आंतरराष्ट्रीय तस्करी करणार्या टोळीतील दोन आरोपींना अटक
आरोपींकडून ३७ कोटीचा १२ किलो केटामाईनचा साठा जप्त
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२८ सप्टेंबर २०२५
मुंबई, – आंतरराष्ट्रीय तस्करी करणार्या एका टोळीतीलल दोन आरोपींना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. अदनान अहमद नियाज अहमद सिद्धीकी आणि सौद मुश्ताक मणियार अशी या दोघांची नावे आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी ३७ कोटी १७ लाख रुपयांचा १२ किलो ३९० ग्रॅम वजनाचे केटामाईन जप्त केले आहेत. त्यांच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत कारवाई करण्यात आली असून याच गुन्ह्यांत त्यांना लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या दोघांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.
गुरुवारी २४ सप्टेंबरला रात्री उशिरा वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनश्याम नायर यांच्या आदेशावरुन सहाय्यक पोलीस निरीक्षक उल्हास खोलम, पोलीस हवालदार येडगे, बडे, ठोंबरे, पोलीस शिपाई बिनल शिंगाणे आदी पथक परिसरात गस्त घालत होते. रात्री अकरा वाजता विमानतळ मेट्रो स्टेशनजवळील अंधेरी-कुर्ला रोडवरील साकिनाका येथे जाणार्याा फुटपाथवर संबंधित् पोलीस पथक गस्त घालत असताना तिथे दोन तरुण संशयास्पदरीत्या फिरताना दिसून आले. त्यामुळे या दोघांनाही पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला, मात्र पोलिसांना पाहताच ते दोघेही पळू लागले. यावेळी या पथकाने पळून जाणार्या दोघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले.
त्यांच्याकडील बॅगेची तपासणी केल्यानंतर त्यात पोलिसांना केटामाईन सापडले. या केटामाईनसह दोन मोबाईल पोलिसांनी जप्त केले. त्यांच्याकडून १२ किलो ३९० ग्रॅम वजनाचा केटामाईनचा साठा सापडला असून त्याची किंमत ३७ कोटी १७ लाख इतकी आहे. हा मुद्देमाल ताब्यात घेतल्यानंतर या दोघांनाही पुढील कारवाईसाठी एमआयडीसी पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते. त्यांच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन नंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती. यातील अदनान हा माझगावच्या घोडपदेव तर सौद गिरगाव येथील मोती टॉकीजवळील इस्लाम स्ट्रिट परिसरात राहतो. दोन्ही आरोपी आंतरराष्ट्रीय तस्करी करणार्या टोळीतील सदस्य आहेत.
ही टोळी वेगवेगळे ड्रग्ज मुंबई शहरातून खाद्यपदार्थातून लपवून त्यांच्या माध्यमातून थायलंड, इंडोनेशिया, म्यानमार, मलेशिया आदी देशात विक्रीसाठी हवाई मार्गाने पाठवत होते. अटकेनंतर त्यांना शुक्रवारी दुपारी लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. या दोघांनी ते केटामाईन कोठून आणले, ते केटामाईन ते दोघेही कोणाला देणार होते, त्यांनी यापूर्वीही अशाच प्रकारे ड्रग्जची तस्करी केली आहे का, या गुन्ह्यांत त्यांचे इतर कोणी सहकारी आहेत का, त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.