काळबादेवीतील फॉरेन्स करन्सी एक्सचेंज शॉपमध्ये २८ लाखांची घरफोडी
सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने पळून गेलेल्या आरोपींचा शोध सुरु
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
४ ऑक्टोंबर २०२६
मुंबई, – फॉरेन्स करन्सी एक्सचेंज शॉपमध्ये शुक्रवारी सकाळी सुमारे २८ लाखांची भारतीय आणि विदेशी चलनाची चोरीची घटना काळबादेवी परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध एल. टी मार्ग पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. शॉपसह परिसरातील सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने पळून गेलेल्या आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.
अनिल बाबूलाल जैन हे व्यावसायिक असून ते त्यंांच्या कुटुंबियांसोबत परळ परिसरात राहतात. त्यांचा काळबादेवी येथील प्रिसेंस स्ट्रिट, मंगलदास रोडवर फॉरेन करन्सी एक्सचेंजचा व्यवसाय आहे. त्यांच्या शॉपमध्ये करन्सी एक्सचेंजसाठी अनेक लोक येत असल्याने त्यांना भारतासह विविध देशातील करन्सी ठेवावी लागते. त्यामुळे त्यांच्या शॉपमध्ये पंधरा ते वीस लाखांची विदेशीसह भारतीय चलन असते.१ ऑक्टोंबरला रात्री आठ वाजता दिवसभरातील काम संपवून ते त्यांच्या घरी निघून गेले होते. यावेळी त्यांच्या तीन वेगवेगळ्या कॅश काऊंटरमध्ये नऊ देशाचे सुमारे २८ लाखांची कॅश होती.
दुसर्या दिवशी म्हणजे २ ऑक्टोंबरला त्यांच्या शॉपला सुट्टी होती. त्यामुळे संपूर्ण दिवस त्यांचे शॉप बंद होते. सकाळी साडेनऊ वाजता त्यांना त्यांच्या परिचित निमेश शहा यांचा कॉल आला होता. त्यांनी त्यांच्या शॉपचे शटर तुटलेले आहे. शॉपमध्ये चोरी झाल्याचा संशय व्यक्त करुन त्यांना तिथे लवकर येण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे अनिल जैन हे त्यांच्या काळबादेवी येथील शॉपमध्ये आले होते. तिथे त्यांना शॉपचे शटर तुटलेले दिसले, त्यांनी आत जाऊन पाहणी केली असता अज्ञात व्यक्तीने प्रवेश करुन तिथे चोरी केल्याचे दिसून आले. शॉपमधील तिन्ही कॅश काऊंटरमधील नऊ देशातील सुमारे २८ लाखांची कॅशची चोरी झाल्याचे निदर्शनास आले.
त्यात १४ लाख ९४ हजार भारतीय, ५ हजार ३७० रुपयांचे २०५ दुबई दिराम, १३ हजार ५६० रुपयांचे २०० कॅनेडियन डॉलर, १० हजार ५०० रुपयांचे ९० स्विस फ्रँक, १७ हजार २८० रपुयांचे १२०० चीन युवान, १० हजार ८०० रुपयांचे युरोपियन १०० युरो, ५४ हजार रुपयांचे १ हजार न्यूझीलंड डॉलर, १ लाख ८५२ हजाराचे ६४ हजार थायबाथ, २४०० रुळपयांचे ४ हजार जापनीस येन, १० लाख ४५ हजार रुपयांचे १० हजार ८९४ अमेरिकन डॉलर असा २८ लाख ३९ हजार ३३४ रुपयांचा समावेश होता.
हा प्रकार लक्षात येताच त्यांनी एल. टी मार्ग पोलिसांना ही माहिती दिली होती. या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. घटनास्थळाचा सविस्तर पंचनामा केल्यानंतर अनिल जैन यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. प्राथमिक तपासात १ ऑक्टोंबरला रात्री आठ ते २ ऑक्टोंबर सकाळी साडेनऊ वाजता ही घरफोडी झाली होती. बंद शॉपचे शटरचे कुलूप तोडून अज्ञात व्यक्तीने आत करुन कॅश काऊंटरमधील ही कॅश चोरी करुन पलायन केले होते.
शॉपसह परिसरातील सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या फुटेजवरुन पळून गेलेल्या आरोपींची ओळख पटवून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. दरम्यान शुक्रवारी उघडकीस आलेल्या या घरफोडीच्या घटनेने स्थानिक व्यापारी वर्गात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.