चांगला परताव्याचे गाजर दाखवून शेअरमध्ये गुंतवणुकीस प्रवृत्त केले

२६ लाखांच्या फसवणुकीप्रकरणी आरोपी मित्राविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
३० सप्टेंबर २०२६
मुंबई, – शेअरमार्केटमध्ये चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून एका ठगाने त्याच्याच मित्राला सुमारे २६ लाखांना गंडा घातल्याचा प्रकार वरळी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी पराग हनुमंत मोरे या आरोपी ठगाविरुद्ध वरळी पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे. परागने अशाच प्रकारे अनेकांना शेअरमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने गंडा घातला आहे का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.

रविंद्र पोश्शया मुटा हे त्यांच्या कुटुंबियांसोबत वरळीतील गोपाळनगर परिसरात राहत असून एका खाजगी आयटी कंपनीत कामाला आहेत. पाच वर्षांपूर्वी जांबोरी मैदान येथे जॉगिंक करताना त्यांची वरळीतील बीडीडी चाळीत राहणार्‍या पराग मोरेशी ओळख झाली होती. चौकशीदरम्यान पराग हा शेअरमार्केटमध्ये गुंतवणुकीचे काम करत असल्याचे समजले होते. रोजच्या भेटीनंतर त्यांच्यात चांगली मैत्री झाली होती. यावेळी त्याने त्यांना शेअरमार्केटमध्ये गुंतवणुकीचा सल्ला दिला होता. या गुंतवणुकीवर त्यांना वार्षिक तीस ते साठ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखविले होते. आयटी कंपनीत कामाला असल्याने त्यांना शेअरमार्केटबाबत थोडी माहिती होती. शेअरमार्केटमधील गुंतवणुकीवर त्यांना अनेकांनी चांगला फायदा होत असल्याचे सांगितले होते. त्यामुळे त्यांनी परागच्या वतीने शेअरमार्केटमध्ये गुंतवणुकीचा निर्णय घेतला होता.

त्यांनी त्यांच्याकडील सोने तारण ठेवून गोल्ड लोन घेतले होते. त्यांनी वेगवेगळ्या तीन बँकेतून लोन काढून परागला जुलै २०२३ ते मार्च २०२५ या कालावधीत ३२ लाख ५० हजार रुपये शेअरमार्केटमध्ये गुंतवणुकीसाठी दिले होते. याच दाम्यान त्याने त्यांचा डिमॅट खाते उघडून त्या माध्यमातून शेअरमध्ये गुंतवणुक केल्याचे सांगितले. या गुंतवणुकीनंतर त्याने त्यांना जीपेद्वारे चार लाख एक हजार तर कॅश स्वरुपात अडीच लाख रुपये परतावा म्हणून दिले होते. मात्र वारंवार विचारणा करुनही तो त्यांना कुठल्या शेअरमध्ये किती रुपयांची गुंतवणुक केली याबाबतची माहिती सांगत नव्हता किंवा त्याबाबतची रिसीट देत नव्हता.

साडेसहा लाख परतकरुन त्याने त्यांना परतावची उर्वरित रक्कम देणे बंद केले होते. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी त्याच्याकडे शेअरमार्केटमध्ये गुंतवणुकीसाठी दिलेल्या पैशांची मागणी सुरु केली होती. मात्र पैसे देतो असे सांगूनही तो त्यांना पैसे देत नव्हता. वार्षिक तीस ते साठ टक्के परताव्याच्या आमिषाने त्याने त्यांना शेअरमार्केटमध्ये गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करुन ही फसवणुक केली होती.

हा प्रकार उघडकीस येताच रविंद्र मुटा यांनी वरळी पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पराग मोरे याच्याविरुद्ध शेअरमध्ये गुंतवणुकीसाठी घेतलेल्या सुमारे २६ लाखांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. त्याने अशाच प्रकारे इतर काही लोकानंा चांगल्या परताव्या आमिषाने गंडा घातला आहे का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page