सरकारी जागेवर इमारत बांधून स्वस्तात फ्लॅटच्या नावाने गंडा

फसवणुकीच्या गुन्ह्यांतील मुख्य आरोपीस आठ महिन्यांनी अटक

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१८ सप्टेंबर २०२६
मुंबई, – नालासोपारा येथे सरकारी जागेवर इमारतीचे बांधकाम करुन स्वस्तात फ्लॅट देण्याचे आमिष दाखवून अनेकांना लाखो रुपयांना गंडा घालणार्‍या एका मुख्य वॉण्टेड आरोपीला जुहू पोलिसांनी अटक केली. राजेंद्र दत्तात्रय गोरीवले असे या आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडीनंतर चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत प्रविणा राजेंद्र गोरीवले ही सहआरोपी असून तिला या गुन्ह्यांत पाहिजे आरोपी दाखविण्यात आले आहे. या दोघांनी स्वस्तात फ्लॅटच्या नावाने आतापर्यंत अनेकांना लाखो रुपयांना चुना लावल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

६० वर्षांचे वयोवृद्ध तक्रारदार अनंत सिताराम कदम हे त्यांच्या कुटुंबियांसोबत विलेपार्ले परिसरात राहतात. ते चालक म्हणून काम करत होते, सध्या ते घरीच असतात. त्यांचा अशोक मयेकर नावाचा एक मित्र असून २०२१ रोजी तो त्यांच्या घरी आला होता. यावेळी त्याने त्याच्यासह राजेंद्र गोरीवले, प्रविणा गोरीवले, सुधीर पारदुले आणि संजय काशिनाथ गुरव असे सर्वजण वसई येथे कोंकणनगरी निवारा सहकारी संस्था या नावाने १८ मजल्याच्या सोसायटीचे काम करत आहेत. ही जागा त्यांना सरकारकडून प्राप्त झाली असून तिथे इमारतीचे बांधकाम करुन त्यांच्या परिचित लोकांना स्वस्तात फ्लॅट देणार आहे असे सांगितले होते. अशोक हा त्यांच्या परिचित असल्याने त्यांनी तिथे फ्लॅट घेण्याचा निर्णय घेतला होता.

काही दिवसांनी ते वसई येथे गेले होते. तिथे चारही आरोपी उपस्थित होते. या ठिकाणी एका इमारतीचे बांधकाम सुरु होते. दहाव्या मजल्यापर्यंत बांधकाम पूर्ण झाले होते. त्याच सोसायटीच्या पाचव्या मजल्यावर तक्रारदारांना एक फ्लॅट दाखविण्यात आला होता. त्याची किंमत पंधरा ते अठरा लाख रुपये सांगणयत आली होती. इमारतीचे बांधकाम पूर्ण होताच २०२४ पर्यंत फ्लॅटचा ताबा मिळेल असे सांगितले. त्यांच्यावर विश्‍वास ठेवून त्यांच्यासह त्यांच्या मुलगा आणि जावयाने राजेंद्र, प्रविणा, वैदही गोरीवले यांच्या बँक खात्यात अकरा लाख नव्वद हजार रुपये ट्रान्स्फर केले होते. पेमेंटनंतर ते अशोकसह गोरीवले कुटुंबियांच्या संपर्कात होते. मात्र २०२४ वर्ष उलटूनही त्यांनी फ्लॅटचा ताबा दिला नाही. विचारणा केल्यानंतर ते वेगवेगळे कारण सांगून टाळण्याचा प्रयत्न करत होते.

हा प्रकार संशयास्पद वाटताच तक्रारदारांनी वसईतील बांधकामाच्या साईटवर भेट दिली होती. यावेळी इमारतीच्या कार्यालयात जाऊन चौकशी केल्यानंतर तिथे उपस्थित सोसायटीच्या पदाधिकार्‍यांनी ते राजेंद्र गोरिवली, अशोक मयेकर यांना ओळखत नाही. त्यांच्या सोसायटीशी त्यांचा काहीही संबंध नसल्याचे समजले. त्यांनी बुक केलेल्या फ्लॅटबाबत विचारणा केल्यानंतर सोसायटीमध्ये अद्याप कोणाचेही फ्लॅट बुक झाले नाही. इमारतीचे बांधकम दहा मजल्यापर्यंत झाले होते. नंतर बांधकाम बंद होते. हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी राजेंद्र गोरीवले आणि अशोक मयेकर यांच्याकडे विचारणा केली होती. यावेळी त्यांनी महानगरपालिकेकडून अद्याप ऑर्डर प्राप्त झाली नाही. लवकरच ऑर्डर मिळेल आणि इमारतीचे बांधकाम सुरु होईल असे सांगितले.

हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी त्यांच्याकडे फ्लॅटच्या पैशांची मागणी केली होती. साठ हजार परत करुन त्यांनी अकरा लाख तीस हजार रुपये परत केले नाह. चौकशीदरम्यान राजेंद्र आणि प्रविणा गोरीवले यांनी अनेकांना स्वस्तात फ्लॅट देतो असे सांगून त्यांच्याकडून लाखो रुपये घेतले होते, मात्र कोणालाही फ्लॅट न देता त्यांची फसवणुक केली होती. प्रोजेक्ट पूर्ण झाल्यानंतर फ्लॅट मिळेल, तोपर्यंत फ्लॅटचे पैसे परत मिळणार नाही असे सांगून ते अनेकांना धमकावत होते. नंतर त्यांनी फोन घेणे बंद केले, त्यांचा मोबाईल ब्लॉक केला होता.

फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी राजेंद्र आणि प्रविणा गोरीवले यांच्याविरुद्ध जुहू पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर या दोघांविरुद्ध पोलिसांनी फ्लॅटसाठी घेतलेल्या पैशांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्यांचा पोलिसांनी शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असतानाच आठ महिन्यानंतर राजेंद्र गोरीवले याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. पोलीस कोठडीनंतर त्याला शुक्रवारी न्यायालयाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page