टायगर श्रॉफ गोळीबारप्रकरणी तीन दिवसांत दहा आरोपींना अटक
आरोपी हरियाणा-उत्तरप्रदेशचे रहिवाशी तर तिघांना पोलीस कोठडी
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२१ ऑक्टोंबर २०२६
मुंबई, – रविवारी जुहू येथे सिनेअभिनेता टायगर श्रॉफ याच्या कारवर झालेल्या गोळीबारप्रकरणी तीन दिवसांत वेगवेगळ्या राज्यातून दहा आरोपींना अटक करण्यात मुंबई पोलिसांना यश आले असून त्यात दोन महिलांचा समावेश आहे. या दोन्ही महिलांनी गोळीबारासाठी शूटरला शस्त्रे पुरविल्याचा आरोप आहे. सर्व आरोपी हरियाणा आणि उत्तरप्रदेशचे रहिवाशी आहे. याच गुन्ह्यांत अटकेत असलेल्या तीन आरोपींना बुधवारी दुपारी किल्ला कोर्टात कडेकोट पोलीस बंदोबस्तात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना ३१ ऑक्टोंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. रेहान ऊर्फ सुक्का, रितिक कुर्मी ऊर्फ रोशन आणि फुलसिंग अशी या तिघांची नावे असून उर्वरित सात आरोपींना गुरुवारी किल्ला कोर्टात हजर केले जाणार आहे. या सर्वांची एकत्रित चौकशी होणार असून या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे बाहेर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
रविवारी सायंकाळी जुहू येथे टायगर श्रॉफच्या कारवर तीन अज्ञात व्यक्तींनी अंधाधुंद गोळीबार केला होता. या गोळीबारात टायगर हा सुखरुप बचावला तर इतर दोनजण जखमी झाले होते. गोळीबारानंतर पळून गेलेल्या तिन्ही शूटरला अवघ्या पंधरा तासांत राजस्थान पोलिसांनी कोटा रेल्वे स्थानकातून अटक केली होती. या तिघांना नंतर ट्रॉन्झिंट रिमांडवर पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले होते. मुंबईत आणल्यानंतर तिघांना पोलिसांनी अटक करुन बुधवारी दुपारी किल्ला न्यायालयात कडेकोट पोलीस बंदोबस्तात हजर करण्यातआले होते. यावेळी सरकारी वकिलांनी त्यांची चौदा दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली होती. या घटनेमागील कट, हेतू उघड करण्यासाठी आरोपीची कोठडीची गरज असल्याचे सांगून तंनी जास्तीत जास्त कोठडी मिळावी अशी विनंती केली होती. मात्र बचाव पक्षाच्या वकिलांनी पोलीस कोठडीला विरोध केला. शस्त्रे जप्तीसाठी आरोपींची कोठडीची गरज नसल्याचे सांगून ट्रॉन्झिंट रिमांडदरम्यान तिन्ही आरोपींची पोलिसांनी चौकशी केली आहे.
दोन्ही बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने तिन्ही आरोपींना ३१ ऑक्टोंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याच गुन्ह्यांत इतर सात आरोपींना पोलिसांनी वेगवेगळ्या राज्यातून अटक केली असून त्यात दोन महिलांचा समावेश आहे. या दोन महिलांनी गोळीबारासाठी शूटरला शस्त्रे पुरविली होूती. शस्त्रे दिल्यानंतर त्या दोघीही दिल्लीला पळून गेले होते. त्यानंतर या दोघींसह त्यांचे इतर दोन सहकार्यांना सोनीपत येथून दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली. या चौघांनाही नंतर पुढील कारवाईसाठी मुंबईत आणण्यात आले होते. ही कारवाई ताजी असताना बुधवारी याच गुन्ह्यांत अंकित राजेश खताक आणि जतीन समीर या दोघांना पोलिसांनी अटक केली. या सर्व सातही आरोपींना गुरुवारी किल्ला कोर्टात हजर केले जाणार आहे.
तिन्ही शूटरकडून बॉलीवूडच्या सेलिब्रिटीच्या घराची रेकी
पोलीस कोठडीत असलेल्या तिन्ही शूटरचा टार्गेट टायगर श्रॉफ नव्हता. त्यांना सिनेअभिनेता सलमान खान याच्यावर गोळीबार घडवून आणायचा होता. मात्र सलमानची स्वतची खाजगी सुरक्षा तसेच मुंबई पोलिसांकडून देण्यात आलेली वाय प्लस सुरक्षा पाहता त्यांना सलमानपर्यंत पोहचणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांनी इतर बॉलीवूड सेलिब्रिटीच्या घराची रेकी केली होती. त्यात बॉलीवूडचा शहेनशहा अमिताभ बच्चन, खिलाडी अक्षय कुमार यांच्यासह इतर अभिनेत्याचा समावेश असल्याचे बोलले जाते. या वृत्ताला पोलिसांकडून दुजोरा मिळू शकला नाही. मात्र अटकेत असलेल्या आरोपींच्या चौकशीतून अनेक खुलासे बाहेर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.