ऍक्टिव्हाला टँकरची धडक लागून ३५ वर्षांच्या महिलेचा मृत्यू

आरोपी टँकरचालकाविरुद्ध हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२८ सप्टेंबर २०२५
मुंबई, – ऍक्टिव्हला टँकरची धडक लागून झालेल्या अपघातात गायत्रीदेवी विनोद गौड या ३५ वर्षांच्या महिलेचा मृत्यू झाला. याप्रकरणी आरोपी टँकरचालक विनयकुमार कन्हैय्यालाल यादव याच्याविरुद्ध सहार पोलिसांनी हलगर्जीपणा गुन्हा दाखल केला आहे. विनयकुमार हा वसई परिसरात राहत असून तो पेट्रोल घेऊन जात असताना हा अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

हा अपघात शनिवारी दुपारी साडेतीन वाजता अंधेरीतील अंधेरी-कुर्ला रोड, लेमन टी हॉटेलसमोरील, वर्सोवा-घाटकोपर मेट्रो ब्रिजच्या खालील पिलर क्रमांक २८८ येथे झाला. विनोद राजेंद्रप्रसाद गौड हे ज्वेलर्स व्यापारी असून ते अंधेरीतील विजयनगर परिसरात राहतात. त्यांचा मरोळ परिसरात ज्वेलरीसह डायमंडचा व्यवसाय आहे. मृत गायत्रीदेवी ही त्यांची पत्नी आहे. तीन वर्षांपूर्वी त्यांनी तिला दैनदिन कामासाठी एक ऍक्टिव्हा घेऊन दिली होती. शनिवारी ती ऍक्टिव्हा घेऊन पेट्रोल भरण्यासाठी जात होती.

दुपारी साडेतीन वाजता ती वर्सोवा-घाटकोपर मेट्रो ब्रिजच्या खालील पिलर क्रमांक २८८ जवळून जात असताना पेट्रोलची वाहतूक करणार्‍या एका टँकरने तिच्या ऍक्टिव्हाला जोरात धडक दिली होती. त्यात ती गंभीररीत्या जखमी झाली होती. त्यामुळे तिला स्थानिक लोकांनी तातडीने जवळच्या कूपर हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले होते.

अपघाताची माहिती मिळताच सहार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. ही माहिती नंतर पोलिसांकडून विनोद गौड यांना देण्यात आली. त्यानंतर ते त्यांच्या कुटुंबियांसोबत कूपर हॉस्पिटलमध्ये आले होते. याप्रकरणी विनोद गौड यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी टँकरचालक विनयकुमार यादव याच्याविरुद्ध हलगर्जीपणाने टँकर चालवून एका महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. गायत्रीदेवीच्या अपघाती मृत्यूने विजयनगरातील स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड शोककळा पसरली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page