पाच कोटीच्या कर्जाच्या आमिषाने चित्रपट निर्मात्याला दहा लाखांना चुना
फायनान्स कंपनीच्या मालकासह दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल मुंबई
क्राईम टाइम्स डॉट कॉम
२० सप्टेंबर २०२६
मुंबई, – चित्रपट निर्मितीसाठी पाच कोटीच्या कर्जाच्या आमिषाने एका चित्रपट निर्मात्याला दोन भामट्याने सुमारे दहा लाखांना चुना लावल्याची घटना अंधेरी परिसरात उघडकीस आले. ई-रजिस्ट्रेशन आणि स्टॅम्प ड्युटीसाठी घेतलेल्या पैशांचा अपहार करुन ही फसवणुक करण्यात आली आहे. याप्रकरणी एका फायनान्स कंपनीच्या मालकासह दोघांविरुद्ध आंबोली पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. कौशिक लाठिया आणि लविन कन्हैय्यालाल परयानी अशी या दोघांची नावे असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. यातील कौशिक हा हरेकृष्णा फायनान्स कंपनीचा मालक असून त्याने अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
हेमंतकुमार विठ्ठलराव महाले हे अंधेरीतील चारबंगला, आरटीओ लेन, मोहिद हाईट्स अपार्टमेंटमध्ये राहतात. त्यांची एच.जी इंटरटेंन्टमेंट नावाची एक चित्रपट निर्मिती संस्था आहे. २०१८ सालापासून ते त्यांच्या संस्थेमार्फत चित्रपट निर्मितीचे काम करतात. त्यासाठी त्यांना पैशांची गरज होती. कर्जाचा शोधात असताना त्यांना एका जाहिरात दिसली होती. ही जाहिरात कौशिक लाठिया यांच्या हरेकृष्ण फायनान्सची होती. जाहिरातीत त्यांचा मोबाईल क्रमांक होता, त्यामुळे त्यांनी त्यांना संपर्क साधून कर्जाविषयी चर्चा केली होती. याबाबत त्यांच्यात २३ नोव्हेंबर २०२५ रोजी एक झुम मिटींग झाली होती.
या चर्चेत त्याने त्यांना चित्रपट निर्मितीसह इमारत पुर्नविकास, प्रोजेक्ट फायनान्स, प्रॉपटी गहाण आदीवर त्यांची कंपनी कर्ज देते. दहा कोटीपर्यंत वाषिक् दहा टक्के तर दहा ते शंभर कोटीच्या कर्जावर सहा टक्के व्याजदर आहे. कर्जापूर्वी त्यांना एक टक्के ई-रजिस्ट्रेशन फी, आणि एक टक्के स्टॅम्प ड्यूटी भरावी लागेल. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या बँक खात्यात कर्जाची रक्कम ट्रान्स्फर केली जाईल. कर्जासाठी मासिक हप्त्याची गरज नसून एकाच वेळेस व्याजासह मुद्दल रक्कम भरण्याची मुभा दिली जाते असे सांगितले. यावेळी हेमंतकुमारने त्यांच्याकडे पाच कोटीच्या कर्जाची मागणी केली होती. त्यासाठी त्यांनी प्रत्येकी एक टक्क ई रजिस्टेशन आणि स्टॅम्प ड्यूटीसाठी त्यांना दहा लाख तीन हजार रुपये दिले होते.
या पेमेंटनंतर त्यांच्या बँक खात्यात पाच कोटी रुपये ट्रान्स्फर होईल असे सांगितले. मात्र त्याने कर्जाची रक्कम बँक खात्यात ट्रान्स्फर केली नाही. त्यामुळे त्यांनी त्याला कॉल केला होता. यावेळी त्याने त्यांना त्यांचे वकिल कामात व्यस्त असून लवकरच ही रक्कम त्यांच्या बँक खात्यात ट्रान्स्फर होईल असे सांगितले. मात्र पैसे ट्रान्स्फर झाले नाही. त्यामुळे त्यांनी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र कौशिकने त्यांना प्रतिसाद दिला नाही.
या प्रकारानंतर त्यांनी फसवणुकीचा एक व्हिडीओ बनवून तो व्हिडीओ सोशल मिडीयावर अपलोड केला होता. हा व्हिडीओ पाहून त्यांना एका व्यक्तीने कॉल करुन कौशिकने अशाच प्रकारे अनेकांना कर्जाच्या आमिषाने गंडा घातल्याची माहिती दिली. त्यांचीही त्याने फसवणुक केली होती. काही दिवसांनी त्यांना कौशिकच्या वतीने लविन परयानी याने फोन करुन त्यांच्या बँक खात्यात नऊ लाख तीन हजार रुपये ट्रान्स्फर करतो असे सांगून एक लाख कमिशन म्हणून त्याच्याकडे राहतील असे सांगितले, मात्र त्यानेही पैसे जमा केले नाही.
फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच हेमंतकुमार महाले यांनी आंबोली पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर कौशिक लाठिया आणि लविन परयानी यांच्याविरुद्ध पाच कोटीचे कर्ज देाते असे सांगून कर्जाच्या प्रोसेसिंग फी म्हणून दहा लाखांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. या टोळीने मुंबईसह गुजरातमधील अनेकांना कर्जाच्या नावाने गंडा घातल्याचे बोलले जाते.