मेल-एक्सप्रेसमध्ये चोरी करणार्‍या रेकॉर्डवरील सराईत आरोपीस अटक

आरोपीकडून ४८ लाख ३० हजार ७९० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२१ ऑक्टोंबर २०२६
मुंबई, – सावंतवाडी-मुंबई प्रवासादरम्यान एका महिलेच्या उशीखाली ठेवलेल्या सोन्याच्या दागिन्यांसह मोबाईल असा ४९ लाखांचा मुद्देमाल चोरी करुन पळून गेलेल्या एका रेकॉर्डवरील सराईत आरोपीस पनवेल पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली. कृष्णाकुमार रामाश्रय पांडे असे या ४० वर्षीय आरोपीचे नाव असून तो मूळचा मध्यप्रदेशचा रहिवाशी आहे. त्याच्याकडून पोलिसांनी चोरीचा ४८ लाख ३० हजार ७९० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. मेल-एक्सप्रेसमध्ये चोरी करणार्‍या कृष्णाकुमारविरुद्ध कल्याण एक तर रत्नागिरी रेल्वे पोलीस ठाण्यात तीन असे चार गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.

यातील तक्रारदार रंजित चव्हाण हे बोरिवली परिसरात राहतात. १० सप्टेंबरला ते त्यांच्या कुटुंबियांसोबत गणपतीसाठी त्यांच्या चिपळूण येथील गावी गेले होते. ९ ऑक्टोंबरला ते सर्वजण सावंतवाडी-सीएसएमटी एक्सप्रेसने मुंबईला येण्यासाठी निघाले होते. रात्री उशिरा त्यांची पत्नी रुपाली चव्हाण हिने झोपण्यापूर्वी तिचे ४९ लाख २२ हजार ७९० रुपयांचे विविध सोन्याचे दागिने आणि दोन मोबाईल उशीखाली ठेवले होते. पनवेल रेल्वे स्थानक आल्यानंतर तिला जाग आली. यावेळी तिला तिच्या उशीखाली ठेवलेली पर्स अज्ञात व्यक्तीने चोरी केली होती. झोपेत असल्याचा फायदा घेऊन त्याने दागिने आणि मोबाईल चोरी करुन पलायन केले होते.

हा प्रकार लक्षात येताच त्यांनी पनवेल रेल्वे पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार केली होती. या तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत स्थानिक रेल्वे पोलिसांसह गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पोलिसांनी तपास सुरु केला होता. सावंतवाडी-पनवेल रेल्वे स्थानकादरम्यानचे सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेऊन आरोपीची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला होता. सीसीटिव्ही फुटेजसह तांत्रिक माहितीवरुन पोलिसांना या चोरीमागे कृष्णाकुमार पांडे असल्याचे उघडकीस आले होते. गुन्हा घडल्यानंतर तो त्याच्या मध्यप्रदेशातील सतना गावी पळून गेला होता. आरोपीची ओळख पटल्यानंतर त्याच्या अटकेसाठी एक टिम मध्यप्रदेशात पाठविण्यात आली होती. या पथकाने स्थानिक पोलिसांचय मदतीने काही तासांत कृष्णाकुमारला नागौद, हरदुवा मोहल्ला परिसरातून ताब्यात घेतले.

चौकशीत त्यानेच ही चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याच्याकडून पोलिसांनी ४८ लाख ३० हजार ७९० रुपयांचे विविध सोन्याचे दागिने आणि मोबाईल हस्तगत केले. तपासात कृष्णाकुमार हा मध्यप्रदेशचा रहिवाशी असून रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध कल्याण, रत्नागिरी पोलीस ठाण्यात चार गुन्हे दाखल आहेत. मेल-एक्सप्रेसमध्ये झोपत असलेल्या प्रवाशांचे मौल्यवान वस्तू चोरी करुन तो पळून जात होता. त्याच्या अटकेने अशाच इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या गुन्ह्यांचा पुढील तपास विशेष कृती दलाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू सातपुते हे करत आहेत.

ही कामगिरी पोलीस आयुक्त एम. राकेश कलासागर, पोलीस उपायुक्त प्रज्ञा जेडगे, सहाय्यक पोलीस आयुक्त सोपान काकड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल कदम, विजय तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू सातपुते, गजानन दराडे, अविनाश आरडक, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कृष्णराव चव्हाण, पोलीस हवालदार प्रविण घार्गे, विकास नलगे, जर्नादन पुलेकर, रणजीत रासकर, सुनिल खोत, सुरेश एल्ला, वैभव शिंदे, वैभव जाधव, विकास रासकर, सतीश फडके, सुधीर जठार, मयुर पाटील, अमरसिंग वळवी, सुनिल मागाडे, महिला पोलीस हवालदार पद्मा केजळे, पोलीस शिपाई आकाश सोनावणे, स्वप्निल नांगरे, योगेश बच्चे यांनी केली. तांत्रिक शाखेचे पोलीस हवालदार विक्रम चावरेकर, अमोल अहिनवे यांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी तांत्रिक मदत केली तर मध्यप्रदेशच्या नागौद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मुकेश सिंग, पापेलीस हवालदार अविनाश शर्मा, दिपेश कुमार यांनी आरोपीला पकडण्यासाठी मौलाचे सहकार्य केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page