दारुच्या नशेत मित्राला चिडविणे तरुणाच्या जिवावर बेतले
झोपेतच छातीत चाकूने हत्या करणार्या मित्राला अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२० सप्टेंबर २०२६
मुंबई, – दारुच्या नशेत मित्राला चिडविणे श्रीकांत दिलीप जाधव नावाच्या एका ३५ वर्षांच्या तरुणाच्या जिवावर बेतले. रागाच्या भरात त्याच्याच मित्राने श्रीकांतची झोपेत छातीत चाकूने भोसकून हत्या केली. याप्रकरणी कुरार पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून पळून गेलेल्या चेतन सावंत या २३ वर्षांच्या आरोपी मित्राला अटक केली आहे. याच गुन्ह्यांत त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही घटना शुक्रवारी रात्री उशिरा अडीच वाजता कांदिवलीतील गोकुळनगर, मॉर्डन डेअरीजवळील यादव निवास चाळीत घडली. साईनाथ दिलीप जाधव हा सेल्समन म्हणून तो त्याच्या कुटुंबियांसोबत कांदिवली परिसरात राहतो. मृत श्रीकांत हा त्याचा भाऊ आहे. शुक्रवारी पाच दिवसांचे गणपती विसर्जन करुन दिलीप, त्याचा मित्र विष्णू विश्वकर्मा याच्या यादव निवास चाळीतील घरी गेले होते. काही वेळानंतर तिथे चेतन सावंत, सुनिल ऊर्फ पानसो हे दोघेही आले. या सर्वांनी रात्री उशिरापर्यंत मद्यप्राशन केले होते. यावेळी श्रीकांतने चेतनची थट्टामस्करी करुन त्याला चिडविण्याचा प्रयत्न केला होता. त्याचा चेतनला प्रचंड राग आला होता.
मद्यप्राशन करुन ते सर्वजण तिथेच झोपले होते. झोपत असताना चेतनने श्रीकांतच्या छातीत चाकूने भोसकले होते. त्यात श्रीकांत हा गंभीररीत्या जखमी झाला होता. हा प्रकार तिथे उपस्थित इतर दोन मित्रांच्या लक्षात येताच त्यांनी रक्तबंबाळ झालेल्या श्रीकांतला तातडीने कांदिवलीतील शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच कुरार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
याप्रकरणी साईनाथ जाधव याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी चेतन सावंत याच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या चेतनला काही तासांत पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.
श्रीकांत दारुच्या नशेत चिडवत असल्याच्या रागातून त्याने त्याची हत्या केल्याची कबुली चेतनने पोलिसांना दिली आहे. गुन्ह्यांतील चाकू पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. गणेशोत्सवात घडलेल्या या हत्येच्या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.