थ्याच्या आत्महत्येने पवईतील आयआयसीमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती. या आत्महत्येनंतर आयआयटीमध्ये विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी करुन आंदोलन केले होते. कॉपी करताना पकडल्यानंतर कारवाईची धमकी दिल्याने या विद्यार्थ्याने गळफास घेऊन जीवन संपविल्याचे बोलले जाते. याप्रकरणी पवई पोलिसांनी एडीआरची नोंद करुन तपास सुरु केला आहे.
मृत मुलगा हा पवईतील आयआयटीमध्ये एनर्जी सायन्स आणि इंजिनिअरच्या दुसर्या वर्षांत शिकत होता. काही दिवसांपूर्वी झालेल्या परिक्षेदरम्यान तो क्लासमध्ये मोबाईल फोन वापरताना दिसून आला होता. परिक्षेदरम्यान त्याने प्रश्नपत्रिका उत्तर मिळविण्यासाठी चॅट जीपीटीवर अपलोड केली होती. त्यानंतर त्याच्यावर शिक्षकांसह विभागप्रमुखांनी कारवाई करण्याची प्रक्रिया सुरु केली होती. या कारवाईचा त्याने प्रचंड धसका घेतला होता. शैक्षणिक करिअर बर्बाद होण्याच्या मानसिक तणावातून शुक्रवारी सायंकाळी त्याने त्याच्या रुममध्येच गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
हा प्रकार लक्षात येताच वसतिगृहात राहणार्या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती. या विद्यार्थ्यांनी आयआयटीमध्ये जोरदार घोषणाबाजी करुन आंदोलन सुरु केले होते. ही माहिती मिळताच पवई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. गळफास घेतलेल्या विद्यार्थ्यााला जवळच्या शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेनंतर पोलिसांनी एडीआरची नोंद करुन तपास सुरु केला आहे.
दरम्यान आयआयटीच्या वतीने विद्यार्थ्यांवर कारवाई करण्याची कुठलीही प्रक्रिया सुरु नव्हती. तसेच कोणतीही शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली नाही. उलट कॉपीचा प्रकार उघडकीस येताच शिक्षकासह विभागाप्रमुखांनी त्याच्याशी चर्चा करुन तयचे समुपदेशन केले होते. त्याच्या शैक्षणिक कारर्किर्दीवर कोणताही परिणाम होणार नाही याची ग्वाही दिल्याचे बोलले जाते.
मात्र या घटनेनंतर तो प्रचंड मानसिक तणावात होता. त्यातून आलेल्या नैराश्यातून त्याने त्याच्या रुममध्ये आत्महत्या केल्याचे बोलले जाते. त्याच्या आत्महत्येची माहिती त्याच्या कुटुंबियांना कळविण्यात आली आहे. त्याच्या पालकासह नातेवाईकांची पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे. या चौकशीनंतर तपासाची पुढील दिशा ठरविली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.