मालवणीच्या माथेफिरुविरुद्ध अन्य एका गुन्ह्यांची नोंद
चौदा वर्षांच्या मुलावर चाकूने हल्ला केल्याचा आरोप
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२३ सप्टेंबर २०२५
मुंबई, – पैशांवरुन झालेल्या वादातून बंटी नकू खान या १५ वर्षांच्या मुलाची चाकूने वार करुन हत्या करणार्या माथेफिरुविरुद्ध मालवणी पोलिसांनी अन्य एका हत्येच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यांची नोंद केली आहे. पाण्याच्या बाटलीवरुन झालेल्या वादातून रिझवान युसूफ कुरेशी या माथेफिरुने अन्य एका चौदा वर्षांच्या मुलावर चाकूने हल्ला केल्याचे उघडकीस आले आहे. जिशान सैफुल मौला असे या मुलाचे नाव असून चाकू हल्ल्यात त्याच्या गळ्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली होती. मंगळवारी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर रिझवानविरुद्ध हत्येचा प्रयत्नाचा दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच गुन्ह्यांत त्याच्यावर लवकरच अटकेची कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही घटना शुक्रवारी १८ सप्टेंबरला मध्यरात्री साडेबारा वाजता मालाडच्या मालवणीतील गेट क्रमांक सहा, न्यू कलेक्टर कंपाऊंड, हाथी गार्डनजवळ घडली. याच परिसरात जिशान हा चौदा वर्षांचा मुलगा राहतो. रात्री साडेबारा वाजता तिथे रिझवान आला होता. त्याने जिशानकडे पाणी मागितले होते, यावेळी त्याने त्याला बाटलीतून पाणी दिले होते. मात्र पाण्याची बाटली परत न केल्यावरुन त्यांच्यात वाद झाला होता. यावेळी काही कळण्यापूर्वीच त्याने त्याच्या गळ्यावर चाकूने हल्ला केला होता. त्यात त्याच्या गळ्यासह हाताला गंभीर दुखापत झाली होती. या हल्ल्यानंतर रिझवान हा तेथून पळून गेला होता.
रक्तबंबाळ झालेल्या जिशानला स्थानिक रहिवाशांनी तातडीने कांदिवलीतील शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथेच त्याच्यावर उपचार सुरु करण्यात आले होते. या घटनेनंतर रिझवानने अशाच प्रकारे पाण्यासह पैशावरुन बंटी नकू खान या पंधरा वर्षांच्या मुलावर चाकूने हल्ला केला होता. त्यात त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्याच्या हत्येनंतर त्याने चेतन पटेल या व्यक्तीवर चाकूने हल्ला केला होता. याप्रकरणी रिझवानविरुद्ध हत्येसह हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला होता.
गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली होती. चेतन पटेलवर झालेल्या हल्ल्यानंतर त्याला स्थानिक रहिवाशांनी पकडून मालवणी पोलिसांच्या स्वाधीन केले होते. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे. पोलीस कोठडीत असताना हा प्रकार उघडकीस आला होता. या घटनेनंतर जिशानची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती.
त्याच्यावर चाकू हल्ला करणारा रिझवान हाच असल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे त्याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी रिझवानविरुद्ध मंगळवारी २२ सप्टेंबरला उशिरा दुसरा गुन्हा दाखल केला आहे. त्याच्याविरुद्ध हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून याच गुन्ह्यांत त्याला लवकरच चौकशीसाठी ताब्यात घेतले जाणार आहे. याच गुन्ह्यांत अटक करुन त्याची चौकशी होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.