७२ वर्षांच्या वयोवृद्ध महिलेला धक्काबुक्की काढून घराबाहेर काढले
स्वतच्या आईला घराबाहेर काढणार्या मुलीविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
८ ऑक्टोंबर २०२६
मुंबई, – कांदिवलीतील चारकोप परिसरात राहणार्या एका ७२ वर्षांच्या महिलेला तिच्याच मुलीने धक्काबुक्की करुन घराबाहेर काढल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी वयोवृद्ध महिलेच्या तक्रारीवरुन तिची मुलगी पूनम विशाल गांधी हिच्याविरुद्ध चारकोप पोलिसांनी भारतीय न्याय सहिता आणि ज्येष्ठ नागरिक आणि पालक यांचे पालनपोषण आणि कल्याण अधिनियम कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत चारकोप पोलिसांना आरोपी मुलीविरुद्ध ठोस कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. दरम्यान शनिवारी घडलेल्या या प्रकाराने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे.
७२ वर्षांच्या शोभा विद्यासागर भारद्वाज ही वयोवृद्ध महिला कांदिवलीतील चारकोप, सेक्टर क्रमांक नऊ, जयदेव टॉवर अपार्टमेंटमध्ये राहते. गेल्या आठ वर्षांपासून तिच्यासोबत तिची मुलगी पूनम ही राहत असून तिच्या मुलाच्या निधनानंतर ती तिची आई शोभा हिचा सांभाळ करत होती. मात्र गेल्या काही महिन्यांपासून क्षुल्लक घरगुती कारणावरुन ती तिच्याशी वाद घालत होती. सतत होणार्या भांडणानंतर तिने तिच्या आईला दिल्लीला तिच्या बहिणीकडे पाठविले होते.
काही दिवस तिथे राहिल्यानंतर ती पुन्हा मुंबईत आली होती. वयोवृद्ध असल्याने तिला थंडीचा त्रास होता. पूनमशिवाय तिचा सांभाळ करणारा कोणीही नाही. तिची मुंबईत कुठेही प्रॉपटी नाही. तिला पेंशन मिळत नसल्याने ती पूनमवर अंवलबून होती. ३ ऑक्टोंबरला सकाळी पावणेदहा वाजता पूनमने तिला जोरात धक्का दिला होता.त्यामुळे ती खाली पडली होती. काही वेळानंतर तिने तिला घरातून बाहेर काढून आतून कडी लावून घेतली. वारंवार बेल वाजूनही तिने तिला घरात प्रवेश दिला नाही. निराश होऊन शोभा ही पोलीस ठाण्यात आली आणि तिने घडलेला प्रकार तिथे उपस्थित पोलिसांना सांगितला.
या घटनेनंतर पूनमला पोलिसांनी पोलीस ठाण्यात बोलावून घेतले, मात्र पोलिसांनी समज देऊनही तिने तुम्हाला जे करायचे आहे ते करा, तिच्या आईला घरी घेणार नाही असे सांगून पोलीस ठाण्यातून निघून गेली. स्वतच्या मुलीने तिच्या आईला घरातून बाहेर काढले, तिला धक्काबुक्की केली, रोडवर सोडून तिचा सांभाळ करण्यास नकार दिला होता.
त्यामुळे शोभा भारद्वाज हिच्या तक्रारीवरुन पोलिसांनी तिची मुलगी पूनम गांधी हिच्याविरुद्ध भारतीय न्याय सहिता आणि ज्येष्ठ नागरिक आणि पालक यांचे पालनपोषण आणि कल्याण अधिनियम कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून पूनमची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे. या चौकशीनंतर तिच्यावर पुढील कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.