दहशतवाद्यांशी संबंधित फंडीगप्रकरणी गंडा घालणार्या आरोपीस अटक
आरोपीच्या अटकेने तीन फसवणुकीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात यश
अरुण सावरटकर
२० ऑक्टोंबर २०२६
मुंबई, – दहशतवाद्यांशी संबंधित फंडींगच्या गुन्ह्यांत सहभाग उघडकीस आल्याचा आरोप करुन अटकेची भीती दाखवून एका वयोवृद्धाची सुमारे २५ लाखांची फसवणुक केल्याच्या कटात एका आरोपीस उत्तर प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांनी अटक केली. रितिक सुरेश नट असे या आरोपीचे नाव असून फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे. रितिकने फसवणुकीसाठी सायबर ठगांना विविध बँकेत खाती उघडून दिले असून या खात्यात लाखो रुपये जमा झाले आहे. त्याच्या अटकेने तीन फसवणुकीसह आयटीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यापैकी दुसर्या गुन्ह्यांत त्याच्यावर सध्या अटकेची कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
अब्दुल लतीफ अब्दुल्ला मिरकर हे ८६ वर्षांचे वयोवृद्ध तक्रारदार कांदिवली परिसरात राहत असून सध्या निवृत्त आहे. त्यांचे एका बॅकेत दोन बचत खाते आहे. १८ जुलै २०२६ रोजी ते त्यांच्या घरी होते, यावेळी त्यांना संदीपकुमार नाव सांगणार्या एका व्यक्तीचा कॉल आला होता. त्याने तो लखनऊ एटीएसमधून बोलत असल्याचे सांगून त्यांच्याविरुद्ध एक गुन्हा दाखल झाला आहे. याच गुन्ह्यासंदर्भात त्यांच्याशी प्रेमकुमार गौतम बोलणार आहे असे सांगतले. काही वेळानंतर त्यांना प्रेमकुमार याचा कॉल आला होता. त्याने त्यांचा दहशतवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप करुन त्यांना चौकशीसाठी लखनऊ येथे यावे लागेल असे सांगितले. ते चौकशीसाठी हजर झाले नाहीतर त्यांच्यावर अटकेची कारवाई केली जाईल अशी धमकी दिली.
या कॉलनंतर त्यांना विजय खन्ना नावाच्या अन्य एका व्यक्तीने कॉल केला होता. त्यांचे दहशतवाद्याशी संबंध असून त्यांच्यासाठी आलेले अडीच कोटी त्यांच्या बँक खात्यात ट्रान्स्फर झाले आहेत. त्यांच्या आधारकार्डसह पॅनकार्डवरुन कर्नाटकच्या हुबळी शहरातील बँकेत एक खाते उघडण्यात आले असून याच खात्यात ही रक्कम जमा झाली आहे. यापूर्वी पोलिसांनी १४७ जणांना अटक केली असून त्यांचे सर्व बँक खाती पोलिसांनी सील केली आहे. या बँक खात्याचे व्हेरीफिकेशन सुरु आहे. त्यामुळे त्यांचे बँक खाती सील करुन त्याची चौकशी होणार आहे. त्यानंतर त्याने त्यांच्या बँक खात्याची माहिती काढून त्यांना वेगवेगळ्या बँक खात्यात पैसे ट्रान्स्फर करण्यास सांगितले. चौकशी संपल्यानंतर, त्यांना क्लिनचीट मिळाल्यानंतर ही रक्कम त्यांच्या बँक खात्यात पुन्हा ट्रान्स्फर केली जाईल असे सांगितले.
ही गोपनीय चौकशी असल्याने याबाबत कोणाशी चर्चा करु नका, दशहतवाद्यांची त्यांच्या घरावर नजर आहे. त्यांचा जीव धोक्यात आहे असे सांगून त्यांच्याकडून तुम्हाला तसेच तुमच्या कुटुंबियांना त्रास होण्याची शक्यता आहे. भीतीपोटी त्यांनी बँकेत जाऊन त्यांची एफडी मोडून ती रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा केली. त्यानंतर वेगवेगळ्या बँक खात्यात त्यांनी २५ लाख ५२ हजार ९९० रुपये ट्रान्स्फर केले होते. काही दिवसांनी त्यांना पुन्हा संबंधित् व्यक्तींनी कॉल करुन त्यांच्याविरुद्ध अरेस्ट वॉरंट निघाले असून त्यांना बेल घ्यावी लागेल असे सांगून पाच लाखांची व्यवस्था करण्यास सांगिलते. त्यांच्याकडे पैसे नव्हते, त्यामुळे त्यांनी त्यांना नातेवाईकांकडून पैसे घेण्याचा सल्ला दिला.
बेलसाठी पाच लाखांवरुन ते तीन, दोन आणि नंतर ९५ हजारावर आले होते. त्यामुळे त्यांना संशय आला आणि त्यांनी ही माहिती त्यांच्या मुलाला सांगितली. मुलाकडून त्यांची फसवणुक झाल्याचे समजताचच त्यांनी उत्तर प्रादेशिक विभागात तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी संदीपकुमार, प्रेमकुमार गौतम, विजय खन्ना नाव सांगणार्या तोतया पोलीस अधिकार्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा सायबर सेल पोलिसांकडून तपास सुरु होता. तांत्रिक माहितीवरुन पोलिसानी रितिक नट याला ताब्यात घेतले होते.
चौकशीत फसवणुकीची काही रक्कम त्याच्या बँक खात्यात जमा झाली होती. त्याने उघडलेल्या खात्यात इतर काही फसवणुकीची रक्कम ट्रान्स्फर झाली असून त्याच्या अटकेने अशाच तीन गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. काही ठराविक रक्कमेच्या कमिशनपोटी त्याने फसवणुकीसाठी सायबर ठगांना बँक खाती पुरविल्याचा आरोप आहे. यापूर्वीही त्याला एका गुन्ह्यांत अटक केली होती. आता त्याच्यावर दुसर्या गुन्ह्यांत कारवाई करण्यात आली आहे. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
बँक अधिकार्यांनी सतर्क केले होते
दरम्यान या तोतया अधिकार्यांकडून अटकेची भीतीने अब्दुल लतीफ अब्दुल्ला मिरकर हे त्यांच्या बँकेत एफडी तोडण्यासाठी गेले होते. ते अचानक एफडी तोडून ती रक्कम बँक खात्यात जमा करण्यास सांगत होते. हा प्रकार बँक मॅनेजरला संशयास्पद वाटला. त्यामुळे त्यांनी त्यांना एफडी तोडण्यापूर्वी डिजीटल अरेस्टसारखे गुन्हे घडत आहे. त्यामुळे अशा गुन्ह्यांना बळी पडू नका, एफडी याच कारणावरुन तोडत असाल तर सांगा असे सांगितले, मात्र त्यांनी मॅनेजरला खोटे बोलून ही रक्कम वेगवेगळ्या बँक खात्यात ट्रान्स्फर करण्यास सांगितले. त्यांनी वेळीच मॅनेजरला घडलेला प्रकार सांगितला असता त्यांची २५ लाख ५२ हजार ९९० रुपयांची फसवणुक झाली नसती असेही एका अधिकार्याने बोलताना सांगितले.