गोरेगाव-राममंदिर रेल्वे स्थानकादरम्यान लोकलखाली सीएची आत्महत्या

पत्नीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून आत्महत्या केल्याचे तपासात उघड

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२० सप्टेंबर २०२६
मुंबई, – वांद्रे येथील बीकेसीमधील एका खाजगी कंपनीत सीए म्हणून काम करणार्‍या ३९ वर्षांच्या व्यक्तीने गोरेगाव-राममंदिर रेल्वे स्थानकादरम्यान लोकलखाली आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. पत्नीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. तसा व्हॉटअप मॅसेज त्याने त्याच्या बहिणीसह मित्राला आत्महत्या करण्यापूर्वी पाठविला होता. या मॅसेजवरुन त्याच्या वडिलांच्या तक्रारीवरुन बोरिवली पोलिसांनी आरोपी पत्नीसह तिच्या मित्राविरुद्ध पतीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा रेल्वे पोलिसांकडून तपास सुरु आहे.

७४ वर्षांचे वयोवृद्ध तक्रारदार गोरेगाव येथील एस. व्ही रोडवरील एका निवासी सोसायटीमध्ये राहतात. पाच वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नीचे निधन झाले होते. त्यांना दोन मुली असून त्या दोघींही विवाहीत आहे. सध्या त्या दोघीही त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. ३९ वर्षांचा त्यांचा एक मुलगा असून तयचे एम कॉमपर्यंत शिक्षण झाले आहे. तो सीए असून सध्या वांद्रे येथील बीकेसीमधील एका खाजगी कंपनीत काम करतो. त्याचे वर्षां नावाच्या एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. ती मूळची पुण्याची रहिवाशी आहे. डिसेंबर २०१५ रोजी त्यांचा दोन्ही कुटुंबियांच्या संमतीने प्रेमविवाह झाला होता. ती सध्या वर्क फॉर्म होम करते. गेल्या काही वर्षांपासून त्यांच्यात सतत क्षुल्लक कौटुंबिक कारणावरुन वाद होत होते. अनेकदा तक्रारदार त्यांची समजूत काढत होते.

रविवारी २० सप्टेंबरला दुपारी त्यांच्यात पुन्हा वाद झाला होता. दुसर्‍या दिवशी सकाळी अकरा वाजता तो नेहमीप्रमाणे कामावर निघून गेला. दुपारी एक वाजता त्यांना त्यांच्या मुलीने फोनवरुन भावाचा रेल्वे अपघात झाला असून त्याला कांदिवलीतील शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती दिली होती. या माहितीनंतर ते त्यांच्या मुलीसोबत शताब्दी हॉस्पिटलमध्ये गेले होते. तिथेच त्यांना त्यांच्या मुलाला डॉक्टरांनी मृत घोषित केल्याचे सांगितले. प्राथमिक तपासात त्यांच्या मुलाने गोरेगाव-राममंदिर रेल्वे स्थानकादरम्यान एका लोकलखाली आत्महत्या केल्याचे उघडकीस आले.

आत्महत्या करण्यापूर्वी त्याने त्याच्या बहिणीसह मित्राला एका व्हॉटअप मॅसेज केला होता. त्यात त्याने त्याच्या पत्नीचे एका तरुणासोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोप केला होता. या दोघांच्या संबंधामुळे गेल्या काही दिवसांपासून तो प्रचंड मानसिक तणावात होता. त्यातून आलेल्या नैराश्यातून त्याने लोकलखाली आत्महत्या केली होती. त्याच्या सुसायट नोटवरुन त्याच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले होते. या घटनेनंतर तक्रारदाराने त्यांच्या मुलाच्या आत्महत्येप्रकरणी त्याची पत्नी आणि मित्राविरुद्ध बोरिवली रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार केली होती.

या तक्रारीनंतर या दोघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. मृत व्यक्तीचा मोबाईल फोन पोलिसांनी ताब्यात घेतला असून त्यात त्याने त्याच्या बहिणीसह मित्राला व्हॉटअप केल्याचे दिसून आले आहे. त्याच्या पत्नीसह मित्राविरुद्ध हा भक्कम पुरावे असल्याचे बोलले जाते. या दोघांची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार असून या चौकशीनंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page