८० हजाराची लाच घेताना अग्निमशन दलाच्या दोन अधिकार्यांना अटक
दोन लाखांची लाचेची मागणी करुन दिड लाखांवर तडजोड
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२९ सप्टेंबर २०२५
मुंबई, – फायर परवाना देण्यासाठी ८० हजाराचा दुसरा हप्ता घेताना अग्निशमन दलाच्या दोन अधिकार्यांना मंगळवारी सायंकाळी मुंबई युनिटच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. अमोल दादासो मुळीक आणि अरुण धोंडू देवाळे अशी या दोघांची नावे असून ते दोघेही फोर्ट येथील अग्निशमन दलात केंद्र अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. रात्री उशिरापर्यंत त्यांच्या घराची झडतीची कारवाई सुरु होती, त्याचा अधिकृत तपशील समजू शकला नाही. अटकेनंतर या दोघांनाही बुधवारी दुपारी विशेष सेशन कोर्टात हजर केले जाणार आहे.
यातील ७३ वर्षांचे वयोवृद्ध हॉटैल व्यावसायिक असून त्यांच्या मालकीचे दक्षिण मुंबईत एक हॉटेल आहे. त्यांनी त्यांच्या हॉटेलच्या फायर परवान्यासाठी फोर्ट येथील अग्निमशन दलात अर्ज केला होता. त्यांना फायर परवाना मिळावा यासाठी त्यांच्याकडून प्रयत्न सुरु होते. याच दरम्यान ते अरुण देवाळे यांना भेटण्यासाठी त्यांच्या फोर्ट येथील कार्यालयात गेले होते. तिथे त्यांनी त्यांना हॉटेलचा फायर परवाना देण्यासाठी दोन लाख रुपयांची लाचेची मागणी केली होती.
ही लाच दिल्याशिवाय त्यांच्या अर्जावर पुढील कारवाई होणार नव्हती, त्यामुळे नाईजास्तव त्यांनी त्यांना दोन लाख रुपयांची लाचेची रक्कम देण्याची तयारी दर्शवून त्यांच्याविरुद्ध मुंबई युनिटच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली होती. या तक्रारीनंतर १९ जूनला या अधिकार्यांनी त्याची शहानिशा करण्यात आली होती. यावेळी अरुण देवाळे यांनी दोन लाखांची लाचेची मागणी करुन दिड लाख रुपये लाच घेण्याची तयारी दर्शविली होती. त्यासाठी त्यांनी त्यांच्याकडून साठ हजार रुपयांची लाच घेतली होती. तसेच फायर परवाना काढण्यासाठी ऑनलाईन नऊ हजार रुपये भरले होते. मंगळवारी लाचेचा दुसरा हप्ता घेण्याचे ठरले होते.
ठरल्याप्रमाणे पोलीस आयुक्त मनोज सुतार, संदीप गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनिता दिघे, पोलीस हवालदार साटम, गावडे, मठपती, महिला पोलीस हवालदार तोडणकर, महिला पोलीस शिपाई बाबर, पोलीस शिपाई सोनावणे, पाटील आणि चौरे आदी पथकाने लाचेचा दुसरा हप्ता घेताना फोर्ट येथील फायर स्टेशनजवळ सायंकाळी सात वाजता अमोल मुळीक यांना रंगेहाथ पकडले. ही लाच स्विकारण्याची सहमती दिल्याने या गुन्ह्यांत नंतर अरुण देवाळे यांना नरिमन पॉईट येथील फायर स्टेशन येथून पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या कारवाईत दोन्ही आरोपींचे मोबाईल पोलिसांनी जप्त केले आहेत.
त्यांच्या अटकेने त्यांच्या घरी दुसर्या पथकाला कारवाईसाठी पाठविण्यात आले होते. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरु होती. त्याचा तपशील मात्र समजू शकला नाही. त्यांच्याविरुद्ध भष्ट्राचार प्रतिबंधक अधिनिमय कायदा कलम सात अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच गुन्ह्यांत रात्री उशिरा अमोल मुळीत आणि अरुण देवाळे यांना पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्यांना बुधवारी दुपारी विशेष सेशन कोर्टात हजर केले जाणार आहे. या वृत्ताला सहाय्यक पोलीस आयुक्त अजीत सुळे यांनी अधिकृत दुजोरा दिला आहे. एकाच वेळेस अग्निशमन दलाच्या दोन अधिकार्यांना लाचप्रकरणी अटक झाल्याचे वृत्त समजताच त्यांच्या सहकारी अधिकारी आणि कर्मचारी वर्गात एकच खळबळ उडाली होती.