शेअर ट्रेडिंगच्या माध्यमातून तरुणीला गंडा घालणार्‍या दोघांना अटक

बोगस कंपनीच्या नावाने उघडलेल्या बँक खात्यात ४० गुन्ह्यांची रक्कम जमा झाली

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
४ ऑक्टोंबर २०२६
मुंबई, – शेअर ट्रेडिंगच्या माध्यातून एका २५ वर्षांच्या तरुणीला सुमारे अकरा लाखांना गंडा घातल्याप्रकरणी दोन आरोपींना उत्तर प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांनी अटक केली. फरहान इरफान शेख आणि सोहेल मोहम्मद साबीर अन्सारी अशी या दोघांची नावे असून ते दोघेही मालाडच्या मालवणीतील रहिवाशी आहेत. या दोघांनी गुन्ह्यांतील मुख्य आरोपींना विविध बँक खात्याची माहिती पुरविल्याचा आरोप असून या दोघांच्या बँक खात्यात फसवणुकीची रक्कम ट्रान्स्फर झाली होती. अटकेनंतर या दोघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या दोघांच्या बँक खात्यात देशभरातून सुमारे ४० गुन्ह्यांतील कोट्यवधी रुपयांची रक्कम जमा झाल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. त्यापैकी तीन गुन्हे उत्तर प्रादेशिक विभागात दाखल आहेत. त्यामुळे या तिन्ही गुन्ह्यांत आरोपींचा लवकरच ताबा घेतला जाणार आहे.

दिशा नितीन संघराजका ही तरुणी बोरिवलीतील शिंपोली परिसरात राहत असून शेअर ट्रेडिंगमध्ये फ्रिलान्स करते. तिला शेअर मार्केटमधील ज्ञान असून तिचे स्वतचे एक डिमॅट खाते आहे. १० मार्च २०२६ रोजी टेलिग्रामचा वापर करत असताना तिला शेअर ट्रेडिंगची एक लिंक आली होती. ती लिंक ओपन केल्यानंतर तिला एका खाजगी कंपनीच्या गु्रपमध्ये ऍड करण्यात आले होते. या ग्रुपमध्ये शेअर ट्रेडिंगमधील दैनदिन अपडेट पाठवून सभासदांना विविध शेअरमध्ये गुंतवणुकीबाबत मार्गदर्शन केले जात होते. हा ग्रुप सीबी रजिस्टार असल्याचा दावा करण्यात आला होता. काही दिवस शेअरबाबतचे अपडेट पाहिल्यानंतर तिने काही शेअरमध्ये गुंतवणुक करण्यास सुरुवात केली होती. या शेअरची विक्री करुन तिला चांगला फायदा झाला होता.

कंपनीवर विश्‍वास बसल्यानंतर तिने शेअरमध्ये आणखीन गुंतवणुकीचा निर्णय घेतला होता. ६ एप्रिल ते २७ एप्रिल २०२६ या कालावधीत तिने वेगवेगळ्या शेअरमध्ये अकरा लाख दोन हजारांची गुर्ंतवणुक केली होती. या शेअरमध्ये तिला प्रचंड फायदा झाला होता. मात्र वारंवार प्रयत्न करुनही तिला तिच्या खात्यातून पैसे विड्राल करता येत नव्हते. याबाबत तिने ग्रुप ऍडमिनकडे विचारणा केली असता ही रक्कम मोठी असल्याने त्यांनी तिला आधी तीस टक्के सर्व्हिस टॅक्स म्हणजे साडेपंधरा लाख रुपये भरावे लागेल असे सांगितले. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच तिने सायबर हेल्पलाईन क्रमांक १९३० आणि उत्तर प्रादेशिक विभागात तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला होता.

तपासात दिशा संघराजकाने ट्रान्स्फर केलेली अकरा लाखांची रक्कम वेगवेगळ्या बँक खात्यात जमा झाल्याचे दिसून आले. त्यामुळे या खात्यासह खातेदारांची माहिती काढण्यास पोलिसांनी सुरुवात केली होती. ही माहिती काढत असताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद कांबळे यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक सुनिल लोखंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन पाटील, पोलीस हवालदार विद्याधर पावसकर, रवी पाटील, अक्षय साळवे आदी पथकाने सोहेल अन्सारी आणि फरहान शेख या दोघांनाही मालाडच्या मालवणी परिसरातून ताब्यात घेतले.

तपासात सोहेलने अर्बनरॉक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या नावाने एका बँकेत खाते उघडले होते. या कंपनीत सोहेल आणि फरहान शेख हे संचालक होते. संचालक असल्याचे दस्तावेज सादर करुन त्यांनी बँकेत खाते उघडले होते. याव बँक खात्यात फसवणुकीची साडेचार लाखांची रक्कम ट्रान्स्फर झाली होती. या गुन्ह्यांत त्यांचा सहभाग उघडकीस आल्यानंतर त्यांच्यावर पोलिसांनी अटकेची कारवाई केली.् या दोघांचे मोबाईल पोलिसांनी हस्तगत केले आहेत. अटकेनंतर या दोघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलीस कोठडीतील चौकशीत त्यांच्या बँक खात्यात देशभरात ४० हून अधिक तक्रारी प्राप्त झाले आहे. या ४० गुन्ह्यांतील कोट्यवधी रुपयांची रक्कम त्यांच्या बँक खात्यात ट्रान्स्फर झाली होती. ही रक्कम नंतर कटातील मुख्य आरोपींना ट्रान्स्फर करण्यात आली होती. त्यासाठी त्यांना लाखो रुपयांचे कमिशन मिळाले होते. त्यात उत्तर प्रादेशिक विभागातील तीन गुन्ह्यांचा सहभाग आहे. त्यामुळे या तिन्ही गुन्ह्यांत आरोपींचा ताबा घेतला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page