शिक्षणासह विविध कारणासाठी मदतीच्या नावाने १६ कोटीची फसवणुक
वॉण्टेड असलेल्या मुख्य आरोपी तरुणीसह तिघांना दहा महिन्यानंतर अटक
अरुण सावरटकर
१७ सप्टेंबर २०२६
मुंबई, – अमेरिकेतील पायलट प्रशिक्षणासह विविध कामासाठी आर्थिक मदतीची बतावणी करुन कांदिवलीतील एका सीएची सुमारे सोळा कोटीची फसवणुक कटातील वॉण्टेड असलेल्या मुख्य आरोपी तरुणीसह तिघांना कांदिवली पोलिसांनी अटक केली आहे. ऐश्वर्या सुरेंद्र राणे, रिजवान मोनूद्दीन शेख आणि शमिमा मोहम्मद गैफीक शमली अशी या तिघांची नावे आहेत. अटकेनंतर तिन्ही आरोपींना बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या कटातील ऐश्वर्या ही मुख्य आरोपी असून तिला दर्शन मारदेकर, शाजिया शेख यांच्यासह इतर एकवीस आरोपींनी मदत केली होती. या टोळीने तक्रारदाराकडून घेतलेल्या सोळा कोटीच्या रक्कमेतून लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने, कोट्यवधी रुपयांची फ्लॅट, भूखंड, व्यावसायिक गाळे आदी प्रॉपटी तसेच शेअर, म्युच्युअल फंड, महागडे वाहन, लॅपटॉप,मोबाईल, लक्झरी वस्तू व इतर महागडे वस्तूवर उधळपट्टी केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. या टोळीने शिक्षणासह विविध कारण सांगून तक्रारदार सीएसह इतर काही लोकांना गंडा घातला आहे का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.
हेरत जितेंद्र सलोट हे सीए असून कांदिवलीतील एका खाजगी कंपनीत कामाला आहे. लहानपणीच त्यांच्या आई-वडिलांचे निधन झाले होते. त्यामुळे त्यांनी स्वत काम करुन त्यांचे शिक्षण पूर्ण केले होते. शिक्षणासाठी त्यांना प्रचंड कष्ट घ्यावे लागले होते. त्यामुळे त्यांना त्यांच्या कमाईतून काही रक्कम गरीब मुलांच्या शिक्षणासाठी द्यायची होती. त्यामुळे ते नियमित गरीब मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत करतात. २०२१ रोजी त्यांच्या अंधेरीतील कार्यालयात दर्शन मारदेकर हा आला होता. त्यांच्याप्रमाणे दर्शन गरीब मुलांना शिक्षणासाठी मदत करत होता. पाच वर्षांनी त्याने शाजिया शमशी ऊर्फ शेख हिच्याविषयी माहिती दिली होती. ती सामाजिक कार्य करत असून तिने आतापर्यंत अनेक गरीब मुलांना मदत केल्याचे सांगितले. त्याने त्यांचे शाजियाशी फोनवरुन बोलणे करुन दिले होते. त्यानंतर ती त्यांच्या संपर्कात राहून त्यांना नेहमी कॉल करत होती.
याच दरम्यान तिने त्यांच्याकडे गरीब मुलांसाठी काही सामान नेले होते. वैद्यकीय मदतीसाठी २० ते २५ हजार रुपये दिले होते. २०१७ साली तिने ऐश्वर्या राणे या तरुणीविषयी माहिती देताना ती अमेरिकेत फ्लाय टू एअरबोर्न या संस्थेतर्फे अमेरिकेत पायलटचे शिक्षणासाठी गेली होती. तिच्या वडिलांचे निधन झाले असून पैशांअभावी ती अमेरिकेत अडकली आहे. त्यामुळे त्यांनी तिला मदत करावी, तिला नोकरी मिळाली की ती तुम्हाला सर्व पैसे परत करणार असल्याचे सांगितले. त्यांचा विश्वास बसावा म्हणून तिने ऐश्वर्याचे पायलटचे प्रशिक्षण घेत असल्याचे यूट्यूबवरील काही व्हिडीओ दाखविले होते. त्यामुळे त्यांनी तिच्या आईच्या बॅक खात्यात काही रक्कम ट्रान्स्फर केली होती. ऐश्वर्याच्या शिक्षणासह इतर कामासाठी त्यांनी वेळोवेळी आर्थिक मदत केली होती.
जून ते डिसेंबर २०१९ या कालावधीत त्यांनी तिच्यासह तिच्या आई आणि इतर नातेवाईकांच्या बँक खात्यात साडेबारा लाख रुपये ट्रान्स्फर केले होते. तिला नोकरी मिळण्यास विलंब होत असल्याने ते तिच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करत होते. डिसेंबर २०१९ ते जानेवारी २०२२ या कालावधीत त्यांनी त्यांना सव्वालाख रुपये दिले होते. फेब्रुवारी २०२२ रोजी ऐश्वर्याने त्यांना कॉल करुन त्यांच्या आईसह आजोबांची प्रकृती ठिक नसल्याचे सांगून ती भारतात येत आहे. यावेळी तिने त्यांच्या प्रॉपटीवरुन खोटी माहिती सांगून त्यांना पुन्हा आर्थिक मदत करण्याची विनंती केली. त्यावेळेस तिने त्यांच्याकडे ४० ते ४५ लाखांची मागणी केली होती. यावेळी शाजियाने त्यांना ऐश्वर्याने पैसे परत केले नाहीतर तिचा फ्लॅट आणि ऑफिसची जागेची विक्री करुन पैसे परत करण्याचे आश्वासन दिले होते.
यावेळी तिने तिच्या घराचे दस्तावेज देण्याचे आश्वासन दिले, मात्र तिने ते दस्तावेज दिले नाही. मे २०२२ रोजी ऐश्वर्याने पायलटचे प्रशिक्षण घेताना तिच्याकडून विमानाचा अपघात झाला आहे. त्याची तिला नुकसानभरपाई करायची आहे. ती नुकसान भरपाई भरली नाहीतर तिला शिक्षण संस्थेतून काढून टाकण्यात येईल. तिचे शिक्षण अपूर्ण राहिल्यास तिला नोकरी मिळणार नाही. त्यामुळे तिला त्यांचे पैसे देता येणार नाही. त्यामुळे त्यांनी तिला २१ लाख रुपये पाठविले होते. २०२० रोजी तिने तिच्या काही मैत्रिणीशी त्यांची ओळख करुन दिली होती. तिने तिच्या मैत्रिणीकडून काही रक्कम घेतली होती. ही रक्कम परत करण्यासाठी तिने त्यांच्याकडे पैशांची मागणी केली होती. त्यामुळे त्यांन तिला सोळा लाख रुपये पाठविले होते. २०२२ रोजी तिने अमेरिकेत नोकरीसाठी तिला ग्रीन कार्ड घ्यावे लागणार आहे. त्यासाठी तिला अमेरिकेत काही प्रॉपटी घ्यावी लागणार असून तिला सहा कोटीची गरज असल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांनी वेगवेगळ्या दहा बँकेसह स्वतचे फ्लॅटची विक्री करुन तिच्या आईला १ कोटी ७९ लाख १५ हजार रुपये दिले होते.
याच दरम्यान ऐश्वर्याने तिचे पूजा नावाच्या सहकारी तरुणीशी वाद झाला असून तिच्या तक्रारीवरुन तिला पायलट असोशिएशनने अटक केली आहे. तिला दंड भरावा लागणार आहे असे सांगून त्यांच्याकडून पैशांची मागणी केली होती. त्यामुळे त्यांनी तिला तिच्या आईला ५२ लाख रुपये बँक ट्रान्स्फर तर ७६ लाख कॅश स्वरुपात दिले होते. काही दिवसांनी तिने तिच्या आईच्या कॅन्सरच्या उपचारासाठी त्यांच्याकडून आठ लाख रपुये घेतले होते. डिसेंबर २०२२ रोजी तिने त्यांना कॉल करुन तिचे पायलटचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून तिला एवेला कंपनीत नोकरी मिळाली आहे. यावेळी तिने तिचे शैक्षणिक प्रमाणपत्र त्यांना पाठवून त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे त्यांनी तिच्याकडे पैशांची मागणी सुरु केली होती. यावेळी तिने त्यांना तिच्या मैत्रिणीच्या वडिलांसोबत भागीदारीत व्यवसाय सुरु करण्याचा सल्ला दिला. या व्यवसायाच्या बँक खात्यात ती तिची सॅलरी जमा करणार आहे.
व्यवसाय सेटअपसह इतर खर्चासाठी तिने त्यांच्याकडे पैशांची मागणी केली होती. त्यामुळे त्यांनी तिच्या परिचित इतर आरोपींना ९५ लाख ५० हजार रपुये कॅश स्वरुपात दिले होते. या घटनेला काही दिवस उलटत नाहीतर तोवर पूजाने फोनवरुन त्यांना संपर्क सााधून तिच्या वडिलांनी एफबीआयमध्ये तक्रार केली होती. त्यात ऐश्वर्याला अटक झाली आहे. तिला या प्रकरणातून बाहेर काढण्यासाठी पैशांची मागणी केली होती. त्यामुळे त्यांनी आमीर, प्रिया, नसीम यांना टप्याटप्याने तीन कोटी तीन लाख रुपये दिले होते. याच दरम्यान ऐश्वर्याने त्यांना कॉल करुन तिने त्यांना ५० लाख रुपये पाठविले होते, मात्र पूजाच्या तक्रारीवरुन एफबीआय, पायलट असोशिएयन आणि भारतीय दूतावास कार्यालयाने ऐश्वर्याने परवानगी न घेता कंपनी सुरु केली होती. त्यामुळे तिने सर्व बँक खाते फ्रिज करण्यात आले आहे.
प्रकरण मिटविण्यासाठी तिने त्यांच्याकडे पुन्हा पैशांची मागणी सुरु केली होती. तिच्यावर विश्वास ठेवून त्यांनी तिच्या आईच्या बँक खात्यात १ कोटी ३१ लाख तर १ कोटी ५५ लाख ६० हजार आमीर, प्रिया यांच्याकडे दिले होते. ऐश्वर्याने वारंवार आर्थिक मदत करुन ती त्यांच्याकडे विविध कारण सांगून पैशांची मागणी करत होते. त्यांच्याकडे तिला देण्यासाठी पैसे नव्हते. त्यामुळे त्यांनी तिला मदत करण्यास नकार देत तिच्याकडेच त्यांच्या पैशांची मागणी सुरु केली होती. मात्र तिने त्यांना पैसे पाठविले नाही. त्यामुळे त्यांनी संबंधित आरोपींची चौकशी सुरु केली होती. यावेळी त्यांना दर्शन, शाजियासह इतर आरोपींनी त्यांनी दिलेल्या पैशांचा परस्पर अपहार करुन फसवणुक केली होती या पैशांतून सोन्याचे दागिने, प्रॉपटी, जमिनी खरेदी केले होते. शेअर, म्युच्युअल फंड, वाहन, लॅपटॉप,मोबाईल, लक्झरी वस्तू, महागडे वस्तूसह कपडे घेतले होते.
अशा प्रकारे या टोळीने ऐश्वर्यासह इतर गरीब मुलांना आर्थिक मदतीच्या नावाने त्यांच्याकडून जानेवारी २०१६ ते डिसेंबर २०२४ या कालावधीत ८ कोटी ६ लाख ९७ हजार रुपये बँक ट्रान्स्फर तर ८ कोटी २२ लाख १५ हजार रपुये कॅश स्वरुपात असे १६ कोटी २९ लाख १२ हजार रुपये घेतले. ही रक्कम परत न करता त्यांनी ती रक्कम आपसांत वाटून घेऊन त्यांची फसवणुक केली होती. पैशांची मागणी केल्यानंतर या टोळीने त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली होती. या प्रकाराने हेरत सलोट यांना प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्यामुळे त्यांनी संबंधित सर्व आरोपीविरुद्ध कांदिवली पोलिसांत तक्रार केली होती.
या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर २४ आरोपीविरुद्ध पोलिसांनी बोगस दस्तावेज बनवून पैशांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. त्यात दर्शन मारदेकर, शाजिया शेख, रिझवान शेख, ऐश्वर्या सुरेंद्र राणे, फौजिया, शोवता ऊर्फ नुसरत, पोला ऊर्फ शाजिया साजूभाई, पूजा ऊर्फ जोया कानफी, प्रिसी ऊर्फ साजूभाई, प्रिसी ऊर्फ मरिटा फाटी ऊर्फ मॅक्स, अक्षत चाळके, भाविका जेवलानी, मकसूद सयद, अमीर, प्रिया अमीर, शाबाज, अयाम शमशुद्दीन धलेत, सुरेंद्र राणे, खाजा मोईनोद्दीन शाहिदा शेख, आतिया, जाकिया शमशी, नाजनीन व एक अज्ञात व्यक्तीचा समावेश आहे.
डिसेंबर २०२५ रोजी गुन्हा दाखल होताच त्याची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत आरोपींच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेण्याचे आदेश कांदिवली पोलिसांना दिले होते. या आदेशानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना गेल्या दहा महिन्यांपासून वॉण्टेड असलेल्या ऐश्वर्या राणे, रिजवान शेख आणि शमिमा शमली या तिघांनाा अटक केली. अटकेनंतर या तिघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. अशाच प्रकारे फसवणुक करणारी ही एक सराईत टोळीे असून या टोळीने इतर काही लोकांची फसवणुक केल्याचे बोलले जाते. त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु असून या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.