नियंत्रण सुटल्याने कारची स्कूटीसह बाईकला धडक लागून अपघात
४१ वर्षांच्या स्कूटीचालकाचा मृत्यू तर महिलेसह दोघेजण जखमी
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२९ सप्टेंबर २०२५
मुंबई, – नियंत्रण सुटल्याने एका वयोवृद्धाने कारची स्कूटीसह बाईक जोरात धडक दिली. या अपघातात एका ४१ वर्षांच्या स्कूटीचालकाचा मृत्यू झाला तर त्याच्या पत्नीसह अन्य एक बाईकस्वार जखमी झाला. इयाप्पन सेल्वराज हरिजन असे अपघातात मयत झालेल्या व्यक्तीचे नाव असून जखमीमध्ये न्यान्सी इथाप्पन हरिजन या महिलेसह बाईकस्वार राहुल घाणेकर यांचा समावेश आहे. या दोघांवर प्राथमिक औषधोपचार करुन त्यांना सोडून देण्यात आले. याप्रकरणी खार पोलिसांनी सुधीर सिताराम सावंत या ७१ वर्षांच्या वयोवृद्धाविरुद्ध हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल केला होता.
हा अपघात सोमवारी सायंकाळी साडेचार वाजता खार येथील सोळावा रस्ता, नॅशनल ड्रायफ्रुट ऍण्ड जनरल स्टोर, जय निकेतन इमारतीजवळ झाला. ३७ वर्षांची न्यान्सी हरिजन ही महिला सांताक्रुज येथे तिचे पती इयाप्पन, दोन मुले यागवन आणि राघवन यांच्यासोबत राहते. तिची विवाहीत मुलगी तामिळनाडू येथील तिच्या सासरी वास्तव्यास आहे. तिचे पती इयाप्पन यांनी सोळा वर्ष खार येथील महानगर टेलिफोन निगम लिमिटेडमध्ये काम केले होते. गेल्या एक महिन्यांपासून ते महानगरपालिकेत साफसफाईचे काम करत होते.
२८ सप्टेंबरला त्यांच्या घरी कार्यक्रम होता. त्यामुळे ती तिच्या पतीसोबत त्यांच्या स्कूटीवरुन खरेदीसाठी वांद्रे येथे जात होती. सायंकाळी साडेचार वाजता ते ते दोघेही जय निकेतन इमारतीजवळून जात होते. यावेळी त्यांच्या स्कूटीला एका कारने धडक दिली होती. या कारचालकाने नंतर दुसर्या बाईकस्वाराला धडक दिली होती. त्यात तिच्य डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली होती तर तिचे पती कारखाली अडकले होते. तिथे जमा झालेल्या लोकांनी त्यांना बाहेर काढून तातडीने वांद्रे येथील भाभा हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते.
त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथेच उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या डोक्याला आणि चेहर्याला गंभीर दुखापत झाली होती. अपघाताची माहिती मिळताच खार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी सुधीर सावंत या ७१ वर्षांच्या वयोवृद्धाविरुद्ध पोलिसांनी हलगर्जीपणाने कार चालवून एका स्कूटीचालकाच्या मृत्यूस, त्यांची पत्नी आणि दुसरा बाईकस्वार राहुल घाणेकर याला गंभीर दुखापत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.
या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. प्राथमिक तपासात कारवरील नियंत्रण सुटल्याने सुधीर सावंत यांनी स्कूटीनंतर एका बाईकला जोरात धडक दिली होती. त्यात इयाप्पन हरिजन यांचा मृत्यू झाला तर त्यांच्या पत्नीसह बाईकस्वार जखमी झाले.